प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.
वेदभाषा - वेदग्रंथातील स्तोत्रें, प्रार्थना, मंत्रतंत्र, वगैरे जे प्राचीनतम भारतीय वाङ्मयाचे अवशेष आज उपलब्ध आहेत, त्यांत वापरलेली भाषा ही या पहिल्या सदरांत येते. हिला वेदभाषा असेंहि म्हणतात. ही वेदभाषा जरी एकाकालीं आमच्या बोलण्याच्या भाषेचेंच उच्च स्वरूप होतें तरी हिचा हा दर्जा पूर्वींच नाहींसा झाला असून अलीकडे केवळ शास्त्री पंडित लोकांत वंशपरंपरेंनें वेदमंत्र वगैरे म्हणण्याच्या कामींच हिचा उपयोग होत आलेला आहे. या भाषेची जुनाट रचना अद्यापिहि बुद्धिपुरःसर कायम ठेवण्यांत आलेली आहे.
वेदभाषा व पर्शुभारतीय मूलभाषा-वेदभाषा एका काळीं सामान्य लोकभाषा होती आणि ती भरतखंडाच्या वायव्येकडील प्रदेशांत आलेल्या "आर्य" म्हणविणार्या लोकांत चालत होती. ही भाषा प्राचीन इराणी व बॅक्ट्री या भाषांशीं अगदीं सदृश असून वेदभाषा व प्राचीन अवेस्ती भाषा यांच्या तुलनेनें भाषाशास्त्रवेत्त्यांनीं कल्पिलेली जी 'पर्शुभारतीय' भाषा त्या मूलभाषेहून फारशी वेगळी नसावी. संस्कृत व पाली या भाषांत जितका फरक आहे तितका वेदभाषा व पर्शुभारतीय मूलभाषा यांमध्ये असेल असें दिसत नाहीं.
संस्कृत व वेदभाषा - य़ा दोहोंतील वर्णोच्चार बहुधा सारखेच आहेत. यांमध्यें जो फरक आहे, तो वेदभाषा संस्कृतपेक्षां फार जुनी असून तींत संस्कृतपेक्षां पुष्कळच अधिक रूपें व प्रयोग वगैरे आहेत, यामुळें आहे. उदाहरणार्थ या जुन्या वेदभाषेंत संकेतार्थ आहे तो संस्कृतांत नाहीं; जुन्या भाषेंत तुबन्ताचें रूप १०।१२ प्रकारांनीं साधीत असत, सध्यां एकच प्रकार आहे; इत्यादि.
वेदभाषेचीं दोन स्वरूपे-वेदभाषेचें जें स्वरूप ऋग्वेदाच्या प्रथम नऊ मंडळांत प्रामुख्यानें सांपडतें तें ऋग्वेदाचें दहावें मण्डळ व अथर्ववेदांतील आणि यजुर्वेदांतील कांही भाग यांमध्यें दृष्टीस पडत नाहीं.
वैदिक ग्रंथांत संस्कृत - ब्राह्मणें, आरण्यकें व उपनिषदें हे जे वैदिक गद्य ग्रंथ आहेत त्यांत जुनी वेदभाषा अगदीच थोडी असून ते बहुधा संस्कृत भाषेंतच आहेत असें म्हणतां येईल. वेदांगांतील सूत्रें कांहीं ठिकाणीं वैदिक स्वरूपाचीं दिसतात तरी मुख्यतः तीं शुद्ध संस्कृतांत आहेत.
वेदाचें व्याकरण - वेदभाषेच्या व्याकरणावर पाणिनीनें परिश्रम केले पण पाणिनीनंतर या विषयावर पुढें फारसा परिश्रम झाला नाहीं, आणि अर्वाचीन ऐतिहासिक दृष्टि पाणिनीनें व इतरांनीं क्वचितच वापरली आहे. यामुळें वेदविषयक अभ्यासाचे कामीं केवळ या वैयाकरणांवर विसंबून राहिल्यास अभ्यासांत बराच दोष राहतो. हा दोष अर्वाचीन ऐतिहासिक दृष्टीच्या वैयाकरणांच्या मदतीनें थोडाफार दूर करितां येतो. अर्वचीन पाश्चात्य पंडितांनीं वेदांतील निरनिराळ्या शब्दांचा, अव्ययांचा, प्रत्ययांचा वगैरे ऐतिहासिक अभ्यास केला असून त्या अभ्यासाचा उपयोग त्यांनीं वेदांतील सुक्तांचा कालानुक्रम ठरविण्याकडे केला आहे.
