प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ३ रें.
हिंदु आणि जग.
भारतेतिहासाभ्यासास साहित्य :— मूलगृहकालावर झालेलें संशोधन अल्पप्रमाणानें द्यावयाचें म्हटलें तरी त्याचें स्वतंत्रपणें विवेचन पाहिजे. असें विवेचन प्रारंभींच देणें अप्रस्तुत होईल म्हणून त्या खटाटोपांत आम्ही सध्यां पडत नाही. या अभ्यासाचीं जीं अनेक अंगे आहेत त्यांची सामान्य कल्पना आतांपर्यंत दिलेल्या माहितीवरून वाचकांच्या लक्षांत येईलच. आतां भारतीय इतिहासाचें अध्ययन करण्यासाठीं उपांगें म्हणून ज्या शास्त्रांची वृद्धि झाली आहे त्यांची सामान्य कल्पना येण्यासाठीं यादीच्या रूपानें कांहीं माहिती खालीं देतों. या यादीच्या योगानें आपली कल्पना विस्तृत होईल. तथापि ही यादी संपूर्ण आहे असें मात्र समजूं नये.
(१) भाषांचा तौलनिक अभ्यास. यांत वेदभाषा, संस्कृत, युरोपांतील जुन्या भाषा आणि इराणी जुन्या भाषा यांचा उपयोग वेदकालपूर्वस्थिति काढण्यासाठीं करावयाचा.
(२) संस्कृत भाषेचा ऐतिहासिक अभ्यास. वेदकालांत कोणते शब्द प्रचलित होते, पाणिनीस कोणते शब्द ठाऊक होते, वेदकालीं शब्दांचा अर्थ काय होता, पाणिनिकालीं काय होता, अर्थांत फरक झाला असल्यास त्यास सामाजिक कारणें काय झालीं, इत्यादि गोष्टींचा अभ्यास.
(३) वेदभाषा, संस्कृत, प्राचीन प्राकृत भाषा आणि अर्वाचीन भाषा यांचा तौलनिक अभ्यास. यावरून भाषांच्या अपभ्रंशांचे नियम, लोकांचें इतस्ततः भ्रमण, इत्यादि काढतां येईल.
(४) हिंदुस्थानांतील स्थावर आणि जंगम लिखाणांचा अभ्यास. हा अभ्यास अनेक तर्हांनीं करतां येईल. यांचा भाषेच्या दृष्टींनें अभ्यास केला तर वर सांगितलेल्या भाषांच्याच अभ्यासास कांही अंशी हा एक भाग होईल, तथापि लिखाणविषयक अभ्यासाची व्याप्ति तेवढीच नाहीं. हिंदुंचीं व हिंदुस्थानाचीं लिखाणें केवळ संस्कृतसंभव भाषांतच नाहींत. हिंदुस्थानांतील द्राविडी भाषांत व इतर बाहेरच्या भाषांत देखील लिखाणें आहेत. त्याप्रमाणेंच हिंदुस्थानाच्या बाहेर हिंदु संस्कृति जेथें गेली आहे तेथील लिखाणें संस्कृत किंवा स्थानिक भाषांतून आहेत. यामुळें लिखाणांचा अभ्यास करण्यासाठीं अनेक भाषांचा अभ्यास भारतीय इतिहासाच्या अभ्यासकास उपयुक्त आहे. याशिवाय लिखाणें एकाच लिपींत नसून अनेक प्रकारच्या लिपींत लिहिलीं किंवा कोरलीं गेलीं आहेत. आणि यामुळें लिपींत अभ्यास हाहि एक महत्त्वाचा अभ्यास होऊन बसला आहे.
(५) लिखाणांच्या अभ्यासाशीं संबद्ध असा दुसरा एक अभ्यास म्हटला म्हणजे "मुद्राविज्ञान" होय. आजपर्यंत निरनिराळीं राजघराणीं होऊन गेलीं. त्यांच्या मुद्रांचे उर्फ नाण्यांचे अवशेष आज शिल्लक आहेत, तेहि एक अभ्यासाचा मोठा विषय झाले आहेत.
(६) भारतीय अभ्यासाचा आणखी एक भाग म्हटला म्हणजे संस्कृत भाषेशीं असंबद्ध अशा भारतांतील आणि भारतीय संस्कृतीचा ज्यांवर परिणाम झाला त्या प्रदेशांतील भाषांचा अभ्यास होय. द्राविडी भाषांचा अभ्यास आणि पूर्वेकडील ज्या प्रदेशांत भारतीयांच्या वसाहती झाल्या तेथील भाषांचा अभ्यास या वर्गात मोडतो. नवीन शब्द संस्कृत भाषेंतून इतर भाषांत ज्याप्रमाणानें अधिक जातात त्या प्रमाणानें त्या देशांत भारतीय संस्कृतीचा विकास कितपत झाला याचें मोजमाप करतां येतें. शिवाय संस्कृत भाषेचा अपभ्रंश दाखविणारे शब्द तेथें आढळले तर त्यांचें हिंदुस्थानांतील अपभ्रंशांशीं नातें जोडतां येतें, आणि त्यामुळें हिंदुस्थानांतील कोणते लोक तिकडे गेले, कोणत्या प्रांतांतून गेले, कोणत्या काळीं गेले, कोणत्या मार्गानें गेले इत्यादि प्रश्न सोडविण्यास मदत होते. तसेंच भाषांतील वाङ्मयहि पाहिलें पाहिजे. कारण त्या वाङ्मयांत भारतीय वाङ्मयाचीं रूपांतरें किंवा अवस्थांतरें दृष्टीस पडतात.
