प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.
प्राचीन भारतीय भाषांचे वर्गीकरण - वरील विवेचनावरून प्राचीन भारतीय भाषांचें वर्गीकरण थोडक्यांत पुढें दिल्याप्रमाणें मांडतां येईल. (१) वेदभाषा. (अ) पूर्वकालीन - विशेषतः ऋग्वेदांतील स्तोत्रमंत्रांची भाषा. (आ) उत्तरकालीन - ब्राह्मण, सुत्रें व फार पुरातन नव्हत अशा-विशेषतः ऋग्वेदाखेरीज इतर वेदांतील-स्तोत्रमंत्रांची भाषा. (२) संस्कृत. (अ) प्राचीन संस्कृत— वैदिक गद्य ग्रंथांची (त्यांतील मंत्र खेरीज करून) व पाणिनीची भाषा. (आ) ऱामायणमहाभारतांतील संस्कृत. (इ) पाणिनीय संस्कृत— पाणिनीच्या नियमानुसार संस्कृत साहित्यग्रंथांतून लिहिलेली संस्कृत भाषा. (३) प्राकृत उर्फ अपसृष्ट भाषा— संस्कृत भाषेच्या वाढीबरोबरच भारतीय आर्य लोकांमध्यें प्रचलित असलेल्या इतर भाषांची साहजिकपणें वाढ होत गेली. या भाषा व पोटभाषा प्रत्यक्ष संस्कृतवरून निघाल्या नसून, प्राचीन आर्ष भाषा व संस्कृत भाषा यांच्या मुळाशीं असलेल्या सामान्य जनतेच्या भाषांपासून जन्म पावल्या असल्या पाहिजेत. त्यांचें वेदभाषेशीं अगर पाणिनीय भाषेंशीं माता व कन्या हें निकटचें नातें नसून केवळ सामान्य आप्तसंबंधाचें नातें आहे. परदेशांतून हिंदुस्थांनांत आलेले आर्य लोक जसजसे पश्चिमेकडून पूर्वेकडे वसती करीत गेले, तसतसे पुष्कळ प्रांतिक भाषाभेद उत्पन्न होत गेले. (संहितेमध्यें जो भाषाभेद दृष्टीस पडतो त्यांचे कारणहि कांहीं अंशीं प्रांतिक भाषाभेद हेंच असावें). या भाषाभेदांतूनच उत्तरकालीन प्राकृत भाषा निघाल्या. सर्वांत जुने शिलालेख संस्कृत भाषेंत नसून प्राकृत अथवा अपसृष्ट म्हणजे पाणिनीय संस्कृत भाषेपासून दूर सरकलेल्या भाषांत आहेत. या लेखांवरून या लौकिक भाषांतील परस्परभेद दृष्टोत्पत्तीस येतो. अपसृष्ट भाषांपैकीं कांही थोड्या अभिजात भाषांच्या पदवीस पोंचल्या आहेत, त्या खालीं दिल्या आहेत.
(१) पाली भाषा व तिची उत्पत्ति :— या अपसृष्ट भाषांपैकीं सर्वांत जुनी पाली ही होय. ही सिलोन, ब्रह्मदेश, व सयाम येथील बौद्ध भिक्षुवर्गाची भाषा होय. बौद्ध संप्रदायाचे पूज्य व पवित्र असे धार्मिक ग्रंथ याच भाषेंत लिहिलेले आहेत. बुद्धास संस्कृत येत असो अगर नसो, तो संस्कृत भाषेंत उपदेश करीत नसून लोकभाषेंत करीत असे हें मात्र निःसंशय आहे. बुद्धाचें प्रथम कार्यक्षेत्र मगध असल्यामुळें त्याची 'पालीभासा' म्हणजे मागधीच होय, असें बौद्धांचें म्हणणें आहे. परंतु या म्हणण्यावर आपेक्ष घेण्यास जागा आहे. कारण मगधदेशीय भाषा जी आपणास इतर साधनांवरून उपलब्ध झाली आहे, ती पाली भाषेहून स्पष्टपणें निराळी दिसते. पाली भाषा ही उज्जयिनिच्या भाषेपासून निघाली असावी ही गोष्ट प्राकृत भाषांच्या अभ्यासकांस वरील बौद्धांच्या कल्पनेपेक्षां जास्त संभवनीय दिसते. तें कसेहि असो. पाली भाषेंत लिहिलेले जे ग्रंथ आहेत, तेच आपणाला प्राचीन व मूळच्या बौद्ध धर्माचें व संप्रदायाचें यथार्थ ज्ञान करून घेण्याच्या कामीं सर्वांत अधिक विश्वसनीय आहेत, एवढें मात्र खरें.
