प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.
''आर्या'' पासून प्रारंभ करुन इतिहासाची आशक्यता असतां इतिहासार्थ अन्यत्र द्दष्टि.- आर्य शब्द किंवा आर्य नावांशी संबद्ध असलेले उल्लेख यांवरुन कोणत्याहि राजकीय हालचालीवर प्रकाश पडत नाही. तेव्हां राजकीय हालचालींसाठी अन्यत्र पाहिलें पाहिजे. देशांत ज्या हालचाली त्रग्वेदांत दिसतात त्यांचा आपण आढावा घेऊं.
(१) सुदास व त्याविरुद्ध दहा राजे.
(२) पुरुरवस आणि त्याविरुद्ध असलेले लोक.
(३) सरमा व पणी इत्यादिसंबंधानें कथा.
(४) देव व त्यांविरुद्ध असलेले लोक.
या चार कथानकांखेरीज दुसरी कथानकें ॠग्वेदांत नाहीत म्हटलें तरी चालेल.
देव मग ते इंद्रादि आदित्य असोत किंवा दुसरे कोणी असोत त्यांच्या संबंधाच्या ज्या कथा आहेत त्या वैदिक काळांतील प्राचीन कथा होत. आज आपण जसें प्राचीन कथांस पौराणिक कथा समजतों आणि त्यांचे बीज आपण गूढ समजतों तसेंच वृत्रादि असुर आणि इंद्रादि देव यांचे बीज वेदकालीन लोक गूढ समजत असावेत. त्यासंबंधाने आलेल्या कथा भारतीय इतिहासाचा भाग नाहीत. त्या तौलनिक पुराणशास्त्राच्या साहाय्यानें कथावृद्धीच्या ज्ञातव्य इतिहासाचा भाग होत.
उरलेले दोन कथाभाग म्हटले म्हणजे सरमा पणी यांचा संबंध आणि पौरुरवसेतिहास हे होत. याविषयी विवेचन आपणांस आढळतें. पुरुरवस् ही व्यक्ति ॠग्मंत्रकालांतच इतकी जुनी मानली जात होती की, स्वर्गांतल्या अप्सरा व देव यांच्याशी त्यांचा संबंध सूक्तकारानें वर्णिला आहे. त्या वेळेस तें प्राचीन इतिहासगूढ आख्यान म्हणून समजलें जात होतें. सरमा व पणी यांसंबंधानें तें आख्यान म्हणून आपणांस म्हणतां येईल. त्या आख्यानाचा विषय कोणत्या काळाचा असावा याविषयी प्रश्न आहे. या दोन आख्यानांसंबंधानें विचार करणारा महत्वाचा संशोधक म्हणजे रा. राजाराम रामकृष्ण भागवत हा होय. या संशोधकाचें विविधज्ञान विस्तारांतील ''वेदार्थयत्नकारांचे स्मारक'' (पुस्तक २६-२८ वे) म्हणून पांडित्यपूर्ण लेख आपणांस उपलब्ध आहेत.
सरमासूक्त व पुरुरव्याचें सूक्त यांत दिसणारा कथाभाग यांचा व दिवोदाससुदासांच्या दाशराज्ञयुध्दाचा पौर्वापर्य संबंध निश्चित नाही.