(७) मानववंशशास्त्रात्मक अभ्यास. हा भारतीय अभ्यासाचें एक महत्त्वाचें अंग आहे. जातींचीं नांवें, गोत्रांचीं नांवें, देवदेवकांची नावें, कुलदेवता इत्यादि फार प्राचीन कालाची स्थिति दाखविणारें साहित्य आपल्या देशांत इतर देशांपेक्षां अधिक आहे. या सर्व गोष्टींचा उपयोग करून आणि शरीरावयवांचीं मापें वगैरे साहित्य वापरून भारतीयांच्या पूर्व परंपरेचे धागे जोडणें हेंहि महत्त्वाचें काम आहे.
(८) दैवतें, कल्पना, विचार, तत्त्वज्ञान इत्यादि साहित्याचा अभ्यास करून त्यांचा इतिहास तयार करणें हें आणखी एक महत्त्वाचें कार्य आहे. तसेंच भारतांत जीं अनेक शास्त्रें प्रकट झालीं त्यांचा इतिहास जुळविणें हें एक काम आहे. शिवाय, वास्तुसौंदर्याच्या भारतांतील कल्पना आणि बाहेरील कल्पना यांची संगति लावण्याचें काम आहे. संगीत, वैद्यक इत्यादि कलांचा अभ्यास आपणांस अवश्य आहे. हा एकंदर अभ्यास करण्याचे प्रकार दोन आहेत. भारतीयांनीं केलेल्या अभ्यासाचा हिशोब घेणें हा एक प्रकार होय; आणि भारतीयांनीं जतन केलेलें साहित्य वापरून त्याचा आजच्या वाढलेल्या शास्त्रीय पद्धतीनें उपयोग करणें हा दुसरा प्रकार होय. संस्कृत भाषेच्या अभ्यासासाठीं पाणिनीसारख्या आपल्या वैयाकरणांनीं सांगितलेले व्याकरणाचे नियम लक्षांत घ्यावयाचे, आणि त्या वैयाकरणांच्या खटपटीचा इतिहास तयार करावायाचा हा पहिला प्रकार होईल. दुसरा प्रकार म्हटला म्हणजे संस्कृत भाषेचे नमुने घेऊन आपण स्वतंत्र व्याकरण बनवावयाचें हा होय. या दुसर्या प्रकारानें पाणिनीनें वेदांचा अभ्यास केला. पाणिनीपेक्षां देखील आजच्या पाश्चात्य पंडितांकडून असा अभ्यास अधिक झाला आहे. या नवीन प्रकारच्या अभ्यासानें जुन्या अभ्यासाचें अधिक संवर्धन होतें; आणि जुन्या अभ्यासपद्धतीची परंपरा बरीच कायम राहून तींत इष्ट असे फेरबदल होतात. असो.
श्रुतिस्मृतिपुराणादिग्रंथांतर्गत भाषांचें, कल्पनांचें आणि चालीरीतींचे पृथक्करण करून आणि त्यांचे परस्पर संबंध शोधून त्यावरून त्या भाषा, कल्पना, आणि चालीरीती ज्या लोकसमूहांत चालत असतील त्या निरनिराळ्या लोकसमूहांचा परस्पर संबंध शोधतां येतो. या पृथक्करणाच्या अभ्यासानें आजच्या हिंदूचें मानववंशविषयक घटक शोधतां येतील एवढेंच नव्हे तर पृथक्करणविषय होणार्या ग्रंथांचें ऐक्य व त्यांची लोकमान्यतेच्या दृष्टीनें व्यापकता परिचित असल्यामुळें ज्यांचें मानववंशीय पृथक्त्व शास्त्रीय पद्धतीनें शोधून काढलें आहे अशा सर्व लोकांस एकस्वरूपता निरनिराळ्या काळीं कशी येत गेली याचा पत्ता लागेल.