पाली या शब्दाची व्युत्पत्ति.— पाली या शब्दाचा मूळ अर्थ 'पाळी' (रांग) असा असून नंतर नियम, व्यवस्था वगैरे अर्थ याच्या अर्थकक्षेंत शिरला व पुढें सांप्रदायिक नियम असा त्याचा अर्थ होऊन शेवटीं या सांप्रदायिक ग्रंथांची भाषा या अर्थी त्याचा प्रयोग होऊं लागला. हा शेवटचा अर्थ या शब्दाला प्राप्त होण्याचें कारण सिंहली टीकाग्रंथांपासून मूलग्रंथांच्या भाषेंचें पृथकत्व स्थापित करण्याचा कांही ग्रंथकारांचा हेतु हें होय, असा विंटरनिट्झ व इतर पाश्चात्य ग्रंथकार तर्क करितात. प्रकट (म्ह. उघडी=सामान्य जनांची) या शब्दापासून 'पाली' शब्दाची व्युत्पत्ति रा. राजवाडे यांनीं आपल्या ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेंत लाविली आहे. या पंडितांच्या वरील व्युत्पत्तींविषयीं येथें नमूद केलें पाहिजे कीं, 'प्रकट' किंवा 'पाली' हे दोन्ही शब्द किंवा यांचीं पूर्वरूपें वरील अर्थानें संहितांत अगर ब्राह्मणांत आढळत नाहींत.
(२) 'गाथाभाषा' अथवा 'मिश्रसंस्कृत' :— बौद्ध वाङ्मय पाली भाषेंत जसें आहे तसें संस्कृतांतहि आहे. या वाङ्मयग्रंथांतील गद्यभाग बहुधा संस्कृत आहे, व मधून मधून जो पद्यभाग अथवा गाथा आहेत त्या एका देश्य भाषेंत आहेत. हिला 'गाथाभाषा' असें नांव देतात. वरील ग्रंथांतील कांही गद्यभागहि या गाथाभाषेंत आहेत. तसेच केवळ या भाषेंत लिहिलेले असे कांहीं स्वतंत्र ग्रंथहि आहेत. या भाषेंत पुष्कळ संस्कृत प्रत्यय व इतर संस्कृतांतील प्रयोग मिसळले असल्यामुळें हिला सेनार्ट यानें 'मिश्र संस्कृत' असें नांव सुचविलें आहे.
(३) जैन प्राकृत व जैन महाराष्ट्री :— बौद्ध लोकांप्रमाणें जैन लोकांनींहि आपल्या ग्रंथांतून संस्कृत भाषा न वापरतां प्राकृत भाषा वापरल्या आहेत. यांच्या प्राकृत भाषा दोन आहेत.
(अ) जैन प्राकृत - हिलाच अर्धमागधी किंवा आर्ष म्हणतात. जुनें जैन धर्मशास्त्र या भाषेंत आहे.
(आ) जैन महराष्ट्री - भाषेंत जैन धर्मग्रंथांवरील टीका व इतर 'द्वैआशराय' सारखीं लौकिक जैन काव्यें लिहिलेलीं आहेत. या जैन महाराष्ट्रीचें स्वरूप लौकिक वाङ्मयाची जी सामान्य भाषा महाराष्ट्री तिच्याशीं अगदीं सदृश असें आहे.
(४) महाराष्ट्री - ही महाराष्ट्राची जुनी भाषा होय. प्राकृतांमध्यें हीच सर्वांत उत्तम समजतात. व जेव्हां जुने ग्रंथकार नुसतें प्राकृत असें म्हणातात, तेव्हां त्यांचा आशय 'महाराष्ट्री' असा असतो. हिचा उपयोग मुख्यत्वेंकरून गाण्यांतून व विशेषतः नाटकांतील गीतांत करितात. हींत कांहीं आख्यानेंहि आहेत.
(५) शौरसेनी - नाटकांतील इतर प्राकृत भाषांमध्यें शौरसेनी ही नाटकांतील गद्यांत थोर कुळांतील स्त्रियांच्या तोंडीं असते. शूरसेन देशांतील म्हणजे मथुरेच्या आसपासच्या प्रदेशांतील भाषेवर हिची उभारणी झालेली आहे.
(६) मागधी - ही मगध देशाची भाषा होय. ही नाटकांतून खालच्या वर्गांतील पात्रांच्या तोंडीं घालतात.
(७) पैशाची - ही भाषा समाजांती सर्वांत खालच्या दर्जाच्या लोकांच्या तोंडीं नाटकांतून घालतात. ही मूळची पिशाच्च जातीच्या लोकांची भाषा असावी. हिलाच राक्षसांची भाषा म्हणत. या भाषेंत गुणाढ्याचा 'बृहत्कथा' म्हणून एक प्रख्यात कथाग्रंथ आहे. हिचा संबंध ग्रियर्सननें काफरिस्तान येथील प्रचलित भाषेंशीं व काश्मिरी भाषेशीं जोडिला आहे; आणि तें मत मान्य करून रा. राजवाडे
'पेशावर' हा शब्द 'पिशाच्चपुर' या शब्दापासून व्युत्पादितात. {kosh मेस्तक. भा. इ. सं. मं.}*{/kosh}
(८) 'अपभ्रंश' या नांवाखालीं पुष्कळ प्राकृत भाषा आलेल्या आहेत. त्या नाटकांतून मधून मधून दृष्टीस पडतात. अपभ्रंश या शब्दाचा मूळ अर्थ संस्कृतेतर भाषा असाच होता. नंतर हा शब्द प्रचारांतील लोकभाषांस लावण्यांत येऊन शेवटीं विवक्षित प्राकृत भाषांचा निदर्शक बनला. पुष्कळशा हिंदी म्हणून समजल्या जाणार्या जुन्या काव्यांची भाषा खरोखर पहातां अपभ्रंश भाषा आहे. कित्येक लेखकांनीं तामिळ, तेलुगु इ. भाषांचें यथार्थ स्वरूप न समजून त्यांस अपभ्रंश म्हटलें आहे.
