प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.
आर्यन् व त्यांचा काल्पनिक इतिहास.- वेदभाषी हा शब्द आर्य या शब्दाचा उपयोग न करण्यासाठी वापरला आहे. कां की, आर्य शब्दाचा उपयोग करण्यांत लेखकांनीं फार घोटाळे केले आहेत. प्रथमत: प्रश्न उत्पन्न होतो कीं, आपण इतिहास लिहितों हा कोणाचा ? आर्यांचा ? आर्य म्हणजे कोण ? आज वाटेल त्या जातीनें हें नाव स्वत:स लावून घ्यावें ही स्थिति आहे. लेखकानें किंवा वक्त्यानें स्वत:स अप्रिय अश वर्गास हें भूषणास्पद नांव लावावयाचें नाकारावें ही जातिविषयक स्वछंदी लेखकांची वृति आहे. तर निर्विकल्प मनानें वेदांत उल्लेखिलेले आर्य म्हणजे कोण हें ठरविलें पाहिजे. पाश्चात्य शास्त्रज्ञ ''आर्य'' शब्द ''आर्यन्'' या रुपानें वापरतात आणि ''आर्यन'' या शब्दाचा उपयोग ज्या लोकांच्या भाषेचें संस्कृत भाषेशी मुलीचें, नातीचें किंवा बहिणीच्या नातीचें नातें असतें त्या लोकांस लावतात. आर्य शब्दावर फिदा होऊन यूरोपीयांनी तो शब्द स्वत:स लावून घेतला आणि यामुळें त्या शब्दास अनेक अर्थांतरें उत्पन्न झालीं. ती लक्षांत न घेतल्यामुळें गैरसावध पाश्चात्य व भारतीय लेखकांची आर्य या संस्कृत शब्दाचें ते 'आर्यन्' हें केवळ रुपांतर आहे अशी समजूत झाली. व वैदिक 'आर्य' शब्दाचें ते 'आर्यन्' किंवा इंग्रजी 'आर्यन्' शब्दाचें ते 'आर्य' असें भाषातरं करुं लागले. ती समजूत चुकीची आहे. 'आर्यन्' असे भाषांतर करणें हें आर्य या शब्दाच्या भारतीय उपयोगापासून दूर जाणें आहे. तथापि वेदांतील आर्य या शब्दांत यूरोपीय यांच्या ''आर्यन्'' या शब्दाचा अर्थ घुसविण्याचा प्रयत्न होत आहे.
युरोपीय लेखकांनी कल्पनापरंपरा उत्पन्न करुन दिली आहे ती अशी. अत्यंत प्राचीन म्हणजे मंत्रांच्या कालीं कांही लोक हिंदुस्थानांत आले ते गोरे होते, आपणांस ते आर्य म्हणवीत. ज्यांशीं ते लढले ते लोक काळे होते, त्यांस ते दस्यु म्हणत. त्या दस्यूंपासून आर्यांनीं देश जिंकला. या त-हेची इतिहास कसा असावा या संबंधाची मनोरम कल्पना तयार करुन पाश्चात्य संशोधकांनी इतिहास बराच सोपा केला आहे. आणि ''आर्यांनीं'' ''पराभूत केलेल्या'' ''मूळच्या'' म्हणजे ''द्राविडी'' लोकांस दस्यु इत्यादि विशेषणे लावलीं जात असावीं अशी कल्पना काढली गेली आहे. कातडीच्या रंगामुळें द्वेषबुद्धि अत्यंत स्वाभाविक आहे, इत्यादि सिध्दांत काढणा-या आणि वर्णद्वेषाचें समर्थन करुं पाहणा-या लोकांना वेदाचा अर्थ करतांना अर्थ करणारांनी जी पदरची कल्पनाशक्ति खर्च केली तिचा बराच उपयोग झाला आहे. आणि काळया वर्णामुळें हिंदुस्थानांतील लोकांची गो-या लोकांपुढें जी मानखंडना होते, त्या खंडनेमुळें आपल्या जेतृत्वाला आधार जर कोंठें सांपडेल तर पहावा आणि आपण जेत्यांतच नव्हे तर गो-यांतहि मोडूं असा आधार सांपडला तर वरा या भावनेंनें हिंदुस्थानांतील सुशिक्षितांनी आपले पूर्वज ''आर्य'' (म्हणजे आर्यन् ) होते, यूरोपियन लोकांशीं संबद्ध जे लोक ते आर्य, आणि त्यांनीं देश्य काळया लोकांनां जिकलें आणि दस्यू, म्हणजे तेच काळे लोक, इत्यादि कल्पनांचें मोठया आनंदानें स्वागत केलें.