दाशराज्ञयुध्दाचा मात्र इतिहासाशी संबंध विशेष त-हेनें द्यावयास पाहिजे. त्यापूर्वी सरमासूक्ताविषयीं झालेलें संशोधन लक्षून घेऊं. त्या सूक्तांत ऐतिहासिक सत्य काय असावें याविषयी राजाराम शास्त्रांचे मत देतो. त्यांच्या मताप्रमाणें देव नांवाचें एक राष्ट्र होतें, त्यांच्या पणीशी लढाया होत होत्या वगैरे. राजारामशास्त्री यांची कल्पना जितकी कांटेतोल पद्धतीनें पुढे तपासली जावयास पाहिजे तितकी गेली नाही. त्यांच्या मतानें सरमासूक्तांत जो इतिहास आला आहे तो मात्र लोकांची हिंदुस्थानांत वसाहत होण्यापूर्वी जी परिस्थिति होती त्या परिस्थितीचा घोतक असून तो कथारुपानें समाजांत राहिला असावा. राजारामशास्त्री यांच्या कल्पनेविषयीं आम्ही आपलें मत सध्यां कांहीच देत नाही. त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ देऊन मोकळे होतों. {kosh key to interprete the Veda by R. R. Bhagwat Bombay 1907.}*{/kosh}
पणीच्या राष्ट्रांविषयी आणि वैदिकांच्या इतर राष्ट्रांशीं आलेल्या संबंधांविषयीं विधानें आणि इंद्राचें त्या बाबतीत कार्य याविषयीं भागवती विधानें आम्ही मांडलेल्या इतिहासाशीं संगति जुळविण्याचा प्रयत्न न करितां येथें मांडतो.
स मासूक्त (१०.१०८,११) देव व त्यांचे शत्रू यांमधील भांडणाचें कारण.
देवांचा स्त्रीरक्षक सरमा व त्यांचे शत्रू पणी यांमधील झालेले हें भाषण आहे. आठव्या ॠचेंतील शेवटच्या ओळीत पणीचा उल्लेख करते वेळी तृतीय पुरुषाचा उपयोग केला आहे; म्हणून या सूक्तकर्त्यांचें नाव माहीत नाही.
प णी चें रा ष्ट्र- इन्द्रानें पणीच्या राज्यांत सरमेला पाठविली; परंतु तेथें जाण्यासाठीं तिला रसा या नांवाची एक मोठी नदी ओलांडावी लागली. पणी हे व्यापारी लोक असून, त्यांच्या बाजाराच्या ठिकाणीं मोठमोठया देवघेवी होत असत. देवांच्या गाई पणीनी चोरल्यामुळे देवांनां त्यांच्यावर स्वा-या कराव्या लागल्या. स्वारीत ग्रावण, अयास्य व अंगीरस जातीपैकी नवग्र हे लोक होते. हे सर्व ॠषी होते. नवग्व व सरमा यांना दहा दिवसपर्यंत (महिनेपर्यंत) डोंगराळ प्रदेशांतून जावें लागले (५.४५,७). हे सर्व विप्र असून सोम (बृहस्पति) हा त्यांचा सेनापति होता. या सूक्तावरुन पणीच्या राष्ट्रीयत्वाची कांहीच कल्पना येत नाहीं, असें भागवत कबूल करतात पण विस्तारांत पणीस तेच भागवत फिनिशिअन म्हणतात!! बृबु हें नांव आर्यन् नाही परंतु एका वणिकाचें वंकु हे नांव आर्यन् आहे. एका ॠचेंत सूक्तकर्ता आपल्याला पणि असें म्हणतो (५.६१,८).