अर्वाचीन भाषा व पोटभाषा :— सामान्यतः ख्रि. श. च्या दहाव्या शतकापासून पुढें अर्वाचीन भाषा ही भाषावस्था सुरू होते. बाराव्या शतकापासून अर्वाचीन भाषेंत वाङ्मय तयार होऊं लागलें. हे वाङ्मय कांहींसें स्वतंत्र रूपाचें व काहींसें संस्कृतवाङ्मयावलंबी असें होतें.
मराठी व इतर प्रचलित भाषा :— मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयीं लिहितांना रा. राजवाडे असें सांगतात कीं, आन्ध्रभृत्यांच्या स्थानभ्रंशानंतर म्हणजे ख्रिस्ती शकाच्या तिसर्या शतकांत जें अराजक माजलें, त्यांत महाराष्ट्रीय पंडितवर्ग नष्ट झाला आणि भाषा अनागरांच्या हातांत जाऊन भ्रष्ट होत चालली व बरेच अपभ्रंष झाल्यावर सहाव्या किंवा आठव्या शतकांत सध्यांची मराठी तयार झाली. {kosh विश्ववृत्त. व. २. अं. ३.}*{/kosh} अपसृष्ट भाषांपासून तयार झालेल्या अर्वाचीन भाषांत सध्या प्रमुख म्हणजे खालील भाषा होत.
पश्चिम हिंदुस्थांनात — सिंधी, गुजराथी, पंजाबी व पाश्चिम हिंदी. उत्तर हिंदुस्थानांत—गढवाली (सतलज व भागीरथी यांचे दरम्यान), कुमाउनी (गंगा व घोग्रा यांचे दरम्यान), काश्मिरी व नेपाळी. दक्षिण हिंदुस्थानांत—मराठी. व पूर्व हिंदुस्थानांत—बिहारी, बंगाली, उडिया व आसामी.
उर्दु अथवा हिंदुस्थानी :— याखेरीज उर्दु अथवा हिंदुस्थानी भाषा ही दिल्लीच्या आसमंताद्भागीं छावण्यांत उदयास आली. सोळाव्या शतकांत या भाषेंत ग्रंथरचना होऊं लागली. हल्लीं हिंदुस्थानी भाषा सर्वत्र चालते.
सिलोनमधील सिंहली भाषा हीहि एका अपसृष्ट भाषेपासून निघाली असून तिचीही मूळ भाषा 'इंडोजर्मानिक'च होय. बौद्ध संप्रदायाचा व वाङ्मयाचा सिलोनमध्यें प्रवेश झाल्यानंतर लवकरच तेथें या भाषेंत ग्रंथ तयार होऊं लागले. प्रथमचे ग्रंथ धर्मग्रंथांवरील टीकांच्या रूपाचे असून पुढें संस्कृत काव्यांतील कल्पनांच्या आधारें लौकिक वाङ्मयहि तयार झालें.
आतांपर्यंत वर सांगितलेल्या हिंदुस्थानांतील सर्व भाषा 'इंडोजर्मानिक' उर्फ आर्यन् वंशांतीलच आहेत. परंतु दक्षिण हिंदुस्थानांत मराठी वगैरे वरील कांहीं भाषा प्रचारांत असून शिवाय इंडोजर्मानिक कुलांत येत नाहींत अशा पुष्कळ भाषा प्रचारांत आहेत. या भाषांनां द्राविडी भाषा असें म्हणतात. यांचें एक स्वतंत्र भाषाकुल आहे. निदान अद्यापपर्यंत कोणत्याहि अद्राविड भाषांशीं या द्रविड भाषांचा संबंध भाषाशास्त्रवेत्त्यांनां निश्चितणें जोडतां आलेला नाहीं. तमिळ, तेलुगु, मल्याळम् व कानडी या द्रविडकुलांतील प्रमुख भाषा होत. {kosh द्राविडी भाषांचें नांते कांहीं पंडितानीं हंगेरीयन व तुर्की भाषांशीं आणि आस्ट्रेलियन भाषांशीं जोडण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. वीनर नावांच्या एका रशियन पंडीतास तिचा हिब्र्यूशीं देखील संबंध असावा असा संशय वाटूं लागला आहे.}*{/kosh}
या इंडोजर्मानिक भाषा नसल्या तरी सुद्धां यांतून पुष्कळ संस्कृत प्रयोग वगैरे सांपडतात, व यांतील बरेंच महत्त्वाचें वाङ्मय देखील अनेकांशीं संस्कृत वाङ्मयाच्या आधारें रचलेलें आहे असें आढळून येतें. याशिवाय ज्या लोकांची संस्कृति भारतीय आहे आणि ज्यांचें वाङ्मय भारतीय वाङ्मयाचा भाग आहे असे अनेक लोक आहेत. ब्रह्मदेश, सयाम, सुमात्रा, जावा, वलि, अनाम, कांबोज इत्यादि प्रदेशांच्या भाषांचें आणि वाङ्मायंचें स्वरूप द्रविडी भाषा व वाङ्मयें यांच्या इतकें जरी नसलें तरी जवळजवळ तितकेंच भारतीय आहे. त्यांचा हिशोब घेतल्यास हिंदूंचा विस्तार लक्षांत येईल.