वेदकाल-वेदाचा रचनाकाल म्हणजे एक लहानसा काल नसून तो एक किंवा अनेक हजार वर्षांचा काल असावा असें दिसतें. या कालांतच य़ज्ञ लहानांचे मोठे बनले व जवळ जवळ नष्टही झाले. मूळ देवतांचीं स्वरुपें पालटून नवीन दैवतें उत्पन्न झालीं. वैदिक भाषा बोलणारांची प्रगति अफगाणिस्तानापासून बिहारपर्यंत झाली हें ऋग्वेदमंत्रांवरून दिसून येतें. तैत्तिरीय आरण्यक व ऐतरेय ब्राह्मण हे ग्रंथ घेतले तर आंध्र कर्नाटकादि दाक्षिणात्य राष्ट्रांचाहि उल्लेख त्यांत आढळतो. वेद कालाच्या दिर्घत्वाची कल्पना ज्या एका गोष्टीवरून बरीच चांगली येते ती ही कीं, वेदकालांत उत्तरार्धांतील लोकांस पूर्वांर्धांतील लोकांची भाषा समजेनाशी झाली होती. कुटण्याच्या क्रियेच्या वाचक शब्दाशीं एका शब्दाच्या ध्वनिसादृश्याखेरीज कांही एक संबंध नाहीं असा "कुक्कुटोसि मधुजिव्ह" हा कुटण्यासाठीं बेधडक योजलेला मंत्र वाजसनेय संहितेंत सांपडतो. मंत्रांचा अर्थ जनतेस कळत नसल्यामुळे क्रिया व मंत्र यांची जुळणी करतांना मंत्राच्या अर्थाच्या ऐवजीं मंत्रांतील शब्दांच्या ध्वनीवरून अडाणी श्रोत्यांमध्यें मंत्र क्रियावाचक आहे असा भाव उत्पन्न होईल या अपेक्षेनें वाटेल तो मंत्र दडपून द्यावयास जनता मंत्राची भाषा न समजण्या इतकी अपसृष्ट झाली असली पाहिजे हें स्पष्ट होतें. अशा तर्हेचीं मंत्रांच्या भाषेशीं जनतेच्या असलेल्या अपरिचयाचा फायदा घेतला जात आहे असें दाखविणारीं उदाहरणें उत्तरकालीन विधींच्या प्रयोगांत अनेक आढळतात. वेदकाल म्हणून उल्लेखिलेल्या या दीर्घ युगांत साखर, मीठ इत्यादि उपयुक्त जिनसांशीं व यवाखेरीज इतर धान्यांशीं आर्यांचा परिचय नव्हता त्या कालापासून तों तहत अनेक धान्यांशीं व इतर जिनसांशीं त्यांचा दृढ परिचय ज्या कालांत झाला त्या कालापर्यंतचा सर्व काल येतो.
राजकीय दृष्टीनें या युगाकडे पाहिलें तर सर्वत्र लहान लहान संस्थानें आणि तेथें राजांची निवडणूक अशाप्रकारचें शासनसंस्थाशैशव या युगाच्या एका भागांत दृष्टीस पडतें, तर त्याच्याच दुसर्या भागांत मरुत्ताच्या साम्राज्यासारखीं मोठमोठीं साम्राज्यें दृष्टीस पडतात. तसेंच, सामाजिकदृष्ट्या पाहतां अस्थिर स्त्रीपुरुषसंबंधापासून पूर्ण प्रगल्भ अशागृहस्थधर्माच्या स्थापनेपर्यंतचा दीर्घकाल या वेदरचनायुगांत मोडतो. या सर्व गोष्टींवरून वेदकालाचा दीर्घ विस्तार आपल्या लक्षांत येतो. असो.