प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.
हिंदुसमाजसमीक्षण— हिंदुसमाज हा जातींचा समुच्चय आहे. जग अनेक जातींनीं भरलेलें आहे. आपणां हिंदूंच्या दृष्टीनें त्या जातींपैकीं कांही जाती आपल्या जवळच्या आहेत असें आपण समजतों आणि असेंहि समजतों कीं, पावित्र्य व शुद्धता या दृष्टींनीं कांहीं जाती वरच्या पायरीच्या, कांहीं कमी योग्यतेच्या आणि कांही कनिष्ठ अशा आहेत. या सर्व जातींमध्यें ब्राह्मणांची जात त्यांच्या पावित्र्यामुळें इतरांपेक्षां श्रेष्ठ आहे. ख्रिस्ती व मुसुलमान किंवा इतर बाह्य लोक हे पावित्र्याच्या दृष्टीनें सर्वांत शेवटच्या पायरीवरचे आहेत. सर्व जग हें पावित्र्याच्या दृष्टीनें किंवा अस्पृश्यत्वाच्या दृष्टीनें एका सोपानपरंपरेंत असून त्यांत ब्राह्मण श्रेष्ठ आणि म्लेच्छ, बाह्य किंवा व्रात्य हे कनिष्ठ होत या प्रकारची सामाजिक भावना आपल्या व्यवहारांत व्यक्त होते.
सामाजिक उच्चनीचतेच्या प्रश्नामध्यें मताचा किंवा उपास्याचा प्रश्न नाहीं. तो प्रश्न असता तर जैनांची पदवी वेदास मानणार्या अनेक जातींपेक्षां उच्च नसती; तथापि अनेक ब्राह्मणानुयायी जातींचा जितका विटाळ ब्राह्मण समजतात तितका जैनांचा समजत नाहींत. आपणांस उलट असें आढळून येतें कीं, वर्हाडांत पुष्कळ जुन्या चालीचे ब्राह्मण देखील जैनांच्या हातचें पाणी पंचवीस वर्षापूर्वीं पीत असत, आणि त्यांस कायस्थप्रभू शिवलेल्या पाण्याचा विटाळ होत असे. यावरून समाजामध्यें असलेली जातींची पदवी मतमूलक नसून आचारमूलक आहे. निवृत्तमांस ब्राह्मणांनां अनेक आचारांमध्यें मांसपराङ्मुख जैन हे जवळचे व व्यवहाराला योग्य असे वाटत यांत आश्चर्य नाहीं. ख्रिस्ती व मुसुलमान यांची पदवी आज समाजांत महारांच्या पेक्षां वर आहे याचें कारण विचारमूलक नसून आचारमूलकच आहे. बाह्यांची पदवी जवळजवळ कनिष्ठ ठरली याचें कारण देखील आचारमूलकच आहे. ज्या समाजामध्यें गोमांस अत्यंत निषिद्ध आहे त्या समाजांत त्याचें सेवन करणार्यास जवळजवळ सर्वांत कनिष्ठ पद प्राप्त व्हांवें यांत नवल तें कोणतें ? बाहेर दिसणारें स्वरूपच लक्षांत घेतां ख्रिस्ती व मुसुलमान यांचें आचरण महारांपेक्षां अधिक स्वच्छ दिसतें, त्यामुळें त्यांचा विटाळ महारांपेक्षां कमी मानण्यांत येतो.
मतमूलक भिन्नता किंवा उपास्यमूलक भिन्नता या गोष्टी हिंदुच्या दृष्टीनें फारच कमी महत्त्वाच्या आहेत तर ख्रिस्ती व मुसुलमान यांस हिंदुंनीं आपणांपेक्षां निराळें कां समजावें ? कारण एवढेंच कीं, हिंदुंपासून भिन्नत्व स्थापन करणार्या रेषा हिंदूंनीं ओढल्या नसून मुसुलमान, ख्रिस्ती, यांनींच ओढल्या आहेत. हिंदुंच्या दृष्टीनें परमार्थाविषयीं मत आणि तो साध्य करून घेण्यासाठीं उपयोगांत आणिलेलें साधन यामुळें मनुष्याचें सामाजिक पृथक्त्व स्थापन होत नाहीं, किंवा आपल्यासारखें परमार्थसाधन दुसर्यानें आचरिलें तर तेवढ्यानेंच त्याचा प्रवेश समाजांत फारसा होत नाहीं. जेव्हां विशिष्ट मतें मान्य करणारीं माणसें एकत्र जमून आपला समुच्चय बनवितील आणि त्यांचें पृथक्त्व स्थापन करण्याचा प्रयत्न करतील व जेव्हां त्या बनलेल्या समुच्चयाचा आचारहि एकस्वरूपाचा आणि हिंदू लोकांनीं जें आचरण कनिष्ठ म्हणून गणिलें आहे तें आचरण मान्य करणारा असा असेल तेव्हांच मात्र कोणी मनुष्य त्या संप्रदायाचा अनुयायी झाला असतां तो हिंदुसमाजापासून विभक्त होईल, म्हणजे तो आपल्या जातीला मुकून किंवा जातिबाह्य होऊन त्या जातीनें कनिष्ठ ठरविलेल्या जातींत प्रविष्ट होईल. मनुष्य ख्रिस्ती होतो याचा हिंदूंच्या दृष्टीनें अर्थ एवढाच कीं तो आपल्या जातींतून निघून ख्रिस्ती जातींत जातो.
