प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.

संस्कृतींचा तौलनिक अभ्यास :— हा एक महत्त्वाचा विषय आहे. कोणत्याहि संस्कतीच्या स्वरूपाचा निश्चय तिच्या प्राचीन कालींच झालेला असतो आणि यासाठीं तौलनिक अभ्यास करतांना निरनिराळ्या संस्कृतींचें प्राचीन स्वरूपच तुलणें अवश्य असतें. हें प्राथमिक स्वरूप फारसें गुंतागुंतींचें नसतें. ज्या अनेक संस्कृती एकमूल असतील त्यांचे सादृश्य त्यांच्या प्राथमिक रूपांत सांपडतें आणि एका सामान्य संस्कृतीपासून भिन्न संस्कृती कसकशा होत गेल्या यासंबंधींचे नियम या अभ्यासानें कळतात. भारतातींल आचारविचार, वेष, शासनसंस्था, कुटुंबघटना यांची प्राचीनतम इराण व यूरोप यांच्या प्राचीनतम अवशेषांशीं तुलना केली असतां आपणास एक बराच महत्त्वाचा इतिहास-भाग उपलब्ध होणार आहे. शब्द व आचार यांची तुल्यें जितकीं अधिक सांपडतील तितका हा अभ्यास अधिक परिपक्व होईल. या संबंधाचा परिश्रम जोरानें चालू आहे.

तुलनात्मक भाषाशास्त्राच्या दृष्टीनें प्राचीनतम गोष्टींची चिकित्सा करितेवेळीं नुसत्या शब्दसादृश्यावरच भर न देतां पूर्वकालीन वस्तूंचे, आचारांचे आणि कल्पनांचे जे अवशेष आजमितीस सांपडतात त्यांच्याकडेहि वेळोवेळीं लक्ष पुरविणें जरूर आहे हे वर सांगितलेंच आहे. असें लक्ष पुरविलें तरच भाषाशास्त्राचे ऐतिहासिक शोध टिकाऊ व उपयुक्त होतील. या दृष्टीनें पहातांना 'इंडोयूरोपीय' लोकांच्या प्राक्कालीन इतिहासाचें संशोधन करतेवेळीं तुलनात्मक भाषाशास्त्राबरोबरच पुराणवस्तुशास्त्राचाहि विचार चुकवितां येणार नाहीं. हे पुराणवास्तुशास्त्र अद्यापि बाल्यावस्थेंत आहे. या शास्त्राचा विषय म्हटला म्हणजे पूर्वींच्या काळच्या निरनिराळ्या राष्ट्रांच्या जुन्या संस्था, चालीरीती, इत्यादिकांचें तुलनात्मक परीक्षण करून त्या राष्ट्रांत सामान्य अशा चालीरीती कोणत्या आढळतात, कोणत्या चालीरीती प्राचीनतम माणसांपासून चालत आलेल्या आहेत याचा निर्णय करणें हा होय.

मूलगृहकाल म्हणजे प्राचीन 'इंडोयूरोपिअन पीरिअड' या शब्दसमूहाने 'इंडोयूरोपीय' राष्ट्रें ज्या वेळीं साधारणतः एकच भाषा बोलत होतीं, त्यांची संस्कृति ज्या कालांत साधारणातः एकच दर्जाची होती तो काळ  हा अर्थ विवक्षित आहे. मूलगृहीं असतांना त्यांच्यामध्ये अंतःस्थ काय भेद होते, मूलगृहकक्षेंत असतां हे लोक एकाच शासनसंस्थेखालीं होते कीं अनेक शासनसंस्थांखालीं होते हें आज पुराव्यानें सिद्ध झालेलें नाहीं. मोठा मनुष्यसमूह असला तर तो अनेक शासनसंस्थांखालीं असतो आणि ठोकून ठोकून एकत्र केल्याखेरीज तो एकराष्ट्रांतर्गत होत नाहीं ही स्वाभाविक प्रवृत्ति असल्यामुळें एका प्रदेशावर लहानलहान टोळ्यांची, गांवांचीं अनेक स्वतंत्र राष्ट्रकें होतीं असें गृहीत धरलें पाहिजे. मूलगृहींचा 'आर्यन्' समाज हा एक राष्ट्र किंवा राष्ट्रसंघहि नसून एकमेकांशीं बद्ध नसलेल्या राष्ट्रांचा समुच्चय होता ही कल्पना तिजविरुद्ध भक्कम पुरावा सांपडेपर्यंत गच्च धरून बसलें पाहिजे.

सांस्कृतिक स्थिति शोधावयाची तर संस्कृतीचीं अनेक अंगें म्हणजे खाद्यपेय, वस्त्रें, विभूषणें, गृह आणि तदनुषंगानें वायव्य, आरण्य व ग्राम्य पशू, मनुष्यमनुष्यांचा संबंध आणि तदनुषंगानें विवाह, व्यापार व राज्यव्यवस्था आणि समाजव्यवस्था यांचा विचार केला पाहिजे. मानवी कार्यक्रमांत निश्चितता आणण्यासाठीं केलेल्या कालमानादि गोष्टींकडे पाहिलें पाहिजे. तसेंच मेलेले लोक उर्फ पितृगण, देव, दैवतें यांच्या विषयींच्या कल्पनांनीं त्यांचें आयुर्नियमन कितपत होत होतें हेंहि पाहिलें पाहिजे.