''इंद्राचे ऐतिहासिक अस्तित्व'' प्राचीन काळी इन्द्र व राजन् (राजा) हे शब्द एकाच अर्थाचे होते. म्हणून महेन्द याचा अर्थ मोठा राजा असा होता. यावरुन अनेक इन्द्र असले पाहिजेत असे दिसतें इद्-इन्द् राज्य करणें हा धात्वर्थ आहे. सुमन्तु नांवाच्या इन्द्राने चुमुरि, धुनि, पिप्रुं, शंबर व शुष्ण यांना ठार मारिलें (६.१९,८). द्वारपाल रंभिन् यास लांच देऊन, चुमुरि व धुनि यांना मारण्यांत आलें (२.१५,९). ॠजिश्वन् यांच्या मदतीनें, पिप्रु या नांवाच्या असुराचा पाडाव झाला (५.२९,११) व शूर अयास्यानें असुरांचा बराच नाश केला (१०.१३८,३४). उशिज जातीतील ॠजिश्वा यानें वृषभाच्या मदतीनें पिप्रूच्या छावणीची नासाडी केली (१०.९९,११); डोंगरात लपून बसलेल्या शंबरास इंद्राने पकडलें (२.१२.११): व त्याची नव्याण्णव शहरें धुळीस मिळविली (२.१९,६). या स्वारीत विष्णु हि प्रमुख होता (७.९९,५). मनुष् जातीच्या कल्याणासाठी, पृथ्वीवरील शतर्चस् नांवाच्या देशांत विष्णु तीन वेळां गेला (७.१००,४). आपण शिपिविष्ट आहों असें एकदां त्यानें सांगितले; तो व इन्द्र यांनी वृषशिप्राच्या (दासाच्या) सर्व युक्ती निष्फळ करुन टाकिल्या (७.९९,४). चुमुरि व धुनि यांप्रमाणें शुष्ण हाहि एक दस्यु होता (८.६,१४); दास व दस्यु निरनिराळे होते. दास हे एका जातीचें नांव असून, इंन्द्राचा शत्रु नमुचि हा याच जातीपैकी होता. कुत्साच्या हितासाठी इन्द्रानें यास मारिलें (४.१६,१२). संस्कृतांतील दस्यूलाच अवेस्तामध्यें दह्यु म्हणतात. याचा अर्थ जिल्हा असा होतो. दह्युपैति, दह्युपत याचा अर्थ जिल्ह्याचा अधिकारी असा होतो. पुराणांतील लुटारु हा शब्द दह्युपैतिस, दस्युपतिस यांतील लुटालुट किंवा नासधूस याला जो शब्द आहे त्याच्याशी जोडतां येईल, अवेस्तिक दह्यु याला संस्कृतांत देश म्हणतात. मराठीतील देसाई (देश-स्वामी) व देशमूख (देशमुख्य) यांनां अवेस्तामध्यें दह्युपैति, दह्युपत असें म्हणतात; जिल्ह्याच्या विभागांनां झन्तु व जिल्हापतीस झन्तुपैति असें म्हणतात. संस्कृतांतील जनपद यासच पुढें देश असें म्हणूं लागले. अवेस्तिक वीस् (खेडेगांव) यास संस्कृतांत विश असें म्हणतात; व वीस्पैति (खेड्याचा मुख्य) याला वेदांत विश्पति असें नांव आहे (१.३१,११). विश् याचा अर्थ खेडेगांवांतील शेतकरी लोक असाहि होतो. जुन्या संस्कृतांत विश् याचा अर्थ 'अन्न देणें' असा असून परिविश याचा अर्थ अन्न पुरविणारा असा होता. अवेस्तांतील न्मान (घर) याला संस्कृतांत, कुल व गृह असें म्हणतात; न्मानपैति याला कुलपति व गृहपति अशी नांवे आहेत; हल्ली कुल याचा अर्थ कुटूंब असा होतो. वीस विश् (खेडेगांव, खेडवळ) व वीस्पैति, विश्पति हे शब्द बनविल्यावर व व होम, सोम म्हणजे वीर या शब्दाचा ज्याचा रस मादक आहे अशा एका लहान झाडास जो शब्द होता त्याच्याशी गोधळ उडून गेल्यावर, संस्कृतापासून आर्यांची अवेस्तिक शाखा निराळी झाली. लॅटिन भाषा याच्या अगोदर वेगळी झाली व ग्रीक भाषा तर याहिपेक्षां अगोदर निराळी झाली. लॅटिन 'बिकु' व ग्रीक 'फोइको' यांचा अर्थ पूर्वी वीस्, विश् असाच होता. अनेक वीसांचा (खेडेगांव) एक झंतु (जिल्हाचा भाग) व पुष्कळ झंतूंचा दह्यु बनतो. राजकीय प्रगतीसाठीं देशविस्ताराची फार आवश्यकता वाटल्यामुळें, दह्यु, दस्यु हे देव व त्यांचे इन्द्र यांजबरोबर लढले; परंतु दस्यु व असुर हे फार प्रबल असल्यामुळें, देवांचे कांही एक चाचलें नाहीं; म्हणून आपल्यापेक्षां कमी दर्जाच्या लोकांचीहि देवांस मदत घ्यावी लागली. अवेस्तिक आर्यांची राजकीय प्रगति झाल्यावर दस्यूसंबंधी ॠचा रचिल्या असल्या पाहिजेंत हें यावरुन सिद्ध होतें. ''सर्व बाजूंनी मला पर्शृंचा त्रास होत आहे'' (१.