प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.
मानववंशविषयक आणि सांस्कृतिक संबंध :— भारतीयांचा इतर जगाशीं संबंध अनेक प्रकारचा आहे. कांहीं अशीं हा संबंध रक्ताचा आहे. म्हणजे वेद हे ज्या लोकांच्या पूर्वजांनीं लिहिले त्या लोकांचे पूर्वज इतर देशांतील लोकांच्या पूर्वजांचे भाईबंद होते. शिवाय आपल्या देशांतील लोकांचे परदेशगमन अनेक शतकें होत असून त्या इतरत्र गेलेल्या लोकांनीं तद्देशीयांत आपला अंतर्भाव करून घेतला. यूरोपांत आणि अमेरिकेंत जे जिप्सी म्हणून लोक आहेत ते तर याच देशांतीले. गेल्या पाऊणशें वर्षांत लाखों लोक परदेशीं जाऊन तेथें वसती करून राहिले. त्या सर्वांचा हिशोब घेतल्यास आपल्या रक्ताचा हिंदुस्थानाबाहेर संबंध काय आहे हें लक्षांत येतें.
आपल्या देशांतील संस्कृतीचा प्रसार देशाबाहेर पाहिला तर तो देखील पुष्कळच झाला आहे. हिंदुस्थानाबाहेर कांही देशच्या देश बौद्ध झाले आहेत, आणि कांही ठिकाणीं शैव संप्रदाय अजून चालू आहे. कांही ठिकाणीं ब्राह्मणहि आहेत. या सर्व गोष्टींचें वर्णन पुढें येईलच. संस्कृतीचा प्रसार माणसें गेल्याशिवाय होत नाहीं म्हणून जेथें आपली संस्कृति पसरली तेथें माणसांचीहि वसती झाली आणि पुढें तीं माणसें इतर जनतेंत मिसळून गेलीं असावींत असें धरण्यास हरकत नाहीं. यासाठीं आपला आणि इतर जगाचा संबंध शोधतांना आजचें परदेशगमन आणि पूर्वकाळीं झालेला संस्कृतीप्रसार या दोन्ही गोष्टी लक्षांत घेतल्या पाहिजेत.
भारतीय संस्कृतिप्रसाराचें सर्व जगांतील मनुष्यसमूहाच्या आयुष्यक्रमांत स्थान शोधण्यासांठीं प्रथम सर्व मनुष्यसमूहाच्या हालचालींची आपणांस स्थूल माहिती पाहिजे. ही आपणांस थोडी बहुत अनुमानानें अवगत आहे. जगांतील मनुष्यसमूहाचा एकंदर कार्यक्रम समजला म्हणजे भारतीयांचें जगाच्या इतिहासांत स्थान अधिक स्पष्ट होईल. या हालचाली शोधण्याचें काम मानवशास्त्रज्ञांचें आहे.
मानवशास्त्रज्ञांचा मुख्य विषय मानवेतिहास होय. त्यांनीं व इतर शास्त्रांच्या अभ्यासकांनीं आजपर्यंत जे परिश्रम केले त्यांवरून त्यांनां मानवेतिहासविषयक कांहीं गोष्टी समजल्या आहेत. निरनिराळ्या काळांच्या परिस्थितींची सर्व अंगें एकदम समजत नाहींत तथापि जी कांहीं माहिती मिळते तीवरून जगाचा एकंदर इतिहास कसा झाला असेल याविषयीं कांहीं कल्पना बसवितां येते. समाजशास्त्रज्ञ आणि मानवेतिहासज्ञ मनुष्यजातीच्या एकंदर इतिहासाविषयीं ज्या कांहीं गोष्टी मनांत वागवितात त्या येणेंप्रमाणे :—
मनुष्यजाति ही कोणत्या तरी मनुष्यकल्प प्राण्यांत बदल होत होत कोणत्या तरी काळीं आणि कोणत्या तरी स्थळीं तयार झाली.
मनुष्यप्राण्याची जगावर वसति जी कित्येक हजारों किंवा लाखों वर्षें असेल त्या अवधींत एकसारखी वाढत आहे. मूळचीं माणसें फार तर कांहीं हजार असतील आणि त्यांचा वंशविस्तार होत होत आज दीडशें कोटींवर वाढ झाली आहे.
मानवी संस्कृतीच्या जुन्या काळीं म्हणजे सांस्कृतिक प्रगति अल्प असतां मानवी जातीच्या व्यक्तीचें इतस्ततः भ्रमण होऊन मानवजातीच्या अनेक म्हणजे पुष्कळच लहान लहान जमाती तयार झाल्या. याप्रमाणें जे भ्रमण होऊन वियुक्त होत गेले ते बहुतेक एकटे पडले, त्यांचा व इतरांचा संबंध बराच कमी कमी राहात गेला.
संस्कृतीच्या इतिहासांत बर्याच उत्तरकालीं हे मानवी समुदाय जे एकाकी आणि एकमेकांकडून जवळ जवळ अस्पृष्ट अशा स्थितींत पडले होते ते आतां अधिक दळणवळण, अधिक परस्परसहवास, ज्ञातींचें संघीकरण आणि परस्परविवाह यांच्याकडे प्रवृत्ति दाखवित आहेत.
मनुष्य पोट भरण्याकरितां स्थलांतर करितो. तो केव्हां केव्हां एखाद्या ठिकाणीं बरींच वर्षें किंवा कायमचा राहतो. हें त्याचें विवक्षित ठिकाणीं राहणें त्याच्या त्या ठिकाणच्या सांपत्तिक स्थितीचा उपयोग करण्याच्या शक्तीवर अवलंबून असतें व ही शक्ति सामान्यतः तो ज्या सांस्कृतिक परिस्थितींत असेल तीवर अवलंबून असते, आणि हीच सृष्ट्युपभोगशक्ति त्याची भविष्यकालीन संस्कृति निश्चित करिते.
