प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.
दाशराज्ञ युध्दांतील उल्लेखांचा अन्योन्याश्रय.- ॠग्वेदांत अनेक व्यक्तीची व कुलांची नांवे येत आहेत; त्यांपैकी सुदास, त्याचे मित्र व शत्रू यांशी दुस-या अनेक नांवांचा संबंध येतो. अशा संबद्ध व्यक्तीचा आतां हिशेब घेऊं.
युध्दांत पडलेल्या व्यक्ती अगर राष्ट्रें म्हटली म्हणजे (१) शिम्यु, (२) तुर्वश, (३) द्रुह्यु, (४) पुरु, (५) अनु, (६) यदु, (७) मत्स्य, (८) पक्थ, (९) भलानस, (१०) अलिन, (११) विषाणिन, (१२) अज, (१३) शिव, (१४) शिग्रु, (१५) यक्षु, (१६) भरत-तृत्सु, (१७) पृथु, (१८) पर्शु, (१९) दोन वैकर्ण, (२०) गुंगु (२१) भेद इत्यादि होत. या राष्ट्रांचा संबंध त्यांच्या पुरोहितांशी येतो, पुरोहितांचा संबंध त्यांच्या कुलांशी येतो, आणि पुरोहितकुलांचा संबंध त्यांच्या इतर यजमानांशी येतो. निरनिराळया व्यक्तींचे आणि राष्ट्रांचे संबंध कसे काय पसरले आहेत तें पुढें दाखविलें आहे. {kosh जेथे संबंध किंवा अनिश्चित संबंध असें म्हटलें आहे तेथें सहोच्चारित किंवा मदतगार असा अर्थ समजावा.}*{/kosh}
(१) शिम्यु.- नहुष (शिम्यूशी संबंध); नहुषसंबंध- नाहुष, मर्शशार (नहुषांचा राजा) व नहुष्य ययाति. कांही ॠचांवरुन 'मनो:' पुत्री 'इळा' आणि 'नहुष' यांचा संबंध व्यक्त होतो.
(२) तुर्वश:- वृचीवंत-वरशिख-पार्थव (तुर्वशांचा आणि या तिघांचा अतिनिकट संबंध आहे. कदाचित् तुर्वश आणि हे एकच असतील.), यांचा जेता अभ्यावर्तिन् चायमान. वर्चिन् (वृचीवंताशीं संबंध), दभिति, बृहद्रथ, नर्य, एतश (तुर्वशस-होल्लिखित); दभितिसंबंध:- चुमुरि-धुनि (दभितीकरितां इंद्रानें मारलेले दोन राक्षस); अर्ण, चित्ररथ (यांचा तुर्वशानें वध केला असें कांहीचें म्हणणे आहे), किवि (ही जात तुर्वशांच्या मिश्रणानें झाली) व उग्रदेव (तुर्वशसम बलवान्).
(३) द्रुह्यु:- भृगु (द्रुह्युंचे उपाध्याय), इट (भृगु-पुत्र), गृत्समद, भृगवाण (भृगुवंशज); गृत्समदसंबंध:- शुनहोत्र (गृत्समदवंशज), नार्मर (गृत्समदोल्लिखित), च्यवन (भृगुअङ्गिरस), च्यवतान मारुताश्व (च्यवनाशी संबंध), जुजुराष (च्यवनसंबंधी- शन्तनूच्या कथेशी साम्य),शर्यात (भृग ड्गिरस) शार्यात (शर्यातवंशज), पुरुहन्मन् बृहद्वि व नाभाक (अङ्गिरस).
(४) कवष- कुरुङ्ग (कवषाशी संबंध).
(५) पुरु- पुरुकुत्स (पुरुंचा राजा), पुरुकुत्सानी (पुरुकुत्साची बायको), दुर्गह (पुरुकुत्साचा बाप), इक्ष्वाकु (पुरुकुत्साचें कुल), त्रसदस्यु (पुरुकुत्सपुत्र), हिरणिन् किंवा हिरणि (पुरुकुत्सपुत्र), पौरुकुत्स-पौरुकुत्स्य-पौरुकुत्सी (त्रसदस्यूची पैतृक नांवे), गौरिक्षित (त्रसदस्यूचें पैतृक नांव), कुरुश्रवण त्रासदस्यव (त्रसदस्युपुत्र), मित्रातिथि (कुरुश्रवणपितृवर्गांतील), तृक्षि त्रासदस्यव (त्रसदस्युवंशज), उपमश्रवस् (कुरुश्रवणत्रासदस्यवपुत्र), त्र्यरुण-त्रैवृष्ण-त्रसदस्यू (पर्यायनामें), वृष (त्र्यरुणाचा उपाध्याय), अश्वमेध (त्र्यरुण-त्रैवृष्ण-त्रसदस्यूशी अनिश्चित संबंध), आश्वमेध, पूतकतु (अश्वमेधाशीं अनिश्चितसंबंध), रथवीति दार्भ्य, पुरुरवस्, पुरुमीळह (पुरुवंशज), वैददश्वि (पुरुमीळहाचें पैतृक नांव), तरंत (पुरुमीळहबंधु), दार्भ्य (पुरुमीळहाशीं संबंध असलेल्या अत्रीच्या नातवाला मुलगी देणारा).
कुरु- (कुरुश्रवण हा नांवावरुन कुरुवंशांतील असावा), कौरव, देवापि आर्ष्टिषेण, शंतुनु, कृत्वन्, ॠष्टिषेण, औलान, कैव्य (कुरुवंशज), ओगण (देवापि शन्तनु सहोच्चारित), आर्ष्टिपेण, शांड (पुरुवंशज), पुरुमित्र (पुरुवंशज किंवा पुरुंचा मित्र), कमद्यु (बहुतेक पुरुमित्राची मुलगी), शुन्घ्यु (कमद्यूचें दुसरें नांव), विमद (कमद्यूचा नवरा), ध्वन्य (त्रसदस्युसहोच्चारित), पृश्निगु, शुचंति (पुरुकुत्ससहोच्चारित).
(६) अनु- आनव (अनुवंशज), पाकस्थामन् कौरयायण (अनुवंशज), कौरयाण (अनुवंशज).
(७) भेद- सुदासशत्रु. याच्याशी संबंध असलेल्या दुस-या कोणी व्यक्ती आढळून येत नाहीत.
(८) शंबर- कौलितर (शंबराचे पैतृक नांव), वंगृद (शंबरसहोच्चारित).
(९) वैकर्ण (१०) वैकर्ण.- यांच्या संबंधानें फारशी माहिती मिळत नाही.
(११) यदु.- प्रपथिन्, तिरिंदर, आसंगप्लायोगी, पर- मज्या (यदुवंशज), तिरिंदरसंबंध :- पर्शु (तिरिंदर आणि पर्शु एकच, मनुशीहि कदाचित् संबंध असेल).
(१२) मत्स्य.- इतर फारशी माहिती मिळत नाही.
(१३) पक्थ.- बभ्रु (सहोच्चारित), नमुचि (सहोच्चारित), बभ्रूसंबंध- ॠणंचय (बभ्रूचा यजमान).
(१४) भलानस् , (१५) अलिन, (१६) विषाणिन् , (१७) अज, (१८) शिव, (१९) शिग्रु , (२०) यक्षु.- हे सर्व सुदासशत्रू. यांचा संबंध दाशराज्ञ युध्दांतील व्यक्तींशिवाय इतर कोणाशी फारसा दिसून येत नाहीं.