संस्कृत भाषेशीं सगोत्र अशा परकीय भाषांचें, तिजपासून अपसृष्ट झालेल्या भाषांचें आणि तिजशीं रक्तानें असंबद्ध अशा इतर भाषांवरील तिच्या परिणामांचें जें वर निरीक्षण केलें, त्याचा पुढें
येणार्या सांस्कृतिक इतिहासाशीं निकट संबंध आहे. कोणत्याहि देशाच्या सांस्कृतिक आणि राजकिय इतिहासाच्या युगांची विभागणी भाषातत्त्वावर केली असतां तत्संबद्ध ऐतिहासिक घडामोडी स्पष्ट होतात हें वर एका ठिकाणीं सांगितलेंच आहे. आपण जी भाषा बोलतों तीच भाषा आपले पूर्वज बोलत असले तर ते आपलेसे वाटतात पण त्यांची भाषा कांही निराळी असल्यास ते निराळे लोक वाटतात. भाषेंत जे मोठाले फरक होतात ते कांहीं विशिष्ट सामाजिक किंवा राजकीय घडामोडींचे बोधक असतात. विचारभेद तीव्र होऊन निराळे विचार व्यक्त करणारा अगदींच निराळा एखादा जनविभाग किंवा वर्ग विवक्षित देशांत पुढें आला म्हणजे तेथें निराळी भाषा उदयास येते. ज्या राष्ट्रास महत्त्व येईल त्याची भाषा महत्त्व पावते. याप्रमाणें भाषांचा उदयास्त,संकोचविकास या गोष्टींचें कोणत्याहि प्रदेशाच्या सांस्कृतिक इतिहासांत फार महत्त्व आहे. उलटपक्षीं एकाच संस्कृतीखालील अथवा एकच भाषा बोलणारें एक राजघराणें जाऊन दुसरें राजघराणें येणें असल्या गोष्टींनां या इतिहासांत फार थोडें महत्त्व आहे. सांस्कृतिक इतिहास हा ढोबळ रेषा दाखविणार्या नकाशाप्रमाणें आहे. या इतिहासाचे विभाग पाडावयाचे ते भाषांवरील संस्कार आणि भाषांचे उत्सरण-उत्सारण पाहून पाडावे हा शास्त्रशुद्ध मार्ग होय. असो.
भारतीय संस्कृतीचा इतिहास म्हटला म्हणजे दुसरें कांहीं एक नसून केवळ संस्कृत भाषेचा जगाच्या भाषांवर झालेल्या परिणांमाचा इतिहास आहे असें म्हटल्यास चालेल.
संस्कृत भाषेची निरनिरीळ्या काळांतील स्थिति आणि वेदभाषेपासून उत्पन्न झालेल्या आज तागाईतच्या अनेक भाषा यांची सामान्य माहिती असल्याशिवाय, भाषाशास्त्राच्या दृष्टीनें आपल्या भाषेचा जो अभ्यास आपणांस करावयाचा आहे त्याच्या विस्ताराची अंधुक कल्पना देखील आपणांस यावयाची नाहीं. तसेंच ऐतिहासिक संशोधन करण्यासाठीं आपणांस भाषाज्ञानाची केवढी तयारी पाहिजे हें कळण्यासहि देशांतील भाषांची विविधता पूर्णपणें लक्षांत आली पाहिजे. गेल्या चार पांच हजार वर्षांत वेदभाषा स्थित्यंतरें पावत आहे. प्रत्येक काळांत वाङ्मय तयार होत आहे. त्या वाङ्मयांपैकीं कित्येकांचे अवशेष आज उपलब्ध आहेत. पुष्कळांचे नाहींत. तथापि वेदभाषा, प्राचीन संस्कृत, पाणिनीय संस्कृत, आर्षकाव्यभाषा, पाली, महाराष्ट्री, प्राकृत, मिश्रसंस्कृत, जैन प्राकृत इत्यादि अनेक गतकालीन भाषांत तसेंच मराठी, गुजराथी इत्यादि अर्वाचीन भाषांत ग्रंथसमुच्चय मोठे आहेत. याखेरीज प्राकृत भाषेच्या निरनिराळ्या स्वरूपांत शिलालेख, ताम्रपटलेख आहेत ते निराळेच. वरील सर्व भाषांतील ग्रंथ तसेंच आंध्रद्राविडादि दाक्षिणात्य भाषांतील ग्रंथ मिळून एका जनतेचा, एका संस्कृतीचा, आणि एका ज्ञानसंचयाचा इतिहास होतो. एकत्व अनेक ठिकाणीं विभागलें गेलें आहे. या सर्व अवयवांचें ज्ञान होईल तर हे सर्व अवयव मिळून जी हिंदु संस्कृति होते तिचें ज्ञान होईल. संस्कृतीच्या अभ्यासाच्या साधनांपैकीं एका अल्प भागाकडेसच लक्ष देऊन भागावयाचें नाहीं ही गोष्ट जितकी लवकर समजेल तितकें आजचें सवंग पांडित्य कमी होत जाऊन त्याच्या जागीं अधिक व्यापक अभ्यास करण्याची प्रवृत्ति होईल.