मनुष्यजातीचें ज्या वेळीं निरनिराळ्या दिशांनीं स्थलांतर होत होतें त्या वेळी त्यांच्यामध्यें शारीरिक व भाषाविषयक अनेक भेद उत्पन्न झाले; आणि यामुळें अनेक मानववंश निर्माण झाले. एकमेकांशी दळणवळण, अधिक परस्परसहवास, ज्ञातींचें संघीकरण आणि परस्परविवाह यांच्या कालांत स्थलांतराच्या कालांत उत्पन्न झालेले शारीरिक आणि भाषाविषयक भेद कमी कमी होत जात आहेत.
मनुष्यसमूहांचें पृथक्त्व आणि एकाकित्व हीं इतर जातींशीं समागमामुळें आणि पूर्वींपेक्षा अधिक मोठे मनुष्यसमुच्चय बनल्यामुळें मोडत चाललीं आहेत.
मोठ्या समुच्चयाची भावना अनेक कारणांनीं जन्मास आली आहे; आणि त्या अनेक कारणांपैकीं प्रचारशील उपासनासंप्रदाय आणि शासनसंस्था हीं दोन महत्त्वाचीं होत.
लहान लहान जाती किंवा संस्थानें यांच्या संघीकरणामुळें मोठमोठ्या शासनसंस्था तयार होत आहेत.
मोठ्या शासनसंस्था उत्पन्न करणारें हें जें संघीकरण होई तें अनेक पद्धतींनीं जन्मास येई. एक जाति दुसर्या जातीस जिंकी आणि त्या जातीचा आपणांतच समावेश करून घेई. कधीं कधीं एक बलवान् राष्ट्र इतर अनेक राष्ट्रांस जिंकून त्यांस एकस्वरूपता आणी. कधीं कधीं अनेक राष्ट्रें एका मोठ्या शत्रूच्या भीतीनें देखील एकीकृत होत आणि पुढें त्यांचे कायमचे संघहि बनत.
मनुष्यजातीचा प्रसार चोहोंकडे होऊन त्यांच्यामध्यें जे भेद उत्पन्न झाले त्या सर्व भेदांमध्यें भाषाभेद हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो प्रयाणाचा सूचक आहे. भाषेंतील शब्दसमुच्चय प्रयाणमार्गाचे सूचक आहेत आणि अपभ्रंश कालाचे सूचक आहेत.
सर्व जगाचें भाषाचित्र येथें देण्यास अवकाश नाहीं तथापि एवढें सांगितलें पाहिजे कीं, हिंदुस्थानांतील द्राविडी आणि सरहद्दीजवळच्या कांही भाषा सोडून इतर सर्व भाषा संस्कृतसंभव आहेत; आणि यूरोपांतील बास्क, हंगेरियन, फिन, लॅप व तुर्की या भाषा सोडून सर्व भाषा संस्कृत भाषेशीं सगोत्र आहेत. अरबी, हिब्र्यू व तुर्कस्थानांतील कांहीं भाषा याहि सगोत्र आहेत. इराण, अफगाणिस्तान, काफरिस्तान व काश्मीर येथील भाषाहि संस्कृतशीं सगोत्र आहेत. अमेरिकेंतील इंडियनांच्या सर्व भाषा एकाच गोत्रांतील आहेत. बलुचिस्तानांतील ब्राहुइ भाषा द्राविडी भाषेशीं सगोत्र आहे. द्राविडी भाषांत तामिळ, तेलुगु, मल्याळी व कानडी या सुशिक्षितांच्या भाषा व गोंडीसारख्या अशिक्षितांच्या भाषा यांचा अंतर्भाव होतो. तुलुव व कोडगु (कोडगी) या सुशिक्षित व जंगली यांच्या सरहद्दीवरील लोकांच्या भाषा आहेत. द्राविडी भाषांचा संबंध कित्येकांकडून वायव्येकडील हंगेरियनसारख्या भाषांशीं व आग्नेयीकडील ऑस्ट्रेलियन देश्य भाषांशीं जोडण्यांत येतो. चिनी, जपानी यांचा संबंध कांहीं लोकांकडून अमेरिकन इंडीयन लोकांच्या भाषांशीं जोडण्यांत आला आहे, तसाच पूर्वेकडील द्वीपकल्पांतील भाषांशीं देखील जोडण्यांत आला आहे. भारतीय संस्कृतीचें कार्य म्हटलें म्हणजे इराणी आणि यूरोपीय लोकांशीं संबद्ध अशी एक भाषा घेऊन तिची शास्त्रें व वाङ्मय यांच्या विकासानें जोपासना करून तिचें महत्त्व द्राविडी भाषांवर, पूर्वेकडील द्वीपकल्पांतील भाषांवर आणि त्याचप्रमाणें जावा, बलीसारख्या द्वैपायन भाषांवर स्थापन करणें हें होय.
अनागरांच्या अज्ञानामुळें मूळ भाषा भ्रष्ट होऊन निरनिराळ्या भाषांचा विकास होत असतां त्यांचा मूळ भाषेशीं संबंध जोडणें हें कार्य आणि भाषेचें महत्त्व भिन्न भाषा बोलणार्या लोकांवर स्थापित करणें हें कार्य एकसारखें चालू राहून तिचा फिलिपाइनपर्यंत पगडा बसलेला दिसतो. भाषाप्रसार करणें या हेतूनेंच कार्य झालेलें नसून विचारांचा प्रसार करणें, दैवतांचा प्रसार करणें आणि राजसत्ता वाढविणें हें कार्य होत होतें आणि या सर्व कार्यांच्या योगानेंच भाषेचा प्रसार झाला.
