प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.

प्राचीन भारतीय भाषांचे वर्गीकरण - वरील विवेचनावरून प्राचीन भारतीय भाषांचें वर्गीकरण थोडक्यांत पुढें दिल्याप्रमाणें मांडतां येईल. (१) वेदभाषा. (अ) पूर्वकालीन - विशेषतः ऋग्वेदांतील स्तोत्रमंत्रांची भाषा. (आ) उत्तरकालीन - ब्राह्मण, सुत्रें व फार पुरातन नव्हत अशा-विशेषतः ऋग्वेदाखेरीज इतर वेदांतील-स्तोत्रमंत्रांची भाषा. (२) संस्कृत. (अ) प्राचीन संस्कृत— वैदिक गद्य ग्रंथांची (त्यांतील मंत्र खेरीज करून) व पाणिनीची भाषा. (आ) ऱामायणमहाभारतांतील संस्कृत. (इ) पाणिनीय संस्कृत— पाणिनीच्या नियमानुसार संस्कृत साहित्यग्रंथांतून लिहिलेली संस्कृत  भाषा. (३) प्राकृत उर्फ अपसृष्ट भाषा— संस्कृत भाषेच्या वाढीबरोबरच भारतीय आर्य लोकांमध्यें प्रचलित असलेल्या इतर भाषांची साहजिकपणें वाढ होत गेली. या भाषा व पोटभाषा प्रत्यक्ष संस्कृतवरून निघाल्या नसून, प्राचीन आर्ष भाषा व संस्कृत भाषा यांच्या मुळाशीं असलेल्या सामान्य जनतेच्या भाषांपासून जन्म पावल्या असल्या पाहिजेत. त्यांचें वेदभाषेशीं अगर पाणिनीय भाषेंशीं माता व कन्या हें निकटचें नातें नसून केवळ सामान्य आप्तसंबंधाचें नातें आहे. परदेशांतून हिंदुस्थांनांत आलेले आर्य लोक जसजसे पश्चिमेकडून पूर्वेकडे वसती करीत गेले, तसतसे पुष्कळ प्रांतिक भाषाभेद उत्पन्न होत गेले. (संहितेमध्यें जो भाषाभेद दृष्टीस पडतो त्यांचे कारणहि कांहीं अंशीं प्रांतिक भाषाभेद हेंच असावें). या भाषाभेदांतूनच उत्तरकालीन प्राकृत भाषा निघाल्या. सर्वांत जुने शिलालेख संस्कृत भाषेंत नसून प्राकृत अथवा अपसृष्ट म्हणजे पाणिनीय संस्कृत भाषेपासून दूर सरकलेल्या भाषांत आहेत. या लेखांवरून या लौकिक भाषांतील परस्परभेद दृष्टोत्पत्तीस येतो. अपसृष्ट भाषांपैकीं कांही थोड्या अभिजात भाषांच्या पदवीस पोंचल्या आहेत, त्या खालीं दिल्या आहेत.

(१) पाली भाषा व तिची उत्पत्ति :— या अपसृष्ट भाषांपैकीं सर्वांत जुनी पाली ही होय. ही सिलोन, ब्रह्मदेश, व सयाम येथील बौद्ध भिक्षुवर्गाची भाषा होय. बौद्ध संप्रदायाचे पूज्य व पवित्र असे धार्मिक ग्रंथ याच भाषेंत लिहिलेले आहेत. बुद्धास संस्कृत येत असो अगर नसो, तो संस्कृत भाषेंत उपदेश करीत नसून लोकभाषेंत करीत असे हें मात्र निःसंशय आहे. बुद्धाचें प्रथम कार्यक्षेत्र मगध असल्यामुळें त्याची 'पालीभासा' म्हणजे मागधीच होय, असें बौद्धांचें म्हणणें आहे. परंतु या म्हणण्यावर आपेक्ष घेण्यास जागा आहे. कारण मगधदेशीय भाषा जी आपणास इतर साधनांवरून उपलब्ध झाली आहे, ती पाली भाषेहून स्पष्टपणें निराळी दिसते. पाली भाषा ही उज्जयिनिच्या भाषेपासून निघाली असावी ही गोष्ट प्राकृत भाषांच्या अभ्यासकांस वरील बौद्धांच्या कल्पनेपेक्षां जास्त संभवनीय दिसते. तें कसेहि असो. पाली भाषेंत लिहिलेले जे ग्रंथ आहेत, तेच आपणाला प्राचीन व मूळच्या बौद्ध धर्माचें व संप्रदायाचें यथार्थ ज्ञान करून घेण्याच्या कामीं सर्वांत अधिक विश्वसनीय आहेत, एवढें मात्र खरें.

पाली या शब्दाची व्युत्पत्ति.— पाली या शब्दाचा मूळ अर्थ 'पाळी' (रांग) असा असून नंतर नियम, व्यवस्था वगैरे अर्थ याच्या अर्थकक्षेंत शिरला व पुढें सांप्रदायिक नियम असा त्याचा अर्थ होऊन शेवटीं या सांप्रदायिक ग्रंथांची भाषा या अर्थी त्याचा प्रयोग होऊं लागला. हा शेवटचा अर्थ या शब्दाला प्राप्‍त होण्याचें कारण सिंहली टीकाग्रंथांपासून मूलग्रंथांच्या भाषेंचें पृथकत्व स्थापित करण्याचा कांही ग्रंथकारांचा हेतु हें होय, असा विंटरनिट्झ व इतर पाश्चात्य ग्रंथकार तर्क करितात. प्रकट (म्ह. उघडी=सामान्य जनांची) या शब्दापासून 'पाली' शब्दाची व्युत्पत्ति रा. राजवाडे यांनीं आपल्या ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेंत लाविली आहे. या पंडितांच्या वरील व्युत्पत्तींविषयीं येथें नमूद केलें पाहिजे कीं, 'प्रकट' किंवा 'पाली' हे दोन्ही शब्द किंवा यांचीं पूर्वरूपें वरील अर्थानें संहितांत अगर ब्राह्मणांत आढळत नाहींत.

(२) 'गाथाभाषा' अथवा 'मिश्रसंस्कृत' :— बौद्ध वाङ्‌मय पाली भाषेंत जसें आहे तसें संस्कृतांतहि आहे. या वाङ्‌मयग्रंथांतील गद्यभाग बहुधा संस्कृत आहे, व मधून मधून जो पद्यभाग अथवा गाथा आहेत त्या एका देश्य भाषेंत आहेत. हिला 'गाथाभाषा' असें नांव देतात. वरील ग्रंथांतील कांही गद्यभागहि या गाथाभाषेंत आहेत. तसेच केवळ या भाषेंत लिहिलेले असे कांहीं स्वतंत्र ग्रंथहि आहेत. या भाषेंत पुष्कळ संस्कृत प्रत्यय व इतर संस्कृतांतील प्रयोग मिसळले असल्यामुळें हिला सेनार्ट यानें 'मिश्र संस्कृत' असें नांव सुचविलें आहे.