प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.
मानववंशविषयक आणि सांस्कृतिक संबंध :— भारतीयांचा इतर जगाशीं संबंध अनेक प्रकारचा आहे. कांहीं अशीं हा संबंध रक्ताचा आहे. म्हणजे वेद हे ज्या लोकांच्या पूर्वजांनीं लिहिले त्या लोकांचे पूर्वज इतर देशांतील लोकांच्या पूर्वजांचे भाईबंद होते. शिवाय आपल्या देशांतील लोकांचे परदेशगमन अनेक शतकें होत असून त्या इतरत्र गेलेल्या लोकांनीं तद्देशीयांत आपला अंतर्भाव करून घेतला. यूरोपांत आणि अमेरिकेंत जे जिप्सी म्हणून लोक आहेत ते तर याच देशांतीले. गेल्या पाऊणशें वर्षांत लाखों लोक परदेशीं जाऊन तेथें वसती करून राहिले. त्या सर्वांचा हिशोब घेतल्यास आपल्या रक्ताचा हिंदुस्थानाबाहेर संबंध काय आहे हें लक्षांत येतें.
आपल्या देशांतील संस्कृतीचा प्रसार देशाबाहेर पाहिला तर तो देखील पुष्कळच झाला आहे. हिंदुस्थानाबाहेर कांही देशच्या देश बौद्ध झाले आहेत, आणि कांही ठिकाणीं शैव संप्रदाय अजून चालू आहे. कांही ठिकाणीं ब्राह्मणहि आहेत. या सर्व गोष्टींचें वर्णन पुढें येईलच. संस्कृतीचा प्रसार माणसें गेल्याशिवाय होत नाहीं म्हणून जेथें आपली संस्कृति पसरली तेथें माणसांचीहि वसती झाली आणि पुढें तीं माणसें इतर जनतेंत मिसळून गेलीं असावींत असें धरण्यास हरकत नाहीं. यासाठीं आपला आणि इतर जगाचा संबंध शोधतांना आजचें परदेशगमन आणि पूर्वकाळीं झालेला संस्कृतीप्रसार या दोन्ही गोष्टी लक्षांत घेतल्या पाहिजेत.
भारतीय संस्कृतिप्रसाराचें सर्व जगांतील मनुष्यसमूहाच्या आयुष्यक्रमांत स्थान शोधण्यासांठीं प्रथम सर्व मनुष्यसमूहाच्या हालचालींची आपणांस स्थूल माहिती पाहिजे. ही आपणांस थोडी बहुत अनुमानानें अवगत आहे. जगांतील मनुष्यसमूहाचा एकंदर कार्यक्रम समजला म्हणजे भारतीयांचें जगाच्या इतिहासांत स्थान अधिक स्पष्ट होईल. या हालचाली शोधण्याचें काम मानवशास्त्रज्ञांचें आहे.
मानवशास्त्रज्ञांचा मुख्य विषय मानवेतिहास होय. त्यांनीं व इतर शास्त्रांच्या अभ्यासकांनीं आजपर्यंत जे परिश्रम केले त्यांवरून त्यांनां मानवेतिहासविषयक कांहीं गोष्टी समजल्या आहेत. निरनिराळ्या काळांच्या परिस्थितींची सर्व अंगें एकदम समजत नाहींत तथापि जी कांहीं माहिती मिळते तीवरून जगाचा एकंदर इतिहास कसा झाला असेल याविषयीं कांहीं कल्पना बसवितां येते. समाजशास्त्रज्ञ आणि मानवेतिहासज्ञ मनुष्यजातीच्या एकंदर इतिहासाविषयीं ज्या कांहीं गोष्टी मनांत वागवितात त्या येणेंप्रमाणे :—
मनुष्यजाति ही कोणत्या तरी मनुष्यकल्प प्राण्यांत बदल होत होत कोणत्या तरी काळीं आणि कोणत्या तरी स्थळीं तयार झाली.
मनुष्यप्राण्याची जगावर वसति जी कित्येक हजारों किंवा लाखों वर्षें असेल त्या अवधींत एकसारखी वाढत आहे. मूळचीं माणसें फार तर कांहीं हजार असतील आणि त्यांचा वंशविस्तार होत होत आज दीडशें कोटींवर वाढ झाली आहे.
मानवी संस्कृतीच्या जुन्या काळीं म्हणजे सांस्कृतिक प्रगति अल्प असतां मानवी जातीच्या व्यक्तीचें इतस्ततः भ्रमण होऊन मानवजातीच्या अनेक म्हणजे पुष्कळच लहान लहान जमाती तयार झाल्या. याप्रमाणें जे भ्रमण होऊन वियुक्त होत गेले ते बहुतेक एकटे पडले, त्यांचा व इतरांचा संबंध बराच कमी कमी राहात गेला.
संस्कृतीच्या इतिहासांत बर्याच उत्तरकालीं हे मानवी समुदाय जे एकाकी आणि एकमेकांकडून जवळ जवळ अस्पृष्ट अशा स्थितींत पडले होते ते आतां अधिक दळणवळण, अधिक परस्परसहवास, ज्ञातींचें संघीकरण आणि परस्परविवाह यांच्याकडे प्रवृत्ति दाखवित आहेत.
मनुष्य पोट भरण्याकरितां स्थलांतर करितो. तो केव्हां केव्हां एखाद्या ठिकाणीं बरींच वर्षें किंवा कायमचा राहतो. हें त्याचें विवक्षित ठिकाणीं राहणें त्याच्या त्या ठिकाणच्या सांपत्तिक स्थितीचा उपयोग करण्याच्या शक्तीवर अवलंबून असतें व ही शक्ति सामान्यतः तो ज्या सांस्कृतिक परिस्थितींत असेल तीवर अवलंबून असते, आणि हीच सृष्ट्युपभोगशक्ति त्याची भविष्यकालीन संस्कृति निश्चित करिते.
मनुष्यजातीचें ज्या वेळीं निरनिराळ्या दिशांनीं स्थलांतर होत होतें त्या वेळी त्यांच्यामध्यें शारीरिक व भाषाविषयक अनेक भेद उत्पन्न झाले; आणि यामुळें अनेक मानववंश निर्माण झाले. एकमेकांशी दळणवळण, अधिक परस्परसहवास, ज्ञातींचें संघीकरण आणि परस्परविवाह यांच्या कालांत स्थलांतराच्या कालांत उत्पन्न झालेले शारीरिक आणि भाषाविषयक भेद कमी कमी होत जात आहेत.