प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २७ वें.
मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास.
गुलामगिरीचा नाश.- स्वातंत्र्याच्या व लोकसत्तेच्या इतिहासांत गुलामगिरीचा नाश ही गोष्ट आली पाहिजे. राजसत्ता, लोकसत्ता ह्या मोठमोठ्या गोष्टी आहेत. पण जगांतील लाखों व्यक्तीस आपलें म्हणून कांहीं नसावें त्यांच्या प्रत्यक्ष शरीरावर दुस-याची मालकी असावी या प्रकारच्या परिस्थितींतून जगाची सुटका नुकती अलीकडे झाली आहे. ही गोष्ट लोकसत्तेच्या इतिहासांत महत्वाची आहे. चीन, तुर्कस्तान यांसारखा आशियाटिक राष्ट्रांत गुलामगिरी होतीच पण एकोणीसाव्या शतकाच्या अंत्यपादांत गुलामगिरी दक्षिण अमेरिकेंत पुष्कळ ठिकाणीं चालूच होती. सध्यां गुलामगिरीची संस्था राजरोसपणें कोठेंहि चालू नाहीं असें म्हणण्यास हरकत नाहीं. गुलामगिरी बंद करण्यांत इंग्लंडनें पुढाकार घेतला. अमेरिकेनें यादवी पत्करिली. मात्र जेव्हां अमेरिका गुलामगिरी बंद पाडण्यासाठीं दक्षिणेंतील संस्थानांशीं लढत होती तेव्हां मात्र इंग्लंडनें गुलामगिरी चालू ठेवण्या-या दक्षिणेस सहानुभूति दाखविली. सध्यां गुलामगिरी बंद पडण्याचें लोकांच्या नैतिक सुधारणेशिवाय एक निराळें कारण आहे. तें हें कीं, गुलाम हे महाग पडतात. स्पर्धेच्या तत्त्वाशीं सुसंगत असा स्वतंत्र मनुष्याचें काम गुलामापेक्षां अधिक चांगले होई व त्यास बारा महिने कामावर ठेवलें पाहिजे असें मुळींच नाहीं. अमेरिकेंत जेव्हां गुलामगिरी बंद झाली तेव्हां सर्वच गुलामांस आनंद झाला किंवा त्यांची ताबडतोब स्थिति चांगली झाली असें नाहीं. तर पुष्कळांस गुलामपणा सुटल्याबद्दल दुःख झालें. तेहि क्रमानेंच सुधारले. गुलामगिरी हिंदुस्थानांत कशी चालू होती आणि इंग्लंडचा राजाहि गुलामखरेदी कशी करीत असे हें पहिल्या विभागांत दिले आहे. त्याबरोबर हेंहि सांगितलें पाहिजे कीं हिंदुस्थानांत गुलामगिरी होती पण फारशी नव्हती. गुलामगिरी पूर्वीं जिंकलेल्या लोकांची जमीन घेतल्यानंतर त्या जमीनीचा मशागत करण्यासाठीं प्राचीन जगांत अवतीर्ण झाली. अर्वाचीन काळांत जेथें जमीन मुबल सापडली तेथे दुसरीकडून गुलाम
न्यावे लागले आणि गुलामगिरी बंद झाल्यानंतर तेथे मुदतबंद मजूरी सुरू झाली. मुदतबंद मजूरी व गुलामगिरी यांतील पडदा कांहीं ठिकाणीं अगदीं पातळ होतो हें पहिल्या भागांतील अर्वाचीन परदेश गमनाच्या प्रकरणावरून कळून येईल.