यूरोपीय कल्पना अशी कीं, (१) वैदिक वाड्·मय ज्यांनी उत्पन्न केलें ते सर्व लोक एका विशिष्ट मानववंशाचे होते. (२) त्यांना ''आर्य'' हें नांव सामुच्चयिक होतें. तें जातिवाचक नांव होतें आणि (३) दस्यु म्हणून जे लोक होते ते निराळया जातीचे होते. (४) ते काळे होते. (५) त्या काळयांच्या आणि गो-या ''आर्य'' लोकांच्या संनिकर्षानें ''जातिभेद'' उत्पन्न झाला. (६) वर्ण आणि जाति म्हणजे एकच. (७) वर्ण याचा मूळचा अर्थ रंग. (८) रंगांत फरक हेंच जातिभेदाचें म्हणजे (प्रचलित कल्पनांप्रमाणें) चातुर्वण्याचें मूळ. या कल्पना फार पसरल्या आहेत. या कल्पना कितपत बरोबर आहेत याचा तपास करण्याची शुद्धि पाश्चात्य किंवा भारतीय संशोधकवर्गास मुळींच नाही. यूरोपीय आणि भारतीय ब्राह्मणांचा वर्ग या दोघांचीहि वरील कल्पना खुशामत करतात. मग त्यांवर हल्ला तरी कोण आणि कशाला करतो. अशा त-हेची मनोरचना सत्यशोधनाच्या मार्गात बरेंच विघ्न करीत आहे. आर्य हे नांव भारतीय लोकांतील श्रेष्ठांनीं पूर्वीपासून वापरलेलें. पण तें ''संशोधकां'' च्या तावडीत वंशनाम झालें. संस्कृत भाषेशीं संबद्ध अशा भाषा बोलणारांचें हे सामान्य वंशनाम होतें अशीहि कल्पना करुन तें वंशनाम निरनिराळया यूरोपीय राष्ट्रांच्या कोणत्या कोणत्या नांवांत, अगर शब्दांत अद्याप टिकलें आहे, याचाहि पत्ता यूरोपीयांनी लावला आहे. आर्य हें वंशनाम होतें हें आमच्या मतें अजून सिद्ध होत नाही. आर्य आणि दस्यु म्हटलेले लोक भिन्न मानव वंशांतले होते आणि ज्यांशी आर्य लढले ते सर्व ''दस्यू'' म्हटले जात होते, या दोन कल्पनाच आम्ही ग्रहण करावयास तयार नाहीं. ॠग्वेदांत फार लढाया दिसत नाहीत. ज्या कांही दिसतात त्यांपैकी कांही देवांच्या व उरलेल्यापैकीं बहुतेक दाशराज्ञ युध्दाशीं संबद्ध दिसतात. दाशराज्ञ युध्दांतील स्वारी करणा-यांस प्रतिकार करणारा पक्ष केवळ दस्यू होता असें दिसत नाही. ॠग्वेदांत ज्या लोकांची चळवळ व्यक्त होते ते लोक ''आर्य'' या वंशबोधक सामान्य नामानें आपणां स्वत:स उल्लेखीत असत हेंच-आम्ही नाकबूल करतों. आर्य, दस्यु, वर्ण या तीन गोष्टींसंबंधानें आणि वेदांतील लढायांचा या तीन कल्पनांशीं संबंध काय होता या संबंधानें सत्य काय होतें हें वैदिक पुराव्यावरुन काढणें ही वेदमूलक इतिहासाची पहिली पायरी होय. आर्य हें नांव यजनशील वर्गाचे व तसेंच ''शिष्ट'' या अर्थाचें म्हणजे वर्गवाचकच होतें असें आमचें मत झालें आहे. आर्य हें वेदकालीन निरनिराळया राष्ट्रांचें सामान्य नाम कितपत होतें याचा विचार पुढें केलाच आहे.
