प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास

प्राचीन इतिहास आणि कला प्रागैतिहासिक युग - नील नदीच्या कांठच्या थीबीज शहराच्या परिकरांत व अन्य ठिकाणीं नील नदीच्या मळीत सांपडणारे गारगोटीचे कापीव तुकडे मनुष्यांनीं घडविलेले असण्याचा संभव आहे.परंतु धो धो वाहणाऱ्या प्रवाहांत सांपडलेल्या पाषाणखंडास केवळ नैसर्गिक पद्धतीनेंहि असले आकार प्राप्त होतात असें यावर काहींचे म्हणणें आहे. नीलथडीच्या आसपास असलेल्या मैदानांत कित्येक वेळां पुराणपाषाणयुगांतील विशिष्ट आकारांचीं हत्यारें व उपकरणें सांपडतात आणि त्यांच्यावर असलेल्या खुणा त्यांच्या प्राचीनत्वाची साक्ष पटवितात. कांहीं वेळां ज्या पाषाणाच्या कारखान्यांत तीं घडविली असावीत त्या जागेवरच तीं पडली असावीत असें दिसून येतें. ज्या काळीं तीं हत्यारें घडविलीं असतील त्या काळांत व हल्लीच्या काळांत हवामान व देशाची एकंदर स्थिति यांत कांही मोठे फेरबदल झाले आहेत किंवा काय याविषयीं भूस्तर शास्त्रवेत्ते व मानवशास्त्रवेत्ते यांच्यांत अद्याप ऐकमत्य झालेलें नाहीं. ज्याच्यावरून त्या हत्यारांचा काळ निश्चित करितां येईल अशा रीतीने तीं, व प्राचीन युगांतील प्राण्यांच्या देहाचें अवशिष्ट भाग एकत्र सांपडले नाहींत; किंवा एखाद्या खडकाच्या किंवा दरीच्या गर्भात सांपडली नाहींत.  नवपाषाणयुगांतील अवशिष्ट भाग म्हणजे बाणांची टोकें व इतर ओंयुध हीं बऱ्याच मोठ्या प्रमाणांत आरण्यामध्यें सांपडतात. थीबीजच्या उत्तरेकडील फायूमच्या प्रदेशांत व मोरिस या प्राचीन सरोवराच्या आसमंतांत तर या वस्तू अत्यंत विपुल व चमत्कारिक आकाराच्या दृष्टीस पडतात. परंतु त्यांचा नक्की काळ निश्चित करितां येत नाहीं. नीलथडीवर राज्य करणाऱ्या बाराव्या राजघराण्याच्या वेळेस अस्तित्त्वांत असलेल्या प्रगल्भ संस्कृतीशीं त्या समकालीन असाव्यात असें कांहीचें मत आहे. परंतु लागवड केलेल्या मळ्याच्या कडेवