प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.

आर्यसंस्कृतीचा वृद्धिसंकोच :— इतर संस्कृतींच्या स्पर्धेमुळें आर्यसंस्कृतीचा कसा काय वृद्धिसंकोच होत आहे याचा विचार करण्यासाठीं इतिहासांत शिरण्यापूर्वीं जगतांतील प्रकृत समाजाचें अवलोकन करूं. जगाच्या क्षेत्राचें अवलोकन ज्या तीन तर्‍हांनीं केलें पाहिजे त्या येणेंप्रमाणे :-

(१) अखिलभारतीय आर्यसंस्कृतीच्या क्षेत्रांत भारतीय व अभारतीय जाती धरून किती लोकसमुदाय आहे ?
(२) आर्यसंस्कृतीपासून अपसृष्ट परंतु जातीनें भारतीय अशांचा लोकसमुदाय किती आहे ?
(३) जातीनें आजच्या भारताबाहेरील परंतु आर्य संस्कृतीच्या आवेष्टनानें वेष्टित झालेला लोकसमुदाय किती आहे ?

या तिन्ही बाजूंनीं आतां विचार करूं.

वरील प्रश्नांत निर्दिष्ट झालेले तीन वर्ग एकमेकांपासून अत्यंत पृथक् करतां येणार नाहींत. भारत म्हणजे काय याची स्थानमूलक व्याख्या आपण प्रथम करूं. या ठिकाणीं हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं भारताच्या मर्यादा निश्चितपणें कधींच ठरल्या नव्हत्या. असो. सध्याचा ब्रिटिश छत्राखालीं असलेला हिंदुस्थानचा भाग घ्यावयाचा, त्यांत बलुचिस्तान, अंदमान व निकोबार बेटें व ब्रह्मदेश हे वजा करावयाचे आणि नेपाळ, भूतान आणि फ्रेंच व पोर्तुगीज अंमलाखालीं असलेला भारतीय भाग हा मिळवावयाचा; आणि इतकें करून जें क्षेत्र निर्माण होतें त्यास भारत हें नाव द्यावयाचें, ही कल्पना भारत किंवा भारतीय या स्थानविषयक शब्दांचा उपयोग करितांना आम्ही वापरली आहे. सामान्य हिंदूंच्या मनांत 'हिंदुस्थान' शब्द म्हणातांना एवढाच प्रदेश लक्षांत येतो.