एक विचार प्रथम स्थिर केला पाहिजे तो हा कीं, समाजांतील विशिष्ट वर्गवाचक जें नांव असेल तें राष्ट्रवाचक नांव नव्हे. आपणांस आतां हें पाहिलें पाहिजे की, ''आर्य'' किंवा ''अर्य'' हा शब्द जातिवाचक आहे की वर्गवाचक आहे. याच्या विषयीं कांही एक संशय राहूं नये म्हणून हे शब्द ॠग्वेद संहितेमध्यें जेथें जेथें आले आहेत, त्या सर्व ॠचा त्यांच्या अर्थासह पुढें दिल्या आहेत. आर्यस्वरुपनिश्चयाचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. कां कीं, प्राचीन इतिहासाचा पाया हाच आहे. आणि यासाठीं आर्य शब्दाचा आणि तशाच अर्थानें येणा-या अर्य शब्दाचा प्रत्येक उपयोग वाचकानें तपासावा अशी आमची शिफारस आहे.
वेदांत अर्य व आर्य असे दोन शब्द आहेत. कांही ठिकाणीं अर्य व आर्य हे दोन्ही शब्द एकाच अर्थानें आहेत तथापि ब-याच ठिकाणीं नाहींत. लोकनिश्चयार्थ आर्य शब्दाचें सूक्ष्म निरीक्षण करते प्रसंगी अर्य शब्दाचेंहि निरीक्षण केलें पाहिजे. आपणांस लोकनिश्चय करावयाचा तो हा कीं वेदांत अर्य व आर्य या शब्दांचे अर्थ काय होते. आर्य हा शब्द किंवा अर्य हा शब्द शिष्टजनवाचक होता काय ? अथवा यजनशील वर्गाचा घोतक होता काय ? कीं तो वंशवाचक होता या शब्दाच्या स्पष्टीकरणासाठीं जे उतारे पुढें दिले आहेत त्या उता-यांवरुन असें दिसून येईल कीं, पुष्कळ ठिकाणीं ॠचांचा अर्थ स्पष्ट होत नाहीं; तथापि त्या ॠचांचा अर्थ जितका स्पष्ट होतो तितका अर्य किंवा आर्य हा शब्द गुणवाचक आहे अगर वंशवाचक आहे याचा निश्चय करण्यास अपुरा नाहीं.
मांत्र अथवा वेदभाषीं, आर्यन् व आर्य या तीन शब्दांचा संबंध आम्हीं येणेंप्रमाणें दर्शवितों. आर्यन् हा मानववंशविषयक आणि आजचा शब्द होय. कांही इराणी व यूरोपीय व कांही भारतीय ज्या वंशांत भाषासंबंधामुळें मोडतात तो समुच्चय आर्यन् या नांवानें संबोधिला जातो. शक, मग वगैरे देखील आर्यन्मध्यें मोडतील. आर्य म्हणजे शिष्ट अगर यजनशील या अर्थानें वेदांत वापरला आहे. दास, दस्यु हे याचे विरोधवाचक शब्द होत. हा जातिबोधक शब्द नव्हे. वेदभाषी हा शब्द आर्यन्वंशांतील एका विभागाचा द्योतक आहे. हिंदुस्थानामध्यें वेद आणणा-या लोकांच्या पूर्वी जे लोक होते, ते आर्यन् असतील पण ते मांत्र अथवा वेद भाषी नाहींत.
