प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास

नीलमुखामधील घराणीं; लिबियन काळ. - २०व्या घराण्यांतील शेवटचा राजा जो बारावा रामेसीस याची सत्ता अगदीं मृतप्राय झाली होती. त्याच्या कारकीर्दीतील धर्माधिकारी ऱ्हींहोर यानें सर्व सत्ता आपल्या हातीं घेऊन तो त्याच्या मागून इ. स. पूर्वी ११०० च्या सुमारास थीबीज येथें गादीवर बसला. याच वेळीं तानिस येथें स्मेंडेस नांवाच्या एका राजानें नीलमुखामध्यें एक स्वतंत्र घराणें स्थापिलें. (घराणें २१ वें). तानाईटवंशांतील राजें सामान्यत: थीबीजच्या धर्माधिकाऱ्यांच्या मुठींत असत. ऱ्हीहोरचे वंशज कधीं कधीं या घराण्यांतील राजकन्यांशीं शरीरसंबंध जोडून राजचिन्हें धारण करीत; कांही वेळां तर सबंध इजिप्त त्यांच्या अधिकारांत असे. या घराण्यांतील राजे उध्वस्त केलेल्या राजकबरींमधील ''ममीं'' ची फार काळजी घेत. एका कबरींतून दुसरींत असें करतां करतां शेवटीं डेर एल् बहरीच्या देवळानजिक त्यांनां पुरण्यांत आलें या ''ममी'' ३००० वर्षे या ठिकाणीं राहिल्यानंतर पुराणसंशोधनाची लाट येऊन केरो पदार्थसंग्रहालयांत त्यांची उचलबांगडी करण्यांत आली.

लिबियन शिपाई फार दिवस सैन्यांत होते व त्यांच्या लष्करी वरिष्ठांनीं मोठमोठ्या शहरांतून राहून संपत्ति व बल पैदा केलें. इकडे स्थानिक राज्यकर्ते दिवसानुदिवस दुर्बल होत चालले. तानाईट घराणें लिबियन असावेसें दिसतें. २२वें घराणें त्यांतील नांवांवरून परकीय असल्याचें उघड दिसतें. या घराण्याचा संस्थापक पहिला शशांक (शिशक) इ. स. पूर्वी ९५० च्या सुमारास डेल्टामध्यें बुबस्तीस येथें रहात असावासें दिसतें. त्याच्या मुलाने तानाईट घराण्यांतील शेवटच्या राजाच्या मुलीशीं लग्न लाविलें होतं. यापुढें पुष्कळ शतकेंपर्यंत हेरॅक्लिओपोलिस हें मध्यइजिप्तची राजधानी होऊन राहिलें होतें. शशांकनें थीबीज हस्तगत करून, आपल्या एका मुलाला अ‍ॅमॉनचा मुख्य धर्माधिकारी नेमिलें. पॅलेस्टाईन आणि न्युबिया या ठिकाणीं आपली सत्ता पुन्हां स्थापित केली. पहिल्या ओसोरकोनला आपल्या बापाचें भरभराटीचें राज्य लाभलें होतें तरी त्यानें कांहीं एक केलें नाहीं. लिबियन राजांनां दडपून टाकण्यासाठीं मोठा जोरकस माणूस पाहिजे होता; पण तसा कोणी नसल्यानें राज्यांत लवकरच तट पडले. २२ वें घराणें बऱ्याच पिढया टिकलें. २३ व्या घराण्यांतील राजांचा मांडलिक राजांवर मुळींच दाब नव्हता. हे मांडलिक राजे एकमेकांत भांडून देशातील संपत्तीचा अपव्यय करीत. इकडे या अवधींत एथिओपियामध्यें एक देश्य राज्य स्थापन झालें. एथिओपियन राजा पंखी यानें थीबीज आपल्या ताब्यांत ठेविलें साइसचा उत्साही राजा नेनाखट व डेल्टामधील दुसरे राजे मध्य इजिप्त पादाक्रांत करून एथिओपियासरहद्दीपर्यंत आले. पंखी राजानें हेऱ्याक्लिओपोलिस मॅग्नाला वेढा घालणाऱ्या तेफ्नाट राजाचा पराभव करून मध्य इजिप्तमधून त्याला हांकून लाविलें; इतकेच नव्हे तर मेंफिस घेऊन इतर राजे व लहान लहान संस्थानिक यांनां शरण आणिलें. एथिओपियन संस्थानचा कारभार राजामार्फत अ‍ॅमॉन येथील धर्माधिकारी पाहात असे असें म्हणतात.