भारतीय इतिहासकालाचे व वृत्तसमुच्चयांचे विभाग भाषेच्या दृष्टीनें दिले आहेत. त्याशिवाय इतर दृष्टींनींहि या कालाचे विभाग पाडतां येतील. कोणत्या जातिमूलक संस्कृतीचें वर्चस्व कोणत्या काळीं होतें ही दृष्टी वापरून जे भाग पडतात ते येणेप्रमाणें.
(१) हिंदु संस्कृतीच्या वर्चस्वाच्या कालाचा इतिहास.
(२) मुसलमानी संस्कृतीच्या वर्चस्वाच्या कालाचा इतिहास.
(३) पाश्चात्य संस्कृतीच्या वर्चस्वाच्या कालाचा इतिहास.
हे तीन विभाग कांहीं फरकानें राजकीय वर्चस्वांतील परिवर्तनांचेहि निदर्शक होतील. मध्यंतरीं हिंदूंच्या राजकीय वर्चस्वाचा कांहीं सत्तर ऐशीं वर्षांचा काल मराठ्यांच्या उचलीमुळें अस्तित्वांत आला होता तो राजकीय दृष्टीनें वेगळा लक्षांत घ्यावा लागेल. तथापि त्या काळांत भारतीय संस्कृतीचें वर्चस्व स्थापन होण्यास अवकाश मिळला नाही; आणि यामुळें तो काल संस्कृतीच्या दृष्टीनें वरील दुसर्या विभागांत घालण्यास हरकत नाहीं. हिंदुस्थानाचा असाहि कांहीं भाग आहे कीं मुसलमानी सत्तेच्या उत्कर्षकालीं देखील तो त्यांच्या ताब्यांत न आल्यामळें तेथें हिंदु संस्कृतीची परंपरा अबाधित चालली. या भागांत कांहीं रजपूत संस्थानें आणि सरहद्दीवरील अनेक डोंगरी संस्थानें व दक्षिणेकडील काहीं प्रदेश यांचा अंतर्भाव होतो. हिंदूंच्या संस्कृतीच्या पुनर्घटनेचाहि एक काल दक्षिणेपुरता कल्पितां येईल. हा काल म्हणजे विजयानगरच्या साम्राज्याचा काल होय. हा काल हिंदूंच्या पराभवानंतर त्या भागांत फारच लवकर आल्यामुळें त्याला हिंदूच्या सांस्कृतिक वर्चस्वाच्या कालाचें एक टोंक म्हणून समजण्यास हरकत नाहीं.
भारतीय विषयांवर जें पाश्चात्यांचें पांडित्य आहे तें सर्वव्यापक आहे तथापि आपण जितकें अलीकडील कालाकडे येत जावें तितके त्यांचे परिश्रम कमी झालेले दृष्टीस पडतात. प्राचीन हिंदूंच्या इतिहासाच्या अभ्यासकांपेक्षां भारतीय मुसलमानी काळाचे अभ्यासक फारच कमी आहेत; आणि महाराष्ट्रीय इतिहासाचे अभ्यासक तर मुळींच नाहींत असें म्हटलें तरी चालेल.{kosh किंकेड व पारसनीस यांनीं मराठ्यांचा इतिहास लिहावयाचा एक प्रयत्न केला आहे. होतकरू लेखकास उत्तेजनार्थ दोन गोड शब्द बोलावे या दृष्टीनेंच त्याची थोडीबहुत प्रशंसा होत असावी. एरवीं हा विषय जाणणारा कोणीहि ग्रंथकारांचें अभिनंदन करील असें वाटत नाहीं.}*{/kosh}
पारमारर्थिक विचारांचा इतिहास घेतला आणि त्या दृष्टीनें कालविभाग पाडण्याचा प्रयत्न केला तर आपणांस असें दिसून येईल कीं भाषेच्या दृष्टींनें किंवा राजकीय अगर सांस्कृतिक वर्चस्वाच्या दृष्टीनें जे कालविभाग पडतात तेच ह्या दृष्टीनेंहि पडतात. हिंदूंच्या पारमार्थिक विचारांचा पूर्ण विकास आणि या विकासानें उत्पन्न झालेलीं पांखडें अथवा विचारभेद मुसलमानी वर्चस्वापूर्वींच दृग्गोचर होतात. मुसलमानी काळांत परमार्थसाधनांत भक्तिप्राधान्य उदयास आलें असें समजतात आणि ते कांहीं अंशांनें खरेंहि आहे. तथापि हें भक्तिप्राधान्य एका आणखी मोठ्या सदरांत घालतां येईल. मुसलमानी अमलानंतर जुन्या संस्कृतीच्या कोणत्या तरी अवयवास हिंदूसमाजास चिटकवून ठेवण्याचा प्रयत्न चालू असे, आणि यासाठीं दैवतश्रद्धामय धर्मांचें आणि त्याबरोबर आचाराच्या (सोंवळ्याओंवळ्याच्या) कठोर धर्मांचें उपबृंहण झालें; आणि विचारप्रधान कार्य कमी कमी होऊं लागलें. आजची हिंदु जनता ज्या दोन गोष्टींमुळें इतरांपेक्षां पृथक् आहे ती याच दैवताचारधर्मांमुळें होय.