आर्य आणि दस्यु यांचा सामुश्चयिक कलह वेदांत वर्णिला आहे अशी जी जुन्या लोकांनीं प्रचलित केलेली समजूत आहे तिचा विचार प्रथम झाला पाहिजे. आपणास वरील आर्यविषयक प्रश्न सोडविण्यासाठी तीन प्रश्न विचारले पाहिजेत.
(१) आर्य किंवा अर्य शब्द महावंशवाचक किंवा राष्ट्रवाचक किंवा राष्ट्रसमुच्चयवाचक आहेत काय ?
(२) त्यांचा आणि दस्यूंचा सामुच्चयिक कलह वेदांत आहे काय ?
(३) आर्यविषयक उतारे एकत्र केले तर त्यांची इतिहाससूचक संगति लागते काय ?
हे तीन प्रश्न मनांत धरुन आपण मंत्रराशींचें अवलोकन केलें तर वरील तीनहि प्रश्नांस नकारार्थी उत्तराखेरीज दुसरें उत्तर देतां येत नाही.
दस्यु नांवानें ओळखल्या जाणा-या लोकांनीं हिंदुस्थान वसला होता त्यांस आर्यन् लोकांनी जिंकल्याची कथा वेदांत आहे म्हणून पूर्वीच्या लेखकांनीं दिलेली माहिती चुकीची आहे.
आर्यन् म्हणून ज्या महावंशास आज लोक संबोधितात तो शब्द आर्य शब्दाचें रुपांतर आहे दुसरें कांही नाही, आणि संशोधकांनीं संस्कृत ग्रंथांतून वापरलेला आर्य शब्द वापरतांना त्याचें आर्यन् हें रुप केलें एवढेंच, तसें करण्यानें अर्थांतर झालें नाहीं, अशी बरीचशी प्रचलित समजूत आहे, पण ती चुकीची आहे. यूरोपीय संशोधकांनी आर्य हा शब्द वैदिक ग्रंथांत पाहिला तो दास आणि दस्यु यांच्याशीं विरोधवाचक दिसला आणि मंत्रवाड्·मयाचें क्षेत्र पंजाब पाहिलें, तेव्हां आर्य ही कोणती तरी एक नवीन जात होती व ज्या अर्थी ती पंजाबांत आहे त्या अर्थी ती देशप्रवेश करीत होती अशी त्यांची कल्पना झाली. संस्कृत भाषेशीं व वेदभाषेशीं इतर राष्ट्रांचा संबंध दिसला तेव्हां त्या सर्व राष्ट्रांसहि आर्य म्हणजे आर्यन् हें नांव लावण्यांत आलें. हेंच सामुच्चयिक नांव पसंत होण्याचें कारण हें की, वेदांतील आर्य हें त्यांस जातिवाचक नांव वाटलें आणि वेद ज्याअर्थी सर्वांत जुना ग्रंथ त्याअर्थी त्यांत उल्लेखिलेल्या लोकांचें आर्य हें नांव सामुच्चचिक जुनें नांव असावें अशी समजूत झाली. पुढें भाषाशास्त्र जसें वाढूं लागलें तेव्हां संस्कृत भाषेशीं संबंध दृष्टीस पडणा-या सर्व भाषांस हें नांव मिळालें आणि आर्यन् हें एक महावंशवाचक नांव तयार झालें. त्याचा परिणाम असा झाला की, वेदांतील किंवा इतर संस्कृत ग्रंथांतील आर्य या शब्दासहि वंशवाचक म्हणजे जातिवाचक अर्थ गैरसावध लेखकांनीं चिकटविला. यासाठी आर्यन् नांवाची एक जाति देशप्रदेश करीत आहे असा पुरावा मंत्रांत आहे या कल्पनेचेंच आपण परीक्षण करुं.