प्रस्तावनाखंड
विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

ग्रंथप्रवेश.

ज्ञानकोशांतील अनेक विषयांकडे लक्ष गेलें तरच ज्ञानकोशाचा उपयोग होणार.  अनेक विषयांसंबंधानें जिज्ञासा उत्पन्न होण्यास वाचकांस अगोदर विविध माहिती असावी लागते. जर जिज्ञासा नसेल तर ज्ञानकोशाचा बराचसा भाग उपयोगांतच येणार नाहीं. आज अशी स्थिति आहे कीं, आपल्या देशांतील सामान्यतः सुशिक्षित समजला जाणारा वर्ग अर्वाचीन संस्कृतीच्या अनेक अंगांपासून दूर आहे एवढेंच नव्हे, तर भारतविषयक इतिहास, शास्त्र, कला, वाङ्‌मय, यांची सामान्य माहितीहि त्यास नाहीं. मंत्रद्रष्टे ऋषी, श्रौतधर्मांचे संस्थापक, संशयनिर्णायक ब्रह्मवादी आणि रहस्यांचे वक्ते, तसेच स्मार्तधर्मांचे आर्चाय यांची सामान्य माहिती देखील सुशिक्षित वर्गास नाहीं. निरनिराळ्या मतांचे, संप्रदायांचे व दर्शनांचे संस्थापक व प्रवक्ते, तसेंच वैद्यक, रसायन इत्यादि भौतिक शास्त्रांचे प्रर्वतक, धर्मशास्त्र व नीति अथवा अर्थशास्त्र यांचे आचार्य, वेदांगांचे प्रणेते या उत्तरकालीन भारतीय थोर पुरूषांचीं नांवें काय तीं थोडींबहुत परिचित असतील. काव्यनाटकादि ललितवाङ्‌मयाच्या इतिहासांतील प्रसिद्ध पुरूषांची माहिती आजच्या सुशिक्षितांस सामान्यतः बरी आहे, पण गीतनृत्यनाट्यादि कलांच्या शास्त्रीय नियमांच्या संशोधकांची माहिती त्यांस कितपत आहे ? अनेक प्रकारच्या पुरूषांच्या व स्त्रियांच्या कर्तृत्वानें भारतीय संस्कृतीचा इतिहास जगतास भूषणभूत झाला आहे. या सर्व प्रकारच्या पुरूषांच्या व स्त्रियांच्या नांवांची सामान्य कल्पना ज्यास असेल तो तें तें नांव उघडून पाहून अधिक माहिती मिळवील. तथापि ज्यास मुळांत नांवच परिचित नाहीं, त्यास जिज्ञासा तरी कोठून होणार ?  वाचकवर्गाचें जिज्ञासाक्षेत्र जितकें विस्तृत असेल त्या मानानें त्याला ग्रंथोपयोग करावासा वाटणार. यासाठीं त्याचें जिज्ञासाक्षेत्र मोठें केलें पाहिजे. ज्ञानप्रसाराच्या प्रयत्‍नांत जिज्ञासावृद्धि हें प्रथम कार्य होय.

आर्यसंस्कृतीचीं अनेक अंगें व त्यांचा इतिहास हे विषय सामान्य विद्यासंस्काराच्या क्षेत्रांत येण्याजोगे आहेत. तथापि आजच्या आयुष्यास अत्यंत अवश्य असें ज्ञान हें नव्हे. आजला अत्यंत अवश्य ज्ञान म्हणजे शास्त्रीय होय. पण त्या ज्ञानाविषयीं देखील समाजांत आस्था नाहीं. याचें कारण मनुष्याचे हितसंबंध प्रत्येक शास्त्राच्य़ा ज्ञानांत अडकले आहेत याची लोकांस कल्पना नाहीं. विवक्षित ज्ञानाविषयीं आस्था उत्पन्न होण्यास त्या ज्ञानाचा मनुष्यहिताशीं असलेला संबंध लक्षांत यावा लागतो. जेव्हां कोर्टांत एखादा प्रश्न येतो, तेव्हां तो सोडविण्यासाठीं हजारों रूपये खर्च करण्यास मनुष्य तयार होतो; तथापि केवळ त्या प्रश्नाचा खल व्हावा म्हणून एक पै देण्यासहि तो मनुष्य तयार होणार नाहीं. एखाद्या शास्त्रीय शोधाचा पैसे उत्पन्न करण्यास उपयोग होत असेल तर त्या शोधासाठीं पैसे खर्च करण्यास लोक पुढें येतात; तथापि केवळ शास्त्रीय शोधासाठीं पैसे द्यावायास लोकांची नाखुषीच असणार. शास्त्रीय शोध देशांत अधिकाधिक शक्य होण्यास सर्वसामान्य शास्त्रीय ज्ञान देशांत अधिक असलें पाहिजे आणि संशोधक वर्गहि तयार असला पाहिजे, पण शास्त्रीय शोध व्हावा अशी जेव्हां सरकारची किंवा शास्त्रीय शोधांवर पैसे मिळवूं इच्छिणार्‍या भांडवलवाल्यांची इच्छा होते तेव्हांच शास्त्रीय शोधांस उत्तेजन मिळतें. ज्ञानाचें स्तोत्र गाऊन जें काम होणार नाहीं तें काम पैसेवाल्याचा द्रव्यलोभ अधिक सुशिक्षित केल्यानें होतें.