१५,८). ''याद्वांपासून, तिरिंदरांत मी शंभर जनावरें व पर्शूप्रांतांत एक हजार जनावरें घेतली'' (८.६,४६); पृथु व पर्शु पुढे चालले'' (७.८३,१). दुस-या एका इन्द्रानें ''योनीचा मुलगा गिरी किंवा योन (पृथु) याचा नाश केला'' (८.४५,३०). या सूक्तांतील पर्शियन व पार्थियन यांचा उल्लेख महत्वाचा आहे. वैदिक सूक्तांचे कर्ते दास व आर्य यांनां इन्द्राचे शत्रु समजत असत (६.२२,१०). अवेस्तिक 'अइर्य' व वैदिक 'आर्य, अर्य' हे शब्द 'अयरा' देणें यापासून निघालेले आहेत. या शब्दांचा अर्थ 'ज्याला दान मिळालें आहे असा मनुष्य' असा होता. अरि किंवा अराति (८.११,३) म्हणजे दान करणरा याचें रुपांतर अरि अ राति, दान न करणारा असें होऊन, नंतर त्याचा अर्थ शत्रु (दान करण्याकडे ज्याची प्रवृत्ति नाही असा) असा झाला. इन्द्रानें लोखंडी वज्र (१.८०,८) आपल्या उजव्या हातांत घेतलें; ''ज्याने शंभर यज्ञ केले होते अशा एका इंद्राची आई (शवसी) अहाशुवाबद्लची हकीगत सांगत आहे'' (८.७७,२). या इन्द्राचें नांव ॠचीषम असें होतें; यानें हिंवाळयांत अर्बुदास जेरीस आणिलें (८.३२,२६). जनुष याचा अर्थ 'सामर्थ्य' असा आहे; म्हणून 'जज्ञान' याचा अर्थ 'सामर्थ्यवान् होऊन' असा होईल. अभि कतु याचा अर्थ अभिमुखं युध्यमान (-कडे तोड करुन लढणारा) असा करतात (३.३४,१०). कतु (लढणारा) याचा अर्थ सशक्त असा होतो (५.३५,१). हा शब्द व ग्रीक 'क्रातो' (शक्ति) हे एकच आहेत. हे शब्द 'कृ' ठार मारणें या शब्दापासून निघालेले आहेत. 'कृ' ठार मारणें हा शब्द गृह्यसूत्रांत आलेला आहे; व विशेषत: मधुपर्कविधीत आलेला आहे. शर म्हणजे बाण हा शब्द 'शृ लढणें किंवा नाश करणें यापासून निघाला आहे. क्रयादि धातु 'शृ' ऱ्हस्व केला म्हणजे ही गोष्ट कळून येईल. एका इन्द्राला हिन्वाचा पुत्र असें म्हटलें आहे (८.४०,९).''जेव्हां धनिष्टा आईनें शूर इन्द्राला आश्रय दिला तेव्हां मरुतांनीं त्याला भरभराटीस आणिलें (१०.७३,१). ॠग्वेदांतील प्रथम मंडलांतील, एकोणतिसाव्या सूक्तांत शिप्रिन् नांवाच्या एका इन्द्राचा उल्लेख केला आहे. तो श्रीमंत असल्यामुळें त्यानें आपल्या नोकरीस कांही प्रसिद्ध लुटारु ठेवून, एका गर्दभावर रात्रीं हल्ला केला. त्याच्या कांही लोकांस लांच देऊन वश करुन घेऊन बाकीच्या लोकांची इन्द्रानें कत्तल केली. गर्दभ व त्याची एक बायको हीं दोघे त्या कत्तलीत सांपडली; परंतु त्याची दुसरी एक बायको पळून गेली. अरे इन्द्रा, तुझ्या आईला कोणी वैधव्य आणिलें? गुप्तपणें हिंडत असतांना, तुला मारण्याचा कोणी प्रयत्न केला? पाय धरुन जेव्हां तूं आपल्या बापास ठार मारिलेंस. तेव्हां कोणत्या देवानें तुझें सांत्वन केलें'' (४.१८,१२)? ''मजपाशी अन्न नसल्यांमुळे, मीं कुत्र्याची आंतडी शिजविलीं; देवांपैकी कोणीहि माझे सांत्वन केलें नाही. माझ्या बायकोनें माझी काळजी घेतली नाही; नंतर श्येनानें माझ्यासाठी मधु आणिला (४.१८,१३).