हिंदुंची जी संस्कृति बनली ती एकाच जनतेच्या किंवा एकाच मानववंशाच्या श्रमाचें फल नसून आर्यन् आणि द्राविड या दोन्ही मानववंशांच्या परिश्रमाचें फल आहे. आणि या संस्कृतीचा प्रसार जो झाला तो निरनिराळ्या काळांत झाला त्यामुळें विविध जातींच्या संनिकर्षामुळें संस्कृतींत होणारा फरक चोहोंकडे सारखाच पसरला नाहीं. सीलोनमध्यें सिंहली जनतेंत ब्राह्मणांचें अस्तित्व दिसून येत नाहीं तर कांबोडिया उर्फ कांबोज या देशांत ब्राह्मण व शिवविष्णूसारख्या देवता देखील दिसून येतात. दक्षिणेंत उत्पन्न झालेल्या आचार्यांच्या विचाराचा परिणाम जरी उत्तरहिंदुस्थानांत दिसून येतो तरी तो पूर्वेकडील द्वीपकल्पांत दिसून येत नाहीं. भारतीय संस्कृतीच्या केंद्रापासून जितकें अधिक दूरत्व दिसून येतें तितका परकीय संस्कृतीचा परिणाम अधिकाधिक दिसून येतो.
अरबांनीं उत्पन्न केलेली मुसुलमानी संस्कृति ख्रिस्ती शकाच्या सहाव्या शतकांत उत्पन्न होऊन पुढील आठ शतकांत तिचा फैलाव चोहोंकडे झाला आणि तिच्या प्रभावानें पूर्वीं आपल्या जवळ आलेले लोक अधिकाधिक अपसृष्ट बनले. पंधराव्या शतकाच्या अंतिमकालापासून किंवा सोळाव्या शतकाच्या प्रारंभापासून गेलीं चारशें वर्षें यूरोपीय संस्कृति हिंदु संस्कृतीचा आणि मुसुलमानी संस्कृतीचा चोहोंकडे संकोच करीत आहे.
मुसुलमानी संस्कृतीची छाप चोहोंकडे बसत चालली त्यावेळेस जे मुख्य फेरफार झाले त्यांत इतर लोकांस हिंदुपासून अपसृष्ट करणारा फेरफार म्हटला म्हणजे ब्राह्मणी लिपीशीं संबद्ध अशा लिपी नाहींशा करून तेथें अरबी लिपीची किंवा तिच्या अपभ्रंशांची स्थापना करणें आणि अरबी शब्द व फारसी शब्द निरनिराळ्या ठिकाणच्या देश्य भाषांत घुसडणें हा होय. हिंदुस्थानांत या पद्धतीने हिंदीस फारसीचें स्वरूप दिलें, हिंदुस्थानीस उर्दु बनविली, मलयु भाषा व जावा येथील भाषा यांचें रुपांतर केलें आणि लखदिव मालदिव येथील मल्याळी भाषेचा एक निराळाच अपभ्रंश तयार केला.
पूर्वेकडील द्वीपकल्पामध्यें वर सांगितलेल्या संकोचकारणाशिवाय चिनी संस्कृतीचा विकास तेथील भारतीय संस्कृतीच्या संकोचास कारण होत आहे. फिलिपाइन्समध्यें स्पॅनिश लोकांनीं देशास जवळ जवळ पूर्णपणें ख्रिस्ती केलें आणि बर्याच लोकांवर स्पॅनिश भाषेचें दडपण घातलें. आता अमेरिकन लोकांच्या ताब्यांत फिलिपाइन्स आल्यानंतर तेथील लोकांत इंग्रजी भाषेचा जारीनें प्रसार होत आहे आणि तेथील सर्व भाषा नष्ट होऊन सर्व लोकांची भाषा इंग्रजीच होईल असाहि संभव दिसत आहे. जुन्या भाषांचे पूर्वीं केलेले कोश उघडून पाहून किंवा जीं कांहीं जुनीं गाणीं जतन करून ठेवलीं असतील तीं वाचून तेथील हिंदु संस्कृतीच्या अस्तित्वाची एखाददुसर्या संशोधकास आठवण होईल एवढेंच.
संस्कृत भाषेच्या प्रसाराबरोबर आणि त्या संस्कृतीच्या आवरणानें व्याप्त अशा राजांनीं केलेल्या विजयांबरोबर ज्या निरनिराळ्या ठिकाणच्या जनता एकीकरण पावल्या त्या आज हिंदुसंस्कृतीनें थोड्याशा चर्वित परंतु पूर्णपणें चर्वण न झालेल्या स्थितींत असल्यामुळें निरनिराळ्या जातींचें पृथक्त्व कायम राहिलें आहे. या अपूर्ण चर्वित स्थितीमुळें समाजांत जी विभक्तता दृष्टीस पडते तिला प्राकृत लोक जातिभेद म्हणतात, आणि चातुर्वर्ण्य हें समाजघटनेचें तत्त्व पूर्वींपासून बोधिलें गेलें असल्यामुळें आजची अचर्वित स्थिती त्या चातुर्वर्ण्यविषयक उपदेशाचाच परिणाम आहे असें समजून अप्रगमनशील लोक जातिभेदाचें आज समर्थन करीत आहेत, आणि प्रगमनशील वर्गापैकीं प्राकृत लोक जातिभेदाबरोबर पूर्वकालीन चातुर्वर्ण्यावरहि शिंतोडे उडवीत आहेत.
समाजाचें स्पष्ट स्वरूप न समजल्यामुळें चुकांनी भरलेलें बरेंच समाजविषयक वाङ्मय उत्पन्न झालें आहे.
