प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २७ वें.
मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास.

आयुष्यक्रमाविकास आणि वैयक्तिक स्वांतत्र्य विकास.- स्वातंत्र्यविकास द्यावयाचा म्हणजे अनेक बाजूंनीं तो दिला पाहिजे. मनुष्याला स्वेच्छेनें व कर्तृत्वानें आपलें समाजांतील स्थान ठरविण्याची संधि हवी, दाटेल त्या देशाचें नागरिकत्व घेण्याची मोकळीक हवी, लग्नव्यवहार वगैरे बाबतींत स्वातंत्र्य हवें. उलटपक्षीं आपला समाज सुस्थितींत रहावा म्हणून व्यक्तीस नियंत्रण करण्याचा अधिकारहि प्रत्येक समाजास हवा. स्वातंत्र्यविषयक कल्पना आज जेवढ्या वाढत चालल्या आहेत त्या शंभर वर्षांपूर्वींहि नव्हत्या. पारमार्थविषयक खासगी मतांकरितां ज्यांची रसायनशास्त्र किंवा लाटिन यांची प्रोफेसरी गेली अशी मंडळी अमेरिकेंत अजून जिवंत आहेत. मनुष्याचें आपण कोणत्या समाजाचें सदस्य व्हावें हें ठरविण्याचा त्याचा हक्क आहे ही गोष्ट आज फारशी मान्य झालेली नाहीं. हिंदी लोकांस अनेक ठिकाणीं मज्जाव आहे. परसमाजप्रवेशास जशा अडचणी आहेत तशा स्वसमाजत्यागासहि आहेत. हिंदूचा मुसुलमान होणें किंवा मुसुलमानाचा ख्रिस्ती होणें ही गोष्ट माणसें गमावणा-या लोकांस अत्यंत संतापदायक वाटते. इच्छिलेल्या समाजांत प्रवेशास मोकळीक किंवा तिचा अभाव ही गोष्ट वैचारिक बाबतींतील स्वातंत्र्याशीं बिकट संबद्ध आहे.