प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग


प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.


अत्यंत प्राचीन काळचीं राष्ट्रें दोन आहेत; एक असुरांचे व दुसरें इजिप्तचें; असें संशोधकांचे आजचें मत आहे. ख्रिस्तपूर्व ८००० वर्षांपर्यंत या दोन्ही राष्ट्रांचे प्राचीनत्व नेलें आहे. या राष्ट्रांच्या कालांच्या आणि यानंतरच्या बुद्धपूर्व कालाच्या इतिहासासाठीं महत्वाची साधनें आहेत त्यांत भारतीयांचे वेद हें एक महत्चाचें साधन आहे असें म्हटल्यास त्यास कोणीहि आक्षेप घेणार नाही. या कालाचा इतिहास वेदांच्या साहाय्यानें लिहिण्यासाठीं अनेक पंडितांनी परिश्रम केले आहेत. संस्कृत भाषेचा पूर्वेतिहास पहावयाचा आणि त्या भाषेची इतर सदृश भाषांशी तुलना करुन सामान्य संस्थ शोधावयाच्या ही पद्धति वापरुन बराचसा अत्यंत प्राचीन इतिहास संशोधकांनी उपलब्ध करुन दिला आहे. त्या इतिहासाचें संयोजक फल आम्ही पुढें देऊं. प्रथमत: ज्या साहित्याच्या परीक्षणानें इतिहास शोधावयाचा त्या साहित्याचें परीक्षण झालें पाहिजे. वैदिक वाड्·मय तयार झालें तें बराच उत्तरकालीन इतिहास दाखवितें तथापि त्या वाड्·मयांत व्यक्त झालेली भाषा आणि विकास पावलेल्या कल्पना यांची पूर्वरुपें ही मंत्रकालाचें पूर्वरुप दाखवितात.