हिंदुसमाजाचें स्वरूप समजण्यासाठीं त्याचे घटक असलेल्या व इतरत्रहि दिसून येणार्या दोन तर्हांच्या समुदायाचें स्वरूप लक्षांत घेतलें पाहिजे. पहिल्या प्रकारचा समुदाय म्हणजे राष्ट्र अगर राष्ट्रस्वरूपी जाति होय. ग्रीक, इंग्रज, आयरिश, ज्यू या राष्ट्रस्वरूपी जाती होत. दुसर्या प्रकारचा समुदाय म्हणजे संप्रदाय. संप्रदायांचीं उदाहरणें म्हटलीं म्हणजे ख्रिस्ती, मुसुलमान, महानुभाव, बौद्ध, आर्यसमाजी, ब्रह्मसमाजी इत्यादि होत. राष्ट्र अगर राष्ट्रस्वरूपी जाती राजकीय कारणांमुळें किंवा रक्ताच्या एकत्वामुळें बनलेली असते; आणि संप्रदाय हा एका गुरूनें कांहीं शिष्य गोळा केले आणि त्यांची परंपरा अनेक पिढ्या चालली म्हणजे बनतो, आणि त्या गुरूचा उपदेश हीं संप्रदायाचीं आदितत्त्वें होतात.
राष्ट्रस्वरूपी जाति कांहीं स्वतंत्र संस्कृति उत्पन्न करिते. त्या समुदायांत व्यक्तीची पदवी ठरविणारे नियम उत्पन्न होतात. तसेंच त्या राष्ट्रांतील लग्नव्यवहार किंवा उपासना ठरविणारे नियम राष्ट्रांत किंवा राष्ट्रस्वरूपी जातींत उत्पन्न होतात. तथापि या प्रकारच्या समूहांतील लोकांचीं मतें किंवा उपास्यें अनिश्चित असतात. या संस्कृतिवैशिष्ट्यामुळें वरवर पाहाणाराला त्यांचें आणि संप्रदायांचें सादृश्य दिसतें. तथापि संप्रदाय आणि राष्ट्र यांची घटना भिन्न आहे. संप्रदायांचें अस्तित्व आणि विस्तार हीं गुरूच्या उपदेशाच्या जिवंतपणावर अवलंबून असतात. संप्रदाय आपणांस अनुयायांचें सातत्य मिळविण्यासाठीं त्या मताच्या किंवा उपास्याच्या लोकांचा पृथक वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करितो आणि आपल्या लोकांस निराळे करण्यासाठीं त्या संप्रदायांतील आचार्यवर्ग आपल्या लोकांसाठीं निराळे संस्कार निर्माण करितो, निराळे आचार लावून देतो आणि आपल्या लोकांचा इतरांपासून निराळेपणा स्थापित करून त्यांची जात बनत चालली म्हणजे त्या संप्रदायांतील आचार्यवर्गाची भिक्षुकी अव्याहत चालते. संप्रदायांतील गुरू संप्रदायाबाहेर लग्नें बंद करण्याची आणि संप्रदायांतल्या संप्रदायांत लग्नव्यवहार मोकळा करण्याची खटपट करितात. ख्रिस्ती संप्रदायाचीच गोष्ट घ्या. ख्रिस्तानें लग्न वगैरे लावण्याचें काम कधीहिं केलें नाहीं. तथापि त्याच्या संप्रदयांतील लोकांनीं पुढें अनेक संस्कार निर्माण केले आणि आपल्या संप्रदायास भिक्षुकी जोडली. आज माध्वांचे गुरू अशी खटपट करीत आहेत कीं माध्वांनीं स्मार्तांबरोबर लग्न करूं नये आणि आपआपसांतील महाराष्ट्र, तैलंग, कन्नड इत्यादि जातिभेद विसरावेत.
अशा संप्रदांयांचें संवर्धन करण्याची पद्धति एकच आहे, ती ही कीं, समूहांत नवीन नवीन माणसें व्यक्तिशः घेणें.
जातिमूलक समुदाय आपल्या जातींत नवीन माणसें व्यक्तिशः घेण्याचा प्रयत्न करीत नाहींत, तर आपल्या जातीचा ज्या जातीशीं संपर्क येईल त्या जातींचें आणि आपलें स्वरूप एकसारखें होऊन सर्वसामान्य संस्कृति उत्पन्न व्हावी असा प्रयत्न करितात.
लहांनाचे मोठे समूह बनविण्याच्या या दोन पद्धती आहेत. यांपैकी दुसर्या पद्धतीनें हिंदुसमाज बनला आहे; आणि पहिल्या पद्धतीनें ख्रिस्ती व मुसलमान हे मोठे समुदाय तयार झाले आहेत.
हिंदुसमाज ज्या पद्धतीनें बनला त्या पद्धतीचें स्पष्टीकरण वर झालें. वाचकांनीं हें लक्षांत ठेवावयाचें कीं एका बाजूनें मुसुलमानी, ख्रिस्ती, जैन, इत्यादि संप्रदाय आणि दुसर्या बाजूनें सर्व सामान्य हिंदुसमाज, हे एकमेकांपासून अत्यंत भिन्न प्रकारचे समाज होत; आणि दैवतें, पारमार्थिक विचार तत्त्वज्ञान, कायदा, संस्कर्तृवर्ग यांचीं स्थानें या दोन्ही प्रकारच्या समाजांत एकमेकांपासून अगदीं निराळीं आहेत. हिंदुसमाजाचें ज्ञान करून द्यावयाचें म्हणजे दोन गोष्टी करावयाच्या, घटनापद्धति समजावून द्यावयाची आणि घटनाविषय स्पष्ट करावयाचे. पद्धतीचें स्पष्टीकरण वर झालें. आतां घटनाविषय अथवा घटक म्हणजे कोणते मनुष्यसमूह हिंदु या नांवाखालीं ओढले गेले हें स्पष्ट केलें पाहिजे.
