प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.
भारतेतिहासाभ्यासास साहित्य :— मूलगृहकालावर झालेलें संशोधन अल्पप्रमाणानें द्यावयाचें म्हटलें तरी त्याचें स्वतंत्रपणें विवेचन पाहिजे. असें विवेचन प्रारंभींच देणें अप्रस्तुत होईल म्हणून त्या खटाटोपांत आम्ही सध्यां पडत नाही. या अभ्यासाचीं जीं अनेक अंगे आहेत त्यांची सामान्य कल्पना आतांपर्यंत दिलेल्या माहितीवरून वाचकांच्या लक्षांत येईलच. आतां भारतीय इतिहासाचें अध्ययन करण्यासाठीं उपांगें म्हणून ज्या शास्त्रांची वृद्धि झाली आहे त्यांची सामान्य कल्पना येण्यासाठीं यादीच्या रूपानें कांहीं माहिती खालीं देतों. या यादीच्या योगानें आपली कल्पना विस्तृत होईल. तथापि ही यादी संपूर्ण आहे असें मात्र समजूं नये.
(१) भाषांचा तौलनिक अभ्यास. यांत वेदभाषा, संस्कृत, युरोपांतील जुन्या भाषा आणि इराणी जुन्या भाषा यांचा उपयोग वेदकालपूर्वस्थिति काढण्यासाठीं करावयाचा.
(२) संस्कृत भाषेचा ऐतिहासिक अभ्यास. वेदकालांत कोणते शब्द प्रचलित होते, पाणिनीस कोणते शब्द ठाऊक होते, वेदकालीं शब्दांचा अर्थ काय होता, पाणिनिकालीं काय होता, अर्थांत फरक झाला असल्यास त्यास सामाजिक कारणें काय झालीं, इत्यादि गोष्टींचा अभ्यास.
(३) वेदभाषा, संस्कृत, प्राचीन प्राकृत भाषा आणि अर्वाचीन भाषा यांचा तौलनिक अभ्यास. यावरून भाषांच्या अपभ्रंशांचे नियम, लोकांचें इतस्ततः भ्रमण, इत्यादि काढतां येईल.
(४) हिंदुस्थानांतील स्थावर आणि जंगम लिखाणांचा अभ्यास. हा अभ्यास अनेक तर्हांनीं करतां येईल. यांचा भाषेच्या दृष्टींनें अभ्यास केला तर वर सांगितलेल्या भाषांच्याच अभ्यासास कांही अंशी हा एक भाग होईल, तथापि लिखाणविषयक अभ्यासाची व्याप्ति तेवढीच नाहीं. हिंदुंचीं व हिंदुस्थानाचीं लिखाणें केवळ संस्कृतसंभव भाषांतच नाहींत. हिंदुस्थानांतील द्राविडी भाषांत व इतर बाहेरच्या भाषांत देखील लिखाणें आहेत. त्याप्रमाणेंच हिंदुस्थानाच्या बाहेर हिंदु संस्कृति जेथें गेली आहे तेथील लिखाणें संस्कृत किंवा स्थानिक भाषांतून आहेत. यामुळें लिखाणांचा अभ्यास करण्यासाठीं अनेक भाषांचा अभ्यास भारतीय इतिहासाच्या अभ्यासकास उपयुक्त आहे. याशिवाय लिखाणें एकाच लिपींत नसून अनेक प्रकारच्या लिपींत लिहिलीं किंवा कोरलीं गेलीं आहेत. आणि यामुळें लिपींत अभ्यास हाहि एक महत्त्वाचा अभ्यास होऊन बसला आहे.
(५) लिखाणांच्या अभ्यासाशीं संबद्ध असा दुसरा एक अभ्यास म्हटला म्हणजे "मुद्राविज्ञान" होय. आजपर्यंत निरनिराळीं राजघराणीं होऊन गेलीं. त्यांच्या मुद्रांचे उर्फ नाण्यांचे अवशेष आज शिल्लक आहेत, तेहि एक अभ्यासाचा मोठा विषय झाले आहेत.
(६) भारतीय अभ्यासाचा आणखी एक भाग म्हटला म्हणजे संस्कृत भाषेशीं असंबद्ध अशा भारतांतील आणि भारतीय संस्कृतीचा ज्यांवर परिणाम झाला त्या प्रदेशांतील भाषांचा अभ्यास होय. द्राविडी भाषांचा अभ्यास आणि पूर्वेकडील ज्या प्रदेशांत भारतीयांच्या वसाहती झाल्या तेथील भाषांचा अभ्यास या वर्गात मोडतो. नवीन शब्द संस्कृत भाषेंतून इतर भाषांत ज्याप्रमाणानें अधिक जातात त्या प्रमाणानें त्या देशांत भारतीय संस्कृतीचा विकास कितपत झाला याचें मोजमाप करतां येतें. शिवाय संस्कृत भाषेचा अपभ्रंश दाखविणारे शब्द तेथें आढळले तर त्यांचें हिंदुस्थानांतील अपभ्रंशांशीं नातें जोडतां येतें, आणि त्यामुळें हिंदुस्थानांतील कोणते लोक तिकडे गेले, कोणत्या प्रांतांतून गेले, कोणत्या काळीं गेले, कोणत्या मार्गानें गेले इत्यादि प्रश्न सोडविण्यास मदत होते. तसेंच भाषांतील वाङ्मयहि पाहिलें पाहिजे. कारण त्या वाङ्मयांत भारतीय वाङ्मयाचीं रूपांतरें किंवा अवस्थांतरें दृष्टीस पडतात.