प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास

तिसरा टेथमॉसिस याच्या लढाया - तिसरा टेथमॉसिस यानें आपल्या सर्व सामर्थ्याचा उपयोग युद्धाकडे केला. हॉटशेपसूतच्या मृत्यूनंतर सिरियानें बंड केलें परंतु हा राजा केवळ बावीस वर्षांचा असतां त्या बंडखोरांची खोड मोडण्यास सिद्ध झाला. ऑरोन्टीज या नदीवर असलेल्या कडेश शहरानें जरी या बंडांत पुढाकार घेतला होता तरी बंडाची साथ सर्व पश्चिम सिरियाभर पसरली होती. मेगीडो येथील सिरियन लोकांचे पायदळ व रथदळ यांच्याशीं सामना व अखेर तें ठिकाण हस्तगत करणें इत्यादि सर्व प्रथम युद्धांतील टेथमॉसिसच्या हालचाली दररोज टिपून ठेवण्यांत येत होत्या. या बखरींतील उतारा व टेथमॉसिसच्या पुढील युद्धांचा त्रोटक वृत्तांत कर्णक येथील देवालयाच्या भिंतीवर खोदलेले आहेत. पांच वेळ युद्ध केल्यानंतर त्यानें सर्व दक्षिण सिरिया पादाक्रान्त केला व फिनिशियाची बंदरेहि हस्तगत केलीं. सहाव्या युद्धांत त्यानें कडेश शहर सर केलें. पुढील वर्षी टेथमॉसिस यानें फिरून फिनिशियाच्या बंदरांस भेट दिली व बंडखोरांस शासन करून सिरियापासून खंडणी वसूल केली. इतकें झालें तरी राज्य-विस्ताराचे बाबतीत आणखी एक वर्ष जाईपर्यंत त्याचें पाऊल पुढें पडलें नाहीं. तदनंतर त्याच्या कारकीर्दीच्या तेहतिसाव्या वर्षी तो कडेशमधून कारचेमिशपर्यंत लढाया मारीत गेला  व युफ्रेटीस नदी ओलांडून मिटनीच्या  राजांच्या मुलखांत शिरला. तेथे त्यानें पहिल्या टेथमॉसिसच्या शिलेजवळ लेख कोरून आपली एक शिला बसविली व नदी मार्गानें दक्षिणेंत निऊपर्यंत गेला. येथें त्यानें एकशेंवीस हत्तींच्या कळपाची शिकार केली आणि नंतर पश्चिमेकडे वळून नहरिणाची खंडणी वसूल करून एशियामायनरमधील हिटाइट लोकांच्या व बाबिलोनच्या राजाच्या देणग्यांचा स्वीकार केला. कडेशच्या दुसऱ्या वेढयाच्या वेळी बंड कण्याच्या प्रवृत्तीचा पूर्ण बीमोड होईपर्यंत या राजानें सिरियावर एकंदर सतऱ्या स्वाऱ्या केल्या. लिबिया व एथिओपिया या देशांवरील त्याच्या स्वाऱ्या विशेष महत्त्वाच्या नाहींत. लढायांच्या मध्यंतरींच्या काळांत तिसरा टेथमॉसिस जो राज्यकारभार पाही त्यावरून तो मोठा कर्तृत्ववान् राजकारणी पुरुष होता असें दिसून येतें. राज्याच्या कोनाकोपऱ्यांतहि काय चाललें आहे इकडे त्याचें लक्ष असे. त्याच्या कारकीर्दीतील बहुतेक महत्त्वाच्या वर्षातील सहा महिने सिरियावरील स्वाऱ्यांत खर्ची पडत असत परंतु राहिलेला सर्व काळ तो राज्याच्या  अंतर्गत व्यवस्थेकडे लावी.  तो यांत अन्याय व दरोडे यांचा बंदोबस्त करी, जिंकलेल्या देशांच्या लुटींतून व खंडणींतून व धरून आणलेल्या कैद्यांकडून देवालयें दुरुस्त करणें व त्यांस सुशोभित करणें इत्यादि कामें करून घेई, किंवा अ‍ॅमन देवाच्या देवळांतील भपकेदार उपकरणीं तयार करण्याकरितां कल्पनाचित्रें रेखाटून देई. त्याच्या कारकीर्दीच्या उत्तर काळांत त्यानें न्यूबियावर कांही स्वाऱ्या केल्या. टेथमॉसिस हा आपल्या कारकीर्दीच्या चोपन्नाव्या वर्षी वारला. डेरएल्बाहरी येथील तळघरांत सांपडलेल्या त्याच्या ममीवरून (जतन केलेल्या शवावरून) तो फार वृद्ध होता असें दिसतें. तो सर्व मिसर देशाच्या इतिहासांत नसला तरी “नूतन साम्राज्यातींल” सर्वात मोठा राजा होता हें निर्विवाद आहे.