हिंदु आणि अहिंदु यांमध्यें फरक तरी कोणता ? या प्रश्नाचें उत्तर देण्यास थोडीशी इतिहासाकडे नजर फेंकली पाहिजे. 'हिंदु' हा शब्द मुळींच परका. हा शब्द मुसुलमानी स्वारीपूर्वींच्या संस्कृत ग्रंथांत वापरण्यांत आलेला नाहीं. हिंदूंनां आपल्याशीं सदृश्य असा समुच्चय कोणता आहे हें ठरवून त्यास एक नांव देण्याचें कारणच कधीं पडलें नाहीं. जगांतील अनेक देश, राष्ट्रें आणि लोक यांच्या अस्तित्वाविषयीं प्राचीन भारतीय लोक पूर्णपणें अज्ञानी जरी नसले तरी उदासीन होते हें खास. परके जेव्हां त्यांच्या देशांत येत तेव्हां त्यांची परक्यांशी ओळख होई. परके येत ते व्यापारासाठीं, देश पहाण्यासाठीं किंवा देश जिंकण्याकरितां म्हणून येत. अशा काळीं येणारा परकीय त्याच्या राष्ट्राच्या किंवा जातीच्या नांवानेंच लोकांस माहीत होई आणि तो त्या जातीचा म्हणून समजांत वावरे. प्राचीनकालीं हिंदु आणि इतर यांमध्यें अंतर फारसें नव्हतें त्यामुळें परके आले आणि देश्य आचार घेतला म्हणजे ते नकळतच हिंदु होऊन जात. त्यांची एखादी स्वतंत्र जात बने एवढेंच. सारांश, प्राचीन काळच्या हिंदूंस असें वाटत नव्हतें कीं देशांत ज्या अनेक विविधाचारयुक्त जाती आहेत त्यांपेक्षां नवीन आलेले परकी लोक कांहीं निराळे आहेत. आपण व इतर जगांतील लोक यांमध्यें सामाजिक भिन्नता विशेष आहे अशी भावनाच नव्हती. जो मनुष्य मध्यदेशांत राही त्यास कंदाहार, अफगाणिस्तान, पंजाब किंवा सयाम या देशांतील लोक अशिष्ट किंवा संस्कृतीमध्यें कमी किंवा म्लेच्छहि वाटत, पण दक्षिणेंतील लोकहि त्यास तसेच वाटत. अनेक धर्मशास्त्रकारांनीं जे लोक दक्षिणेंत, बंगालमध्यें किंवा पंजाबांत जातील त्यांस प्रायश्चित्त सांगितलें आहे. जो मनुष्य आपला प्रांत सोडून दुसर्या प्रांतांत जाईल तेथें तो परका आणि त्याच्या लोकांच्या दृष्टीनें तो परत आल्यानंतर परदेशगमनाबद्दल प्रायश्चित्तार्ह होई. तो परदेश बंगाल, सयाम, यवद्वीप, चीन, तिबेट, पंजाब, इराण, किंवा हिंदुस्थानचा दक्षिणभाग यांपैकीं कोणता कां असेना ? थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे भारतीयभावना किंवा हिंदुत्वभावना प्राचीनकाळीं लोकांस नव्हती. तेव्हां परकीयभावना ही तरी कोठून येणार ?
प्राचीन हिंदू परदेशगमनाचें पातक मानीत होते तथापि परदेशगमनानें समाजांतील स्थान नाहींसें होऊन मनुष्य परकीय समाजाचा अवयव बनतो अशी त्यांची भावना नव्हती. आलेली अशुद्धि दूर करावी एवढाच परदेशगमनप्रायश्चित्ताचा उद्देश असे. अग्निपुराणांत म्हटलें आहे कीं, "म्लेच्छैर्गतानां चोरैर्वा कान्तारे वा प्रवासिनाम् । भक्ष्याभक्ष्यविशुध्द्यर्थं तेषां वक्ष्यामि निष्कृतिम् ।। पुनः प्राप्य स्वदेशं च वर्णानामनुपूर्वशः। कृच्छ्रस्यान्ते ब्राह्मणस्तु पुनःसंस्कारमर्हति ।।" हे श्लोक अनेक दृष्टींनीं महत्त्वाचे आहेत. निष्कृति जी करावयाची ती केवळ परदेशगमनासाठीं नसून भक्ष्याभक्ष्यविशुद्धीसाठीं होती; आणि याकरितां जें प्रायश्चित म्लेच्छांच्या देशीं जाण्याबद्दल असे तेंच प्रायश्चित्त वानप्रस्थाश्रमाचे एकीकडे गोडवे गात असतां अरण्यांत जाऊन राहाण्याबद्दल असे. कारण दोन्ही ठिकाणीं भक्ष्याभक्ष्यविषयक शुद्धि राहणें सारखेंच अशक्य असे हें यांतील मूळ होतें. यावरून जगांतील जो जमिनीचा तुकडा आपला नव्हे अशा तुकड्याचा किंवा म्लेच्छांचाहि विटाळ प्राचीन भारतीयांनां नसून भक्ष्याभक्ष्याचा मात्र विटाळ होता ही गोष्ट बाहेर पडते आणि समाजांत उच्चनीच स्थान किंवा समाजाचा बहिष्कार यांच्याविषयींचा विचार ज्या काळीं वरील श्लोक तयार झाले त्या काळीं केवळ आचाराच्या शुद्धताशुद्धतेवरून ठरत असे हें उघड होतें.