य़ासंबंधानें अर्वाचीन संशोधन देण्यापूर्वीं जुन्या कल्पनेचा निदान उल्लेख करणें प्राप्त होतें. हिंदूंस आज अशी भावना आहे कीं-पन्नास वर्षांपूर्वीं तर ही भावना अत्यंत तीव्र होती कीं-आपण हिंदू हे सर्व एका वंशांतले आणि यूरोपीय हे दुसर्या एका वंशातले. सामान्य हिंदूंस तर असें वाटत होतें कीं, आपली उत्पत्ति मनुष्यांपासून झाली व इंग्रज वगैरे लोकांची उत्पत्ति माकडांपासून झाली. सीतेच्या आशीर्वादानें आज वानरांच्या वंशास राज्य मिळालें, इत्यादि कल्पना अडाणी हिंदूंत अजूनहि आढळतात. अर्वाचीन शास्त्रांचा अभ्यास हिंदुस्थानांत सुरू झाल्यापासून यूरोपीय लोक आणि हिंदूंचे संस्कृतिसंस्थापक पूर्वज हे एकच रक्ताचे होते हें कळून आलें आहे.
भाषाशास्त्राच्या व इतर संशोधनविषयक परिश्रमांच्या साहाय्यानें हिंदुस्थानांतील लोकसमाजाच्या घटनेचा इतिहास अधिकाधिक ज्ञात होत असून मानववंशाचे दुवे आतां जोडतां येऊं लागले आहेत. या नवीन ज्ञानानें जगांतील सर्व प्रकारचे लोक हिंदुस्थानांत आहेत एवढेंच केवळ सिद्ध होत नसून, परकीय लोकांचा प्रवेश जेणेंकरून अशक्य होईल अशा नियमानीं बांधलेल्या हिंदुसमाजांतहि ते लोक आहेत असें दिवसानुदिवस भासूं लागलें आहे. पूर्वबंगालमधील लोकांचा आणि ब्रह्मी, चिनी इत्यादि लोकांचा वंश एकच आहे; ब्राह्मण आणि बरेच यूरोपीय हेहि एकाच वंशातले आहेत, इत्यादि सिद्धांत मांडले गेले असून यूरोपांतील फिनलंड, हंगेरी वगैरे ठिकाणचे लोक, द्राविड जनता आणि आस्ट्रेलियांतील यूरोपीयांपूर्वींचे रहिवासी यांचाहि संबंध जोडण्यांत येत आहे. कोणी द्रविडांचा व यहुदी लोकांचा एकवंशसंबंध सिद्ध करण्याच्या खटपटींत आहेत.
येथे मानववंशशास्त्राचें ज्ञान वाचकांपुढें मांडणें अप्रस्तुत होय. तथापि हिंदुस्थानी जनतेंत कोणतें कोणतें रक्त आहे हें समजण्यापुरती माहिती देणें इष्ट आहे, म्हणून ती येथें देत आहों. येथें मग, शक, हूण पल्हव इत्यादि लहान लहान समुच्चयांविषयीं झालेला विचार उद्धृत करीत नाहीं. फक्त मोठ्या व ठळक लोकसमूहांविषयींचाच विचार ग्रथित करितों.
सध्यांच्या हिंदुस्थानांतील जनतेंत डॉ. कीनच्या {kosh अनंत कृष्ण अय्यर यांचें 'कोचीनचें जातीवर्णन' (मद्रास १९०९) या ग्रंथाची कीननें लिहिलेली प्रस्तावना.}*{/kosh} मताप्रमाणें पांच प्रकारचें रक्त आहे.
(१) पहीलें रक्त "कृष्णवामनांचें" (Negritoes). अंदमान व निकोबार बेटांमध्यें सिद्दीलोकांसारखी काळी आणि वांकड्या केसांची पण खुजी जात आहे. या जातीची कांहीं थोडी वस्ती पूर्वीं हिंदुस्थांनांत असावी असें अनुमान आहे. या जातीचे लोक हिंदुस्थांनांत कोणत्याहि एका ठिकाणीं अगर एका घटनेनें आढळत नाहींत. दर्याखोर्यांतून रहाणार्या वन्य जातींमध्यें ही जात मिसळून गेली असावी असें वाटतें. कारण कांहीं वन्य व कनिष्ठ जातींत या स्वरूपाचे लोक तुरळक सांपडतात. मद्रास इलाख्यांत डोंगराळ प्रदेशांतील कांही कनिष्ठ जातींत या प्रकारच्या केसांचे लोक विशेष आढळतात. यावरून हिंदुस्थानांत एका कालीं खुज्या निग्रोंचें अस्तित्व असावें, असें अनुमान बांधलेलें आहे. निरनिराळ्या जातींच्या लोकांमध्यें उरलेलीं हीं वर सांगितलेलीं शरीरलक्षणें काय तीं निग्रिटो लोकांच्या निशाणीदाखल राहिलेलीं आहेत. निग्रिटोंस या शरीरलक्षणांखेरीज जातिवैशिष्ट्याचें द्योतक असें दुसरें कांही एक आज मितीला जिवंत ठेवतां आलेलें नाहीं.