ज्ञानकोशाचा उद्देश महाराष्ट्रीयांस अनेक शास्त्राचें ज्ञान करून देण्याचा आहे. प्रस्तावनाखंडाचे उद्देश
दोन आहेत. एक उद्देश जें ज्ञान गोष्टीच्या रूपानें मांडणें अधिक चांगलें तें त्या रूपांत मांडणें हा आहे, व दुसरा उद्देश प्रत्येक शास्त्राविषयीं जिज्ञासा उत्पन्न करून देण्याचा आहे.  भारतीयांचें जगांत स्थान, त्यांचें पूर्वींचें कार्य आणि भावी कार्य हा प्रस्तुत विभागाचा विषय आहे; आणि या स्थानाची व कार्याची व्यापक कल्पना येण्यासाठीं भारतीय संस्कृतीचा प्राचीन प्रसार बराच सविस्तर वर्णिला आहे; तसेंच परकीय संस्कृतीपासून भारतीयांनीं काय घेतलें हेंहि स्पष्ट दिलें आहे.

भारतीय संस्कृतीवर परक्यांचे जे परिणाम झाले त्यांत इराणी लोकांच्या संस्कृतीचे काय परिणाम झाले याचें विवेचन या भागांत आम्हीं फारसें केलेलें नाहीं.  डॉ. स्पूनर यांनीं चंद्रगुप्‍त मौर्य आणि चाणक्य यांसहि इराणी ठरविण्याचा प्रयत्‍न केला आहे. इराणी परिणाम मोठा होता अशा अर्थाचीं विधानें अनेक आहेत.  हीं विधानें करणारे असें गृहीत धरतात कीं या देशांत मगानुयायी लोक बर्‍याच उत्तरकालीं आले असावेत.  पण ऋग्वेदाच्या मंत्ररचनाकालींच म्हणजे इराणी संस्कृतीच्या प्रारंभापूर्वीचं बरेच मगानुयायी लोक भारतीयांत समाविष्ट झाले होते असा पुष्कळ पुरावा वेदांतच सांपडतो.  यामुळें पर्शु, शक आणि मगानुयायी लोक यांच्या कार्याचें श्रेय इराणास देतां येईल किंवा नाहीं याचा वानवाच आहे.  या प्रश्नाविषयींचें विवेचन विशिष्ट कालांचा इतिहास लिहितांना करतां येईल.

भारतीय व इतर संस्कृतींच्या युद्धाची व्यापक कल्पना देऊन मग भारतीयांस स्वकीय भवितव्याच्या नियमनास अवश्य असलेलें समाजशास्त्र आणि शासनशास्त्र व अल्पांशानें अर्थशास्त्र दिलें आहे.

हिंदु व हिंदुस्थान यांच्या हिताहिताशीं ज्य़ांचा संबंध येतो अशा अनेक गोष्टी व वरील तीन शास्त्रांत ज्यांचा समावेश होईल असे अनेक नियम व कार्यपरंपरा यांचा ऊहापोह या ग्रंथांत केला आहे.  भारतीय समाजशास्त्राचें बरेंच आणि शासनशास्त्र व अर्थशास्त्र यांचें मूलतत्त्वविषयक विवेचन यांत येऊन गेलें आहे.  हा भाग आपले जगांतील इतर मनुष्यसमूहांशीं काय संबंध आहेत हें स्पष्ट करील.

देशामध्यें ज्ञानसंवर्धनार्थ ज्या संस्था आहेत त्यांत युनिव्हर्सिट्या प्रमुख होत. मुंबई, मद्रास, कलकत्ता, अलाहाबाद आणि पंजाब हीं पांच विद्यापीठें जुनीं आहेत. गेल्या दहा वर्षांत कांहीं नवीन पीठें तयार झालीं.  बिहारला पाटणा युनिव्हर्सिटी मिळाली. म्हैसूरसारख्या संस्थानानेंही आपली युनिव्हर्सिटी केली आहे आणि रंगूनलाहि युनिव्हर्सिटी मिळाली आहे.  नागपूरची युनिव्हर्सिटी स्थापन होण्याच्या बेतांत आहे. येणेप्रमाणें ठरींव शिक्षणाचा विस्तार झाला आहे.  तथापि विद्यासंवर्धनाचें काम चांगलेंसें सुरू झालेलें नाहीं.  सध्यांच्या विद्यापीठांतील मुख्य दोष म्हटला म्हणजे ग्रंथशालांचा अभाव होय.  दुसरा दोष म्हटला म्हणजे विद्यापीठें ज्या कॉलेजांमार्फत शिक्षण देतात त्या कॉलेजांतील प्रोफेसरांनां पगार इतका थोडका मिळतो कीं, त्या पगारांत या संस्थांत काम करण्यास चांगलीं माणसें मिळावयाचींच नाहींत.

