प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.
आर्यन् व आर्य :— आम्ही वर 'आर्यन्' शब्द वापरला आहे, तो मुद्दाम वापरला आहे. आर्य हा शब्द वापरला असतां वाचकांचा घोंटाळा होईल. आर्य या शब्दाचा अर्थ पाश्चात्यांनीं फिरविला आहे. ऋग्वेदकालीन लोक आपणांस आर्य म्हणवीत. जो शब्द वंशवाचक आहे पण राष्ट्रवाचक नाहीं आणि अशा प्रकारच्या शब्दांत जो फार जुना असून ज्यास गौरव प्राप्त झालें आहे असा शब्द हाच. या कारणानें यूरोपीयांनीं आर्य शब्दाची अर्थकक्षा वाढवून आर्य नांवानें संबोधिलेल्या जातींत अगर वर्गांत आपल्या पूर्वजांचा समावेश करून घेतला आहे. यूरोपीय लोकांचा आर्य (आर्यन्) शब्दाचा अर्थ, संस्कृत भाषेंशीं जिचें बहिणींचें अगर चुलत बहिणीचें अगर चुलतचुलत पुतणींचें किंवा चुलतचुलत चुलत नातवंडाचें किंवा पणतवंडाचें नातें जोडतां येईल अशा भाषा केवळ आनुवंशानें बोलणार्या जातींचा समुच्चय असा आहे. हा अर्थ व्यक्त करण्यासाठीं आम्ही त्यांनींच वापरलेला शब्द 'आर्यन्' हा योजीत आहों. आणि हा भेद पूर्वीं डॉ. केतकर यांच्या (Ketkar’s History of Caste in India) जातिभेदाच्या इतिहांसात वापरला आहे. आपल्याकडील आर्य शब्दाचा अर्थ निराळ आहे. वैदिक सूक्तें जे लोक बरोबर घेऊन आले ते लोक आपणांस आर्य म्हणवीत. आर्य हा शब्द जातिवाचक होता अशी अजून कोणाचीच खात्री नाहीं. शिवाय या शब्दाचा पुढें पुढें तर सभ्याचारयुक्त मनुष्य म्हणजे 'जंट्लमन्' असा अर्थ झाला आहे. तरी जेथें जेथें 'आर्यन' हा शब्द येईल तेथें त्याचा पाश्चात्यांनीं केलेला अर्थ म्हणजे भारतीय, इराणी व यूरोपीय यांचे पूर्वज एकत्र रहात होते तत्कालीन लोक किंवा त्यांचे सर्व वंशज असा समजावा व त्या शब्दाचा वास्तविक आर्य शब्दांशीं घोंटाळा करूं नयें.
'आर्यन्' लोकांचें मूल वसतिस्थान कोठें होतें हें 'आर्यन्' लोकांच्या एंकदर सांस्कृतिक परिस्थितीच्या ज्ञानाशिवाय समजणार नाहीं. आणि तो काल कोणता असावा हे ठरविणें ही तर अधिकच कठिण गोष्ट होय. म्हणून मूलगृहाचा व मूलकालाचा विचार प्राचीन परिस्थितीच्या सामान्य कल्पना दिल्यानंतर करावा लागेल.