भारतीय भावनेचा अभाव आणि भारतीय वैशिष्ट्याच्या जाणीवीचा अभाव प्राचीन भारतीयांत कां होता हें जाणण्यासाठीं एकत्वाची भावना व्यक्तींच्या समूहास येते तरी कशी याचा विचार केला पाहीजे. जर कांहीं लोकांस आपण एकवंशीय आहोंत अशी भावना असेल तर त्या लोकांस एकत्व आणण्यास आणि इतरांपासून पृथक्त्व भासविण्यास तेवढें कारण पुरेसें आहे. तथापि अशी एकवंशत्वाची भावना फार लहान वर्गांतच असावयाची. हिंदुस्थानांतील निरनिराळ्या जाती हीं या प्रकारची उदाहरणें होत. मोठ्या समूहांमध्यें एकत्वस्थापन आणि एकत्वभावना हीं निराळ्या क्रियेनें उत्पन्न होतात. एका शासनसंस्थेखालीं असल्यामुळें एकत्वाची भावना उत्पन्न होते. आचारांतलें आणि राहणींतलें सादृश्य याच्या योगानेंहि एकत्वाची भावना उत्पन्न होईल; पण ती अशा वेळेस उत्पन्न होऊं शकते कीं जेव्हां विसदृश समाज डोळ्यापुढें असतात, आणि सदृश व विसदृश यांचें पृथक्करण करणें लोकांस शक्य होतें.
जेव्हां कांही लोक एकच उपास्य अंगिकारितात किंवा एकच गुरु करितात तेव्हां उपास्यमूलक किंवा आचार्यमूलक एकत्व त्यांच्या मनावर ठसतें, आणि त्याबरोबर आपण इतरांपासून वेगळे आहोंत ही जाणीव त्यांच्यांत उत्पन्न होते. या तर्हेनें अनेक संप्रदाय उत्पन्न झाले आहेत. ख्रिस्ती, मुसुलमान, ब्रह्मो, आर्यसमाजी हे याच तर्हेचे संप्रदाय होत. ख्रिस्ती आणि मुसुलमान यांच्या बाबतींत असें म्हणतां येईल कीं, जेव्हां त्यांनीं आपले प्रचारक परदेशीं पाठविले तेव्हांच म्हणजे सुरवातीसच त्यांच्या ठिकाणीं, आपल्यापासून इतर जग भिन्न आहे ही कल्पना आणि तिजबरोबर आपण (ख्रस्ती किंवा मुसुलमान) तेवढे एक आहोंत ही कल्पना, या दोन्ही कल्पना एकसमयावच्छेदेंकरून वागत होत्या. कालांतरानें ख्रिस्त्यांच्या टोळीमध्यें जो समाज होता तो इतरांच्या म्हणजे टोळीबाहेरच्या लोकांच्या समावेशानें वाढत गेला. तथापि त्या विस्तारानें त्यांची एकत्वोत्पादक कल्पना विस्तृत झाली नाहीं. ती होती तशीच आकुंचित राहिली. मुसुलमानांचीहि गोष्ट अशीच झाली. यावरून असें दिसून येईल कीं, संप्रदायांचें किंवा यूरोपियन लोक ज्या मतसमुच्चयांनां 'रिलिजन' म्हणतात त्यांचें मूलस्वरूप भेदमूलक आहे. आपण आणि इतर यांमधील भेदची जाणीव कायम ठेवावयाची, आंत माणसें मात्र ज्यास्त ओढावयाचीं पण भेदकारक गोष्टी नाहींशा होऊं द्यावयाच्या नाहींत, अशी संप्रदयांची प्रवृत्ति असे. आपल्यासारखे ज्यांचे विचार नसतील त्यांस निराळें समजावयाचें, एकत्वभाव आपल्या समानोपास्य वर्गापुरताच ठेवावयाचा आणि आपल्या वर्गांत इतरांपासून भिन्नत्वाची आणि इतरांच्या शत्रुत्वाची जाणीव करून द्यावयाची, असें संप्रदायांचें सामान्य स्वरूप आहे. संप्रदायांचें हें स्वरूप जो ओळखतो त्यास या संप्रदयांचे प्रचारक आपल्या विश्वव्यापित्वाची आणि विश्वबंधुत्वाची बढाई मारतांत तेव्हां मोठी मौज वाटते.