 

ज्ञानप्रगतीसाठीं ज्या खटपटी होत आहेत त्यांत शिक्षणखात्यावरील लोकसत्ता वाढविणें, आणि लोकांनी स्वतंत्रपणें शिक्षणसंस्था चालविणें व शिक्षणपद्धति ठरविणें हे दोनही प्रकार आहेत.  आपल्या देशांतील प्रजेस जे नवीव अधिकार मिळाले आहेत त्यांत कांही मंत्री प्रत्यक्ष लोकांच्या प्रतिनिधींस जबाबदार केले आहेत व कांही खातीं या जबाबदार मंत्र्यांच्या हवालीं केलीं आहेत.  त्यांत शिक्षण लोकांच्या हातीं दिलें आहे.  या फरकामुळें शिक्षणविषयक विचाराला जोर मिळेल अशी अपेक्षा आहे.  असहकारितेच्या तत्त्वामुळें कांहीं विद्यार्थी शाळा सोडीत आहेत आणि अशा विद्यार्थ्यांसाठीं "टिळक महविद्यालय" पुण्यास स्थापन झालें आहे.  केवळ स्वतंत्र बुद्धीनें शिक्षणाची पद्धति ठरविण्याचा हा प्रयत्‍न आहे.  संस्था जितकी अधिक स्वतंत्र तितकी ती नवीन प्रयोग करण्यास मोकळी असते.  अशा संस्थांमध्ये प्रयोग होऊन जो अनुभव उत्पन्न होतो तो सर्व राष्ट्रास ऊपयोगी पडतो.  खाजगी शाळा, हिंदु युनिव्हर्सिटीसारख्या युनिव्हर्सिट्या, कर्वे यांची स्त्रियांकरितां स्थापन झालेली युनिव्हर्सिटी आणि नवीन स्थापन झालेलें टिळक महाविद्यालय यांसारख्या संस्था आपली बुद्धि स्वतंत्र ठेवून परकीय तंत्रानें कमी कमी चालतील, आणि स्वतः प्रयोग करून शिक्षणसंस्थांमध्यें नवीनपणा आणतील व देशांतील जुन्या शिक्षणसंस्थांत इष्ट फेरफार अनुभवानें सुचवितील.

हें सर्व खरें. पण योग्य शिक्षण द्यावयासाठीं शिक्षणास योग्य असें वाङ्‌मय पाहिजे.  लोकांस काय सांगावयाचें तें सांगण्यासाठीं सांगावयाची माहिती गोळा झाली पाहिजे.  ज्ञान स्वभाषेमार्फत लोकांस द्यावयाचें तर त्या भाषेंत तें व्यक्त करण्याची संवय झाली पाहिजे. स्वभाषागौरवाचा प्रयत्‍न झाला पाहिजे.  देशांत स्वत्वस्थापनासाठीं जे प्रयत्‍न होत आहेत त्यांत स्वभाषागौरवाचा प्रयत्‍न विशेष महत्त्वाचा होय.  स्वभाषागौरवाचे जे अनेक प्रयत्‍न लेखक करीत आहेत त्यांतील एक प्रयत्‍न ज्ञानकोशरचना हा होय.

ज्ञानकोश म्हणजे अत्यंत व्यापक वाङ्‌मय होय.  यानें भाषा तयार व्हावयाची, आणि प्रगमनशील जग आणि अप्रगत महाराष्ट्र यांतील बौद्धिक अंतर कमी व्हावयाचें, या प्रकारच्या अनेक अपेक्षा प्रस्तुत ग्रंथासंबंधाच्या आहेत.  अपेक्षा लक्षांत ठेवून ग्रंथ बनविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर पडते त्यांच्या मनांत "आपल्या हातून या अपेक्षा कितपत सफल होत आहेत" हा विचार येतो.  हा विचार प्रस्तावनाखंडाचा हा पहीला विभाग महाराष्ट्रीय वाचकांपुढें ठेवीत असतां आमच्या मनांत एकसारखा वागत आहे.

हा विभाग तयार करतांना ज्यांचें पुष्कळ साहाय्य झालें त्यांत रा. यशवंत रामकृष्ण दाते, रां. पांडुरंग महादेव बापट आणि सौ. शीलवती केतकर यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे.
        
श्रीधर व्यंकटेश केतकर.