उपर्युक्त विवेचनावरून भारतीय संस्कृतीच्या व हिंदु समाजाच्या इतिहासाचे भारतांतील भाषासमुच्चयांच्या इतिहासाच्या दृष्टीनें विभाग पाडणें कसें सयुक्तिक आहे हें लक्षांत येईल.
निरनिराळ्या सर्व मानववंशांचा इतिहास हिंदूंच्या इतिहासाशीं बराच संबद्ध आहे. जगांतील एकपंचमांश जनता ज्या समुदायांत आहे तो समुदाय मानववंशाच्या एकंदर इतिहासाशीं स्वाभाविकपणेंच निकट रीतीनें संबद्ध असणार. हा संबंध पूर्णपणें निश्चित नसल्यामुळें याचें विशेष विवेचन येथें केलेलें नाहीं. एतद्विषयक एक मत (डॉ.कीन याचें) मागें व्यक्त केलेंच आहे. त्याची स्थूल पण साकल्यानें माहिती देणें म्हणजे सर्व जगाचें भाषाशास्त्र सांगणें होय.
मनुष्यसमुच्चयांचीं नातीं जोडणारें ज्ञान ज्या शास्त्रांच्या अभ्यासानें झालें आहे अशीं शास्त्रें भाषाशास्त्रांशिवाय अनेक आहेत. त्या शास्त्रांची स्थूल कल्पना असल्याशिवाय त्या शास्त्रांच्या साहाय्यानें हिंदूंच्या पूर्वस्थितीसंबंधानें जी माहिती उपलब्ध झाली आहे तिंचे आकलन होणार नाहीं यासाठीं इतिहासास उपकारक अशा अभ्यासपद्धतींचें विहंगमावलोकन येथें अवश्य आहे. वेद हें आपलें प्रथमचें इतिहाससाहित्य होय. त्या साहित्याचा उपयोग भारतीय परिस्थिती जाणण्याकडे आपण करूंच करूं, तथापि वेदमंत्ररचनेच्या कालाच्या पर्वींचीहि परिस्थिति शोधून काढण्यासाठीं त्या साहित्याचा कसा काय उपयोग होईल याची कल्पना आपणास पाहिजे. वेदांचा अभ्यास आपणाकडे नवा नाहीं. वेदकाल म्हणून ज्या कित्येक शतकांस अगर सहस्त्रकांस आपण उल्लेखितों, त्या कालींच स्वकालीन साहित्याचा अभ्यास मोठ्या जोरोनें चालू असे. त्याशिवाय संहिता नांवाचीं जुडगीं बाधणें, त्यांचे अक्षरमात्र भ्रष्ट न व्हावें यासाठीं प्रतिशाख्यें तयार करणें, कल्पसूत्रें, ज्योतिष इत्यादि शास्त्रांचा पाया घालणें, या क्रिया वेदरचनेच्या अंतिमकालीं होतच होत्या. पण त्या वेळच्या अभ्यासांत आणि आजच्या यूरोपीयांच्या अभ्यासांत मुख्य फरक हा आहे कीं, आपल्याकडील अभ्यास उत्तरकालावर दृष्टी ठेवून झाला, व यूरोपीयांच्या अभ्यासास चोदना पूर्वकालावरील दृष्टीमुळें झाली आहे. उत्तरकालीन क्रियांचें, मतांचें व आचारांचें परीक्षण, खंडन व मंडन करणें आणि त्यांची वेदांशीं संगति ठेवणें हेंच कार्य करण्यांत आपलें पाण्डित्य गुंतलें होतें. आपल्याकडील रा. बाळ गंगाधर टिळक वगळले असतां इतर पंडितांची, उदाहरणार्थ वेदार्थयत्नकारासारख्यांची, दृष्टि उत्तरकालीन क्रियांशीं वेदाची संगति किंवा असंगति शोधण्याकडेसच विशेष होती. कै. शंकर पांडुरंग पंडित यांच्या अंतःकरणांत चिकित्सकबुद्धीपेक्षां श्रद्धेचा विकास अधिक झाला होता असें दिसतें. यज्ञकर्म विधिपूर्वक करतां न आल्यामुळें यज्ञ करतेवेळेस जी कामना मनांत असेल तिची प्राप्तिहि होत नाहीं, अशी या भोळ्या ब्राह्मणाची समजूत वेदार्थयत्नांत व्यक्त होते. पाश्चात्यांची दृष्टि मूलतःच बाह्यांची. आजचे आपण व आजचे पाश्चात्य हे एकमेकांपासून फार दूर आहों. आपले पूर्वज त्यांच्या पूर्वजांचे बंधु होते. अर्थात् त्यांनां जितकें प्राचीन अधिक