(२) निग्रिटोंशिवाय दुसरें एक रक्त दक्षिणेकडील भारतीयांमध्यें दिसतें तें "कोलेरियन" लोकांचें. द्राविडी भाषेस व आर्य भाषांसहि परकीय असे जे शब्द द्राविडी भाषांत शिरले आहेत त्यांवरून आणि द्राविड लोकांच्या इतर कांहीं विशेषांवरून एक अगदीं निराळीच जात या लोकांत शिरली असावी असें अनुमान काढलेलें आहे व संशोधकांनीं एका मोठ्या समुच्चयासाठीं बनविलेले कोलेरियन हें नांव या वर उल्लेखिलेल्या अवशेषांवरून अनुमानिलेल्या जातीस दिलें गेलें आहे.
(३) हिंदुस्थांनांतील तिसरें रक्त म्हणजे द्राविडी भाषा बोलणार्या लोकांच्या पूर्वजांचें होय. या भाषा बोलणारे लोक अफगाणिस्तानापासून सिलोनच्या उत्तर भागापर्यंत मधूनमधून आहेत. (अफगाणिस्तानामधील ब्राहुई भाषा ही द्रविड भाषा आहे).
(४) चवथें रक्त "आर्यन्" लोकाचें होय. वेद हे ज्या लोकांचे ग्रंथ आहेत आणि ज्या लोकांचे पूर्वज संस्कृत भाषा बोलत होते ते लोक "आर्यन्" होत.
(५) पांचवें रक्त "मंगोलियन" होय. बंगालमधील अनेक जाती "मंगोलियन" रक्ताच्या आहेत.
येथें हें सांगणें अवश्य आहे कीं डॉ. कीन यांचें वरील म्हणणें सर्वमान्य झालेलें नाहीं. हिंदुस्थानसरकारच्या खानेसुमारीखात्यास मानववंशशास्त्रीय विषयावर लिहिण्याचा प्रसंग अनेकदां येतो. या खात्याच्या अधिकार्यांस डॉ. कीन यांचें मत चुकलेलें वाटतें. या अधिकार्यांचें मत सामान्यतः असें आहे कीं, द्रविडी भाषेतील ज्या "भाषाविशेषां"ना डॉं. कीन आणि त्यांच्या अगोदरचे कित्येक पंडित परकीय लेखतात व कोलेरियन हें नाव देतात ते भाषाविशेष परकीय भाषेंतून द्राविडींत आलेले नाहींत, तर ते तिचेच आत्मभूत आहेत. तसेंच वाकंड्या केंसांची निग्रिटो म्हणून जी निराळी जात डॉ. कीन काढतात ती जात निराळी नसून, एकाच जातींत नानाप्रकारच्या केंसांचे लोक आढळतात त्याप्रमाणें अगदीं वांकड्या केसांचे लोक द्राविडी लोकांत स्वभावतःच उत्पन्न झाले असावेत असें त्यांचे म्हणणें आहे. असो.
भाषाशास्त्राच्या दृष्टीनें पडणार्या कालविभागांचा पुरावा आणि विवक्षित लोकसमुच्चयांतील माणसें कोठून आलीं हें सांगणार्या इतिहासाचा पुरावा या दोहोंची एका सिद्धांतासंबंधानें पूर्ण एकवाक्यता आहे. तो सिद्धांत हा कीं, हिंदुस्थानांत निरनिराळ्या वंशांतील लोकांचें आगमन झालें तें कांही वेदकालांत व कांहीं त्याच्या पूर्वीं झालें, व या निरनिराळ्या वंशातील लोकानां एकस्वरूपता आणण्याचें काम हिंदुसमाजानें केलें. ही एकरूपता आणणें या समाजास कसें शक्य झालें हें समजण्यासाठीं त्याचें स्थूल स्वरूप स्पष्ट झालें पाहिजें; आणि या स्वरूपाची कल्पना येण्यासाठीं भारतीय संस्कृतीचें स्वरूप लक्षांत आलें पाहिजे. हिंदुसमाज म्हणजे हिंदुसंस्कृतीनें बद्ध असा मनुष्यसमूह. या समूहास आजचें निश्चित स्वरूप येण्यास केवळ दैवतें, उपास्ये किंवा कुराणासारखे एकोक्त ग्रंथ कारणीभूत झालेले नाहींत. नानाप्रकारच्या सामाजिक व राजकिय घडामोडी आणि विद्येची, मतांची आणि विचारांची प्रगती यांचे एकमेकांवर परिणाम होऊन जगाच्या बर्याच मोठ्या भागांस एकत्व आणणारें जें संस्कृतिस्वरूप उदयास आलें त्यामुळें हिंदुसमाज आणि हिंदुसंस्कृति हीं बनली आहेत. यासाठीं भारतीय सामाजिक इतिहासाचें स्थूल स्वरूप आणि भारतीय इतिहासाशीं संबद्ध असलेलीं शास्त्रें यांचे आपण आकलन केलें पाहिजे. त्यांच्या ज्ञानाशिवाय अर्वाचिन भारतीय जनतेची घटना समजावयाची नाहीं. ही घटना सांगावयाची म्हणजे भारतीय इतिहासाचें अत्यंत व्यापक विराट् स्वरूप व्यक्त करावयाचें.
भारतीय इतिहास म्हणजे कांही एकच प्रकारचा इतिहास नव्हे. अनेक इतिहास त्यांत मोडतात आणि प्रत्येक इतिहास जाणण्यास निराळ्या प्रकारची तयारी लागते, हें विसरतां कामा नयें. असो.
या सर्वांत प्राचीन इतिहास म्हटला म्हणजे वेदकालीन भारतीयांचा इतिहास होय. या इतिहासांतील राजकीय घडामोडी आपणांस अजून फारशा समजल्या नाहींत. वेदकाल कोणता हें आंकड्यांनीं आज नक्की सांगतां येणार नाहीं. ज्या कालास आपण वेदकाल म्हणतों, त्या कालांतील घडामोडीच्या बोधक अशा अनेक कथा रामायण, महाभारत, पुराणें इत्यादि उत्तरकालीन वाङ्मयांत सांपडतात.
