प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २७ वें.
मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास.
अर्धवट गुलामगिरी - गुलामगिरी प्रत्येक देशांत निरनिराळ्या पद्धतीनें होतीच. अमेरिकेंतील गुलामगिरीमध्यें गुलामांतील कुंटुबपद्धति नष्ट झाली व गुलामांनां पशूंचें स्वरूप आलें. तशी गुलामगिरी जगांत दुसरीकडे कोठंहि नसावी. ग्रीस रोमध्यें गुलामगिरी होती, युरोपात अगदीं अर्वाचीन काळापर्यंत सर्फ म्हणून गुलाम असत. ज्या वेळेस पोलंडचें स्वातंत्र्य नष्ट झालें त्या वेळेस सामाजिक परिस्थिति अशी होती कीं, तेथें लाख दोन लाख क्षत्रियवर्गतुल्य स्वार सरदार होते, व्यापार यहूद्यांच्या हातीं होता व बाकीचे सर्व लोक सर्फ होते. त्यामुळे पोलंडच्या संरक्षणाच्या कामाला त्यांतील फारच थोडा वर्ग उपयोगीं पडला आणि त्याचें स्वातंत्र्य गेलें. इंग्लंडमध्यें तेराव्या- चौदाव्या शतकापर्यंत जमीन करणारे शेतकरी जमीनीला बांधले गेले असत त्यांस जमीन सोडून जातां येत नसे. आणि जेव्हां जमीनदार जमीन विकी तेव्हां अर्थात् आंतील कामकरी वर्गासह विकी. इंग्लंडमधील मध्ययुगीन गुलामगिरी सुधारलेल्या स्वरूपांत आज मध्यप्रांत सरकारनें २०० व्या शतकांत चालू ठेवली आहे. तेथें बरीच जमीन अशी आहे कीं, व्यक्तीस आपल्या मालकीची जमीन आपल्या मुलास ठेवतां येते पण विकतां येत नाहीं. ख्रिस्ती संप्रदाय प्रेमाचें तत्त्व ओठानें उच्चारीत असतां त्यानें गुलामगिरी मात्र नष्ट केली नाही. तर उलट जोपर्यंत गुलामगिरी देशांत होती, तोपर्यंत देवळे आपल्या मालकीचे स्त्री व पुरुष गुलाम करीत असत आणि कोणास गुलाम पुरूषाबरोबर अगर गुलाम स्त्रीबरोबर लग्न करावयाचें असेंल तर लग्नानें दुसरा पक्ष देवळाचा गुलाम होई. येणेंप्रमाणें देवळें गुलामाची अवलाद वाढवीत. कुळाला लग्नाला पैसे देऊन जन्मभर कुळास कर्जांत ठेवून त्याजपासून जन्मभर नोकरी घ्यावयाची ही पद्धति आपण आपल्या समक्ष हिंदुस्थानांत मृत होत असलेली पहात आहोत. गुलामगिरीच्या योगानें तीन वर्गांची अवनति होते एक तर मनुष्यास पशूसारखें वागविल्यानें व संपूर्ण पारतंत्र्याने त्याचें मन नेहमीं दुःखांत असणें ही गुलामाची अवनति होय. पण गुलामगिरीचा परिणाम त्या देशांतील स्वतंत्र कामकरी वर्गावरहि अनिष्ट होतो. स्वतंत्र कामकरी वर्ग तेथें टिकत नाही; कां कीं काम करणें हीच गोष्ट हलकी होते. याशिवाय जेथें स्वतंत्र काम करणारा मनुष्य येणार नाहीं, तेथें कसलाच विकास व्हावयाचा नाहीं. म्हणजे तो प्रदेशहि सुसंपन्न होत नाहीं. अर्थात तेथील सरकारहि दरिद्रीच रहावयाचें. गुलाम बाळगणा-या वर्गावरहि कांहीं अनिष्ट नैतिक परिणाम होतात. अमेरिकेंत गुलाम बाळगणा-या आणि गुलामांची पैदास करण्याच्या धंद्यात असलेल्या गो-या लोकांच्या मुलींची देखील त्या मालकिणी बनल्या म्हणजे स्वाभाविक भावना नष्ट होऊन निराळी दृष्टि बने. काळ्या मुलीपेक्षां गो-या पुरूषापासून झालेल्या काळ्या बाईच्या मुलीला बाजारांत अधिक किंमत येई, आणि त्यामुळें कांहीं गो-या पुरूषांनां काळ्या बायकांशीं संगत होण्यासाठीं पैसे द्यावे लागत. अशा परिस्थितींत गुलाम पिकविण्याचा ज्यांचा पिढीजाद धंदा आहे अशा गो-या स्त्रियांनां असें वाटे कीं, बाहेरचा मनुष्य लावून त्याला पैसे द्यावयाचे त्याच्या ऐवजीं आपल्या नव-यानेंच काळ्या बायकांपासून प्रजोत्पत्ति केली तर वाईट नाहीं.
गुलामगिरी नष्ट झाली ती एकदम नष्ट झाली नाही. दक्षिण अमेरिकेंत गुलामगिरी उशीरां व हळु हळू नष्ट झाली. ही हळू हळू नष्ट झाल्यामुळें एक त-हेनें आर्थिक व सामाजिक फायदाच झाला असें अनेक लोक म्हणतात.
गुलामगिरीचाहि एक फायदा झाल असें कित्येक इतिहासकार म्हणतात. ते म्हणतात कीं यूरोपांतील लोकांस सक्तीनें कामें करावीं लागलीं नसती तर त्यांनीं कामच केले नसतें आणि आपल्या गरजा कमी करण्याचें तत्वज्ञान बोलावयास लागले असते. गुलामगिरीमुळें नीग्रोंसारखी जात अनेकविध धंद्यास तयार झाली. या जंगली लोकांत सुधारलेल्या समाजाचे सदस्यत्वास जी लायकी उत्पन्न झाली ती गुलामगिरीमुळेंच उत्पन्न झाली. अमेरिकन इंडियन गुलाम झाले नाहींत तर नष्ट झाले आणि आफ्रिकन पूर्वीं गुलाम होते तर आज स्वतंत्रपणें पोट भरूं लागले व संख्येनें पुष्कळ वाढले.
भारतीय मुदतबंद मजुरीच्या पद्धतीचे दोष वारंवार दाखविण्यांत येतात व आम्हीहि मागे पहिल्या भागांत चांगले स्पष्टपणे दाखविले आहेत. आपले जे लोक इतरत्र गेले त्यांचे हालहि वर्णन करून त्यांच्या चळवळीचा इतिहास दिला आहे. मुदतबंद मजूर नेण्याची पद्धति आतां हिंदुस्थानसरकारनें रद्द केली आहे. कां कीं या पद्धतीचें पर्यवसान गुलामगिरींत झालें. पण ही गुलामगिरी असली तरी थोड्या काळाकरितां होती. हे मजूर तेथें गेल्यानंतर स्वतंत्रपणें धंदा करूं लागले व पुढें कांहीं संपन्नहि झाले. ही मुदतबद मजूर नेण्याची पद्धति नसती तर भारतीयांकडून परदेशगमन व निराळे देश व्यापणें हें मुळीच झालें नसतें.