अ ने क इं द्र.- पाकस्थामा या नांवाचा दुसरा एक इन्द्र होता; त्याच्या पित्याचे कुरुयाण असें होते (८.३,२१). हा इन्द्र व त्याचे विश्वासु मरुत् हे फार उदार होते. ''तूं सोमरस प्याला आहेस; तेव्हां हे इन्द्रा, तूं आतां आपल्या घराकडे जा; तुझ्या घरांत तुझी आवडती भार्या असून मधुर गीत चालले आहे'' (३.५३,६). 'इन्द्र' याचा अर्थ प्राचीन काळी ''देवांचा राजा'' असा होता. देवांच्या प्रत्येक जातीस एक एक इन्द्र होता. हे इन्द्र आपापसांत लढत असत. पणि, असुर, रक्षस् (१.१३३,५). यातु किंवा यातुधान. (७.१०४,२१). यांशिवाय सनक (१.३३,४); शिम्यु (१.१००,१८); ककिट (३.५३,१४); बिन नाकाचे दस्यु (५.२९,१०); चपट्या नाकाचे मोंगोलियन, दास, आर्य, नहुष (६.२२,१०); शरद् (६.२०,१०); वृचवित् (६.२१,६); अनु, द्रुह्यु, तृत्सु, (७,१८,१४-१५); किमीदिन (७,१०४,२३); वन्दन (७.२१,५); महिष (८.१२,८); वेकनाट, व कामकति वगैरे लोक इन्द्रांचे द्वेष्टे होते. अवृत्रन् म्हणजे लढले; वृत्र हा येथें धातु समजला आहे (४.२४,४). कदाचित असेंहि असेल की, इन्द्र हे देवांचे शत्रु असून, मरुतांच्या मदतीनें त्यांनी पूर्वेकडे देवांवर आपलें वर्चस्व ठेविलें असेल. परंतु ऐतिहासिक कालापूर्वीच्या ग्रीस देशांत, इंद्रांचे कांही एक चाललें नसेल. त्यावेळी तेथें थिओई लोकांनी अंद्रे लोकांवर अशा प्रकारें राज्य केलें कीं अन्द्रे लोकांचा फार -हास झाला; व अन्द्रे म्हणजे थिओ लोकांपेक्षा कमी दर्जाचें सामान्य लोक असा समज झाला. इकडे, पूर्वेकडे 'इन्द्र' हा शब्द -हास न पावतां त्याचा संबंध उच्च दर्जा किंवा वर्ग यांच्याशी कायम आहे. वैदिक वाङमयांत मरुत् हे इंद्राचे फार विश्वसनीय मित्र असें म्हटलें आहे. परंतु ग्रीसच्या पौराणिक कथेंत मरुतांच्या जोडीच्या दुस-या व्यक्ती नाहीत.