सांपडेल तितकें अधिक महत्त्वाचें, कां कीं त्याच्या योगानें त्यांच्या पूर्वजांची त्यांनां अधिक ओळख होते. या त्यांच्या बुद्धीनें त्यांच्या वेदाभ्यासास अगदीं निराळें स्वरूप मिळालें. प्राचीनवस्तुसंशोधनाचें वेद हें अत्यन्त महत्त्वाचें साहित्य बनलें. त्यांस वेदावरून जिची कल्पना येईल ती वेदपूर्वकालीन स्थिति ज्ञातव्य आहे आणि तें ज्ञातव्य शोधण्यासाठीं जीं शास्त्रें उत्पन्न झालीं त्यांत वेदान्तर्गत शब्द, व्याकरण, आचार, वस्तु इत्यादि सर्वांचा उपयोग होतो.
ज्याप्रमाणें अग्नि, पुरोहित, यज्ञ, देव, रत्न इत्यादि शब्द ऋग्वेदकालीं असून देखील आजच्या मराठींत टिकले आहेत, उपवासाचे नियम सामान्यपणें यज्ञसंस्था वृद्धिंगत पावलेल्या ब्राह्मणकाळापासून आतांपर्यंत अव्याहत चालत आले आहेत, आणि देवांचें स्वरूप बदललें तरी विष्णु, शिव इत्यादि नावें वेदकालपासून आतांपर्यंत देवनामें म्हणून टिकलीं आहेत, त्याचप्रमाणें वेदवक्त्या ऋषींचें पूर्वज त्यांच्यापासून हजारों वर्षांनीं वियुक्त अशा वेदपूर्वकालाचे शब्द आणि आचार उपयोगांत आणीत नसतील असें कशावरून ? आणीत असतीलच. अशा विचारसरणीनें भारतीय वेदकालापेक्षां अत्यंत प्राचीन कालाच्या इतिहासाचे अवशेष वेदांत सांपडले तर ते शोधावेत आणि त्यांचा प्राचीनतम यूरोपीय कालांतील अवशेषांशीं संबंध जोडवा अशी कल्पना उत्पन्न झाली व प्रत्येक देशांतील प्राचीन अवशेष शोधण्याचा आणि त्या अवशेषांची परस्परांशीं तुलना करून सर्वांस सामान्य असें प्राचीन असें काय होतें तें काढण्याचा उपक्रम युरोपांत सुरू झाला. पारशांच्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास तौलनिक पद्धतीनें सुरू झाला. केवळ शब्दांचीच तुलना झाली असें नाहीं; तर देवस्वरूपांची तुलना झाली, सामान्य आचारविचार काय होते हें काढण्यासाठींहि परिश्रम झाला. देवविषयक आख्यानें व कथासुत्रें एकमेकांपाशीं मांडून तोललीं गेली, आणि निरनिराळ्या भाषांची अन्तर्गत रचना म्हणजे व्याकरण शोधिलें जाऊन या निरनिराळ्या भाषांचे सादृश्य अथवा असादृश्य यांवरून त्यांचें मूलस्वरूप काय असावें याचा विचार होऊं लागला, आणि सर्व आर्यन् लोकांची म्हणजे भारतीय, इराणी व यूरोपीय यांच्या पूर्वजांची भाषा कशी काय असावी तिची कल्पनेनें मांडणी करण्यापर्यंत मजल गेली. सर्वांचे मूलगृह कोठें असेल, ते कोणत्या काळीं एकत्र असतील, याचा विचार सुरू झाला; आणि मूलगृह एकत्र होतें अशी कल्पना मनांत धरून त्या कालापासून भारतीय कालापर्यंत जो काल लोटला त्या कालाचे तीन विभाग कल्पिले गेले.
१ मूलगृहकाल म्हणजे ज्या वेळेस यूरोपीय, इराणी व भारतीय या सर्वांचे पूर्वज एकत्र होते तो काल. या कालास 'इंडोयूरोपिअन पीरिअड' (Indo-European Period), किंवा 'इंडोजर्मानिक पीरिअड' (Indo-Germanic Period) किंवा 'आर्यन पीरिअड' (Aryan Period), अशीं नावें वापरण्याचा प्रघात आहे. या तीन नांवांपैकीं 'इंडोयूरोपिअन पीरीअड' हें नांव वापरण्याची इंग्रज, फ्रेंच व अमेरिकन लोकांस, आणि 'इंडोजर्मानिक पीरिअड' हें नांव वापरण्याची जर्मन पंडितांस आवड दिसते.