शास्त्रांची वृद्धि, शास्त्रांचा प्रसार, वाङ्मयाचें एकीकरण, जुनें वाङ्मय दृष्टीआड होऊन नवीन वाङ्मय उत्पन्न होणें, या सर्व गोष्टी समाजाच्या घटनेचा इतिहास दाखवितात. वेदपूर्वकालीन निरनिराळ्या लोकसमूहांचें असलेलें ऐक्य, वेद, अवेस्ता व यूरोपीय ग्रंथ यांच्या तुलनेनें बाहेर पडेल, तर वेदविस्ताराबरोबर सामाजिक रूपांतर कसें काय होत गेलें, भारतांत आलेलीं "आर्यन्" वंशांतील राष्ट्रें पूर्वींच्या भाऊबंदांपासून कशीं वेगळीं वेगळीं होत गेलीं, आणि देश्य लोकांशीं संस्कृतिदृष्ट्या एकजीव होण्यास अनुकूल स्वरूपाचीं कशीं बनत चाललीं याचा वृत्तांत वैदिक वाङ्मयाची उत्तरकालीन वाङ्मयाशीं तुलना झाल्यास कळून येईल. वैदिक वाङ्मयाची विस्मृति आणि महाभारताचा आणि पौराणिक वाङ्मयाचा विकास समाजाची दुसरी एक स्थिती दाखवितो. पारमार्थिक कल्पनाच केवळ नाहींत तर शास्त्रविषयक किंवा शास्त्राभासात्मक गोष्टी देखील हिंदु समाजाच्या घटनेवर परिणामकारी झाल्या आहेत. सर्व लोकांस एकस्वरूपता देण्यास जेथें मंत्रांचें संहितीकरण असमर्थ झालें, महाभारतांतील मनोरम कथानकें, रामायणासारखें सुंदर आर्ष काव्य, किंवा वेदांतासारखें अंत्यत व्यापक तत्त्वज्ञान लोकांच्या एकीकरणास जेथें असमर्थ ठरलें, तेथें परमार्थापेक्षां प्रत्येक मनुष्यास हालवून सोडणारा जो स्वार्थ त्याचा अदृष्टशक्तींशीं निकट संबंध जोडून फोफावलेलें फलज्योतिष सर्व लोकांस एकत्र बांधू शकलें. वेदांनीं, स्मृतींनीं, पुराणांनीं, बुद्धाच्या धम्मानें, जैनांच्या धर्मांनीं, चार्वाकांच्या उपदेशानें जेथें आचारैक्य उत्पन्न झालें नाहीं तेथें बरेचसें आचारैक्य फलज्योतिषांनें उत्पन्न झालें. एवंच हिंदुसमाजाचें एकत्व समजण्यासाठीं बर्याच लोकांस एकत्र बांधणार्या वाङ्मयाचा इतिहास ज्याप्रमाणें समजला पाहिजे त्याप्रमाणें शास्त्रांचाहि इतिहास समजला पाहिजे. यज्ञ करतांना वेदी कशी करावी, मंत्रोच्चार कसे करावे याविषयींचे भेद जेथें समाजांत एकमेकांशी लग्ने न करण्याच्या प्रवृत्तीस बंधनकारक होतात, तेथें वाङ्मयाच्या व शास्त्रांच्या इतिहासाच्या ज्ञानाशिवाय समाजघटनेचें स्पष्टीकरण कसें होईल ?
कांही माणसांस एकानें आपल्याकडे वळवून इतरांपासून विभक्त करणें ही क्रीया, व तशीच भिन्नजनांच्या कर्मांचें, उपासनांचें किंवा मतांचें एकीकरण व एकवाक्यता करून तदनुयायी जनतांचे एकीकरण करणें ही क्रीया, या दोन्ही क्रिया समाजांत चालू असतात. विश्वामित्रवसिष्ठांचें भांडण, वैशंपायन व याज्ञवल्क्य यांचें भांडण, बुद्ध, महावीर, बसव, महानुभाव यांच्या संप्रदायांच्या स्थापना, हे सर्व प्रयत्न जर लोकांस विभक्त करण्यास कारण झाले असतील तर वेदांचें संहितीकरण, महाभारतरचना, मनुस्मृतीचा उद्भव, पंचायतनपूजा हे प्रकार अनेक भिन्न लोकांस एकत्र आणण्यास कारण झाले आहेत.
हिंदुमध्यें वाढलेलें वाङ्मय, त्याप्रमाणेंच वाङ्मयामुळें, शास्त्रीय परिश्रमामुळें आणि निरनिराळे विचारसंप्रदाय लोकांत प्रसृत झाल्यामुळें संस्कार पावलेली भाषा, व संप्रदायामुळें आणि एका संस्कृतीच्या छत्राखालीं अनेक लोक आल्यामुळें त्यांमध्यें उत्पन्न झालेली समाजपद्धति, या सर्वांचा हिशोब घेणें हा सांस्कृतिक अभ्यासाचा मुख्य विषय आहे. तसेंच आज सर्व जगाशीं आपल्या जनतेचा संबंध येत असल्यामुळें हिंदुंच्या बाहेरील जगाच्या संस्कृतींचा अभ्यास आपणांस इष्ट असणार्या अभ्यासाच्या पूर्तींसाठीं करावयास पाहिजे.