प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास
तेराव्यापासून सतराव्यापर्यंत घराणीः- “नूतन साम्राज्याचा” उद्य होईपर्यंत यापुढच्या काळाचा इतिहास अगदीं अप्रसिद्ध आहे. मॅनेथो यानें तेराव्यापासून सतराव्या राजघराण्यापर्यंत सर्वांची नांवे दिलेली आहेत परंतु पंधराव्या व सोळाव्या “हिक्सॉस” राजघराण्यांतील राजांशिवाय त्यानें दिलेल्या इतर नांवांचा लोप झालेला आहे. अबिडॉस यथील शिलालेखांत बाराव्या पासून आठराव्या राजघराण्यांचा उल्लेखहि केलेला नाहीं.टयूरिन येथे असलेल्या कागपत्रांवरून बरीच नांवे सांपडतात आणि इतर स्मारकांवरून त्यांच्यांत भर पडते. परंतु त्यावरून त्यांचें स्थलकालादि निश्चित करणें दुरापास्त आहे. हिक्सॉस घराण्यांतील नांवे मात्र त्यांच्या परदेशीय स्वरूपावरून ज्यांवर ती खोदली आहेत त्या जवाहिरांच्या विशिष्ट आकारांवरून व मनेथोनें दिलेल्या नांवाशीं दिसून येणाऱ्या सादृश्यावरून निश्चित करिता येतात. सतराव्या घराण्यांतील राजेहि त्यांच्या विशिष्टप्रकारच्या नांवावरून व अन्य पुराव्यावरून ओळखतां येतात. मॅनेथॉनें तेराव्या व चवदाव्या राजघराण्यांत बऱ्याच राजांची गर्दी केली आहे परंतु या एकंदर राज्याचा काळ तीनशें चारशें वर्षांचा होता असें धरून चालणें संयुक्तिक दिसतें.
तेराव्या घराण्यांतील व क्वचित चवदाव्या घराण्यांतील राजांचे (विशेषकरून थीबीज व टॅनिस येथें) ग्रानाईट दगडाचे घडविलेले, भव्य आकाराचे व उत्कृष्ट कारागिरीचे पुतळे आहेत, कांहीच्या इमारतींचे अविशिष्ट भाग आहेत तर कांहीचें पहिल्या धबधब्याच्या आसपास असलेल्या खडकांत कोरीव लेख व मूर्ती आहेत.