(२) दुसरा काल म्हटला म्हणजे पर्शुभारतीय काल. यालाच 'इंडोइरेनिअन पीरिअड' (Indo-Iranian Period) असें नांव पाश्चात्य शास्त्रज्ञ देतात. या कालाची परिस्थिती अजमावण्यासाठीं साधारणपणें तीन साहित्यांचा उपोयग करण्यांत येतो. त्यांपैकी पहिलें वेद, दुसरें पारशांचे धर्मग्रंथ आणि तिसरें डरायस हेस्टास्पस याचे बेहिस्तान येथील त्रिकोणयुक्ताक्षरी शिलालेख. शिवाय पुस्तु व ग्रियर्सननें पिशाच्च असें नांव दिलेल्या ज्या भाषा त्यांचेहि साहित्य उपयोगिलें जातें.
(३) या पर्शुभारतीय कालानंतरचा काल तो वेदकाल. वरील दोन कालंशीं त्याचें पृथक्त्व व सादृश्य दाखविण्यासाठीं पाश्चात्य पंडित त्यास 'इंडोआर्यन् पीरिअड' (Indo-Aryan Period) असें नांव देतात.
'इंडोयुरोपिअन पीरिअड' म्हणजे मूलगृहकाल. यांतील शोधाचे तीन वर्ग करतां येतील.
(१) स्थानशोधनार्थ अभ्यास.
(२) मूलगृहींच्या वसतीचा काल शोधण्यास केलेला अभ्यास.
(३) तत्कालीन स्थिति शोधण्यास केलेला अभ्यास.
पहिल्या प्रकारचा अभ्यास ग्रांथिक अभ्यासाशीं असंबद्ध अशा अनेक शास्त्रांशीं व अभ्यासांशीं संबद्ध आहे. प्राणिशास्त्रांत इ.स. १८३९ सालीं डार्विन यानें 'जातिजनन' (Origin of Species) या नांवाचा ग्रंथ लिहून शास्त्रज्ञांची अशी खात्री करून दिली कीं, वायव्य, आरण्य आणि जलविहारी प्राण्यांच्या जाती कांहीं कायमच्या बनलेल्या नाहींत. परिस्थितीचा परिणाम होऊन व पूर्वकालीन अनेक जातींत फरक होऊन त्यांच्या पृथक जाती बनल्या. त्याच ग्रंथकारानें पुढें 'मानवोत्पति' (Descent of Man) या नांवाच्या ग्रंथामध्यें आपलें म्हणजे मनुष्यजातींचें वानराशीं नातें सिद्ध केलें. मनुष्य पूर्वींच्या मनुष्येतर प्राण्यापासून जन्मला आहे, एवढें ठरल्यानंतर त्याची उत्पत्ति एका प्राण्यापासून झाली कीं अनेक प्राण्यांपासून झाली या तर्हेचा वाद पुढें उपस्थित झाला. या वादामध्यें मनुष्य एका प्राण्यापासून उत्पन्न झाला असें सिद्ध झालें आहे, हें कबूल करण्याची इच्छा किंवा हें कबूल करण्याइतकी खात्री सर्व शास्त्रज्ञांची अजून झालेली नाहीं. अनेक प्रकारच्या प्राण्यांपासून मनुष्य झाला असा आग्रह धरणारे ग्रंथकार अमेरिकेंत इतर देशांपेक्षां फार अधिक आहेत; पण त्या देशांत गोरा आणि नीग्रो यांमध्यें तीव्र द्वेष असल्यामुळें अनेकसंभव मताचा पुरस्कार जो तेथें होतो तो केवळ शास्त्रीय जाणिवीनेंच होतो अशी आमची खात्री पटत नाहीं. असो. मनुष्य एकसंभव असो अगर अनेकसंभव असो, अनेकसंभव मताचा आग्रह धरणारे लोकहि १०।१२ प्राण्यांपासून मनुष्य विकासला असें म्हणत नाहींत. त्यांचें एवढेंच म्हणणें आहे कीं, 'काला अदमी' आणि 'गोरा अदमी' निरनिराळ्या मनुष्यपूर्वजातींपासून विकासले गेले असावेत. असो.
आतां कांहीं मानवविषयक शास्त्रांचें सामान्य स्वरूप पाहूं. मनुष्यप्राण्याच्या उत्पत्तीपासून आजतागाइतपर्यंत मानवेतिहासविषयक जीं शास्त्रें तयार झालीं त्यांपैकीं बरीचशीं शास्त्रें भारतीय संस्कृतीच्या अभ्यासास लावलीं गेलीं आहेत; म्हणून भारतीय संस्कृतीच्या अभ्यासास आज हात घालूं पहाणारानें या शास्त्रांचें सामान्य स्वरूप प्रारंभीच लक्षांत घेतलें पाहिजे; नाही तर आपणाविषयीं झालेले एकंदर संशोधन त्यास नीट समजणारच नाहीं.