कुरुयुद्धपूर्व इतिहास हा वेदकालीन इतिहासच होय असें म्हणण्यास हरकत नाहीं. संहिता कुरुयुद्धानंतर सुमारें पन्नास वर्षांनीं अस्तित्वांत आल्या असाव्यात असें वाटतें. पुष्कळ ग्रंथकार (उदाहरणार्थ प्राचीन आणि अर्वाचीन कोशांचे कर्ते रघुनाथशास्त्री गोडबोले) प्राचीनकाल आणि अर्वाचीनकाल यांस विभागणारी रेषा कुरुयुद्धकाल ही समजतात. कलियुग आणि द्वापारांत युग-त्रितय यांची पृथक्कारक रेषा म्हणजे भारतीययुद्धसमाप्तीचा काल होय हें जुन्या संस्कृत ग्रंथकारांचे गृहीत तत्त्व आहे.
अर्वाचीन पंडीतांच्या दृष्टीनें वेदकालीन भारतीय इतिहासांत तत्कालीन सामाजिक स्थिति, विचारविकास, दैवतेतिहास, भाषाविकास हे अभ्यासाचे मुख्य विषय आहेत. भारतीय ग्रंथकार निराळ्या कारणांमुळें, म्हणजे उत्तरकालीन मतांचा किंवा शास्त्रांचा प्रारंभ शोधण्यासाठीं वैदिक वाङ्मयाकडे धांव घेत. आपल्या मतास किंवा परिश्रमास गौरव आणण्यासाठीं प्रत्येक शास्त्राचा तेथपासून उगम दाखविण्याची उत्तरकालीनांची पद्धति आहे. असो.
आपल्या संस्कृतीचा उदय, वृद्धि व अस्त यांच्या इतिहासाशीं संस्कृत भाषेचा उदय, वृद्धि व अस्त यांचें निकट साहचर्य आहे.
आर्यसंस्कृतीचा इतिहास आणि इतर संस्कृतींचा इतिहास यांमध्यें एक मोठा फरक आहे तो हा कीं, आपल्या संस्कृतीच्या अभ्यासास वाङ्मयाभ्यासापासून प्रारंभ करितां येतो, तशी इतर संस्कृतींची गोष्ट नाहीं. इतर संस्कृतींच्या इतिहासाचा अभ्यास करावायाचा झाल्यास समाजाच्या उत्क्रांतीच्या बर्याच पुढच्या कालांत वाङ्मयाशीं प्रसंग येतो. भरतखंडाच्या इतिहासाचें संशोधन करणारांनीं गारगोट्यांचीं हत्यारें, व शस्त्रीकरणार्थ कमीजास्त घडलेले दगड शोधून काढले आहेत. तथापि संस्कृतीच्या अनेक पायर्या एकाच भूमीवर एकाच कालीं दृग्गोचर होतात हें लक्षांत घेतलें असतां तीं गारगोटीचीं हत्यारें आणि ते दगड वेदपूर्वकाल दाखवितातच असें म्हणतां येत नाहीं. पाश्चात्य सुधारणांचें आगर जें मुंबई शहर त्याच्या क्रोशविंशतीच्या आंतच अर्धनग्न ठाकूर आणि कातकरी या जाती आढळतात. वस्तुस्थिति अशी असतां प्रास्तरसंस्कृतीचा शहाणा अभ्यासक आपल्या साहित्याची अक्षर शब्दांनीं तयार झालेल्या वेदवाङ्मयाशीं स्पर्धायुक्त तुलना करण्यास धजावेल असें वाटत नाहीं. मनुष्याच्या वाणीनें जे वाङ्मय निर्माण झालें आहे, त्याच्या अभ्यासास ऐतिहासिक पद्धतीची जोड मिळाल्यास, आणि त्या वाङ्मयाच्या अभ्यासास योग्य अशी अधिक सूक्ष्म ऐतिहासिक पद्धति उत्पन्न झाल्यास, जें फल आपल्या हातीं लागणार आहे, तितकें महत्त्वाचें फल जगांत दुसर्या कोणत्याहि प्राचीन विषयाच्या अभ्यासानें प्राप्त होणार नाहीं अशी आमची भावना आहे.
दगड, गारगोट्या, यांचा अभ्यास आणि वाङ्मयाचा अभ्यास यांची तुलना करणें अगदींच अप्रशस्त आहे. क्रीट बेटाभोंवतालच्या व एजियन समुद्रांतील द्वीपांच्या पुरातन संस्कृतीचे जे आज उच्च प्रकारचे अवशेष राहिले आहेत तसल्या अवशेषांची मात्र जुन्या वाङ्मयाशीं थोडी बहुत तुलना करणें योग्य होईल आणि अशी तुलना केली असतां वाङ्मयरूपी साहित्याची अधिक उपयुक्तताच उघड होते. मोठमोठ्या अवशेषांवरून प्राचीन सांपत्तिक स्थिति अनुमानानें काढतां येते. परंतु, निरनिराळ्या जातींचा सन्निकर्ष, लोकांचें अंतःकरण, लोकांची विचार करण्याची शक्ति आणि शास्त्रघटनेंत झालेली प्रगति हीं वाङ्मयावशेषांवरून जशीं काढतां येतात तशीं जमिनींतील मातीचीं टेंकाडें खणून पत्ता लावलेल्या राजवाड्यांच्या अवशेषांवरून काढतां येत नाहींत. काव्याचे विविध प्रकार, छन्दःशास्त्र, इत्यादि प्रगतिबोधक प्राचीन गोष्टींचें अस्तित्व वाङ्मयद्वाराच आज आम्हांला प्रतीत होऊं शकतें. असो. ज्या राष्ट्रास आपले अत्यन्त प्राचीन वाङ्मय उत्तम रीतीनें जतन करण्यांचें श्रेय आहे असें राष्ट्र भारताशिवाय दुसरें नाहीं. या बाबतींत आपल्या जोडीला दुसरें एखादें राष्ट्र येऊन बसलेंच तर तें प्राचीन असुरांचें अथवा प्राचीन इजिप्शिअन किंवा चिनी लोकांचें बसेल. तथापि या राष्ट्रांस संस्कृतीचें सातत्य आणि पद्धतशीर संवर्धन या बाबतींत भारतीयांच्या पुढें मान वांकवावी लागेल; आणि चिनी राष्ट्रानें संस्कृतिसातत्यामध्यें जरी हिंदुस्थानापेक्षां अधिक मान्यता मिळवली आहे तरी आपल्या संस्कृतीचा कायमपणा राखून तिचा प्रकाश इतर राष्ट्रांवर अनेक शतकें पाडण्याचे श्रेय जें भारतास मिळालें आहे तें चीन देशास लाभलेलें नाहीं.
वेदकालापासून जो इतिहास सुरू होतो त्याचे विभाग पाडण्याच्या कामीं उपयोगी असें जें अनेक प्रकारचें संक्रमणसूचक साहित्य आहे त्यांत भाषाभेद हें एक मुख्य साहित्य होय. तर या दृष्टीनेंच आपण प्रस्तुत इतिहासाचे विभाग पाडूं. इतिहासविषयाची विभागणी भाषातत्त्वानें करावी हें तत्त्व आर्यन् महावंशाच्या भारतपूर्वकालासहि लावतां येईल. आर्यांची वेदभाषा आणि पर्शूंची अवेस्ती भाषा यांच्या पृथक्त्वाबरोबर या लोकांचें सांस्कृतिक पृथक्त्वहि स्पष्टपणें दिसून येतें. पर्शुमगांच्या वाङ्मयांत वरुणाचा लोप झाला आहे, निदान त्याचें स्वरूपांतर झालेलें आहे. वैदिक वाङ्मयांत असुर शब्दाचें अर्थांतर झालेलें नजरेस येतें. इंद्र हा वेदांत देवता आहे तर अवेस्तांत दैत्य आहे. वेदभाषेंत मंत्रभाषा आणि ब्राह्मणभाषा असे प्रकार आहेत व त्यांजमध्यें विचारभेद पण दृष्टीस पडतो. पाली वाङ्मयाचा विकास समाजाचें निराळेंच स्थित्यंतर दाखवितो. अर्धमागधी वाङ्मय निराळ्याच एका संप्रदायाची छाप व्यक्त करितें. बौद्ध व जैन यांचें संस्कृत वाङ्मय या संप्रदायांचें एतद्देशीय समाजांतील स्थान पूर्वींपेक्षां कांहीं वेगळेंच झाल्याचें नजरेस आणतें. अर्वाचीन भाषांचें वाङ्मय अर्वाचीन कालाचें बोधक आहे. उर्दूभाषा हीच काय ती मुसुलमानी महत्त्वाचें सूचक आहे असें नव्हे तर अर्वाचीन भाषांत भासमान होणारें फारसीं शब्दांचें अस्तित्वही अशा प्रकारच्या विशिष्ट राजकीय परिस्थितीचें द्योतक आहे. मराठी भाषेंत 'दिठीचे' जागीं 'दृष्टि,' 'ठाण' चे जागीं 'स्थान,' अशाप्रकारें संस्कृतसाधित शब्दाच्या ठिकाणीं शुद्ध संस्कृत शब्द वापरण्याचा प्रकारहि विशिष्ट प्रकारच्या वाङ्मयीन, राजकीय व सामाजिक स्थितीचा बोधक आहे. याप्रमाणें समाजाचा वाङ्मयीन व भाषाविषयक इतिहास आणि त्याचा इतर राजकीय, सांप्रदायिक वगैरे इतिहास यांच्यामध्यें केवळ एककालीनत्वच नाहीं, तर अन्योन्याश्रयहि आहे, आणि म्हणून कोणत्याहि संस्कृतीच्या स्वरूपाचें व इतिहासाचें ज्ञान करून घेतांना तत्संबद्ध वाङ्मयाचा व वाणीणी इतिहास बारीक दृष्टीनें चाळणें अति अवश्यक असतें. राष्ट्राच्या इतिहासांत जे लहानसान फेरफार किंवा ज्या मोठमोठ्या क्रांत्या होतात त्यांचें महत्त्वमापन करण्यास भाषाविकृतींसारखें निश्चयात्मक साहित्य दुसरें कोणतेंच नाहीं. ज्या सामाजिक व राजकीय फेरफारांच्या योगानें भाषेंत विशेष फेरफार होत नाहींत ते क्षुल्लक होत; आणि जे फेरफार भाषेचें स्वरूप बदलून तिला शिष्ट बनवितात, किंवा तिचें उच्चाटन करतात, किंवा तिची लिपी बदलतात, किंवा तिच्यांत परकीय शब्द भेसळवून तिच्या मूळ स्वरूपाची ओळख पटणें कठिण करितात ते सर्व मोठे फेरफार होत.
आपल्यापूर्वीं होऊन गेलेला जो इतिहासविषयीभूत काल त्याचे भाग पाडण्यासाठीं किंवा विधायक आणि विध्वसंक मानवी करामतींचें इतिवृत्त संगतवार लिहिण्यासाठीं जेव्हां आपणांस वृत्तांचे संच करावयांचे असतात तेव्हां विषयांचे तुकडे पाडण्यासाठीं भाषातत्त्वाचा आश्रय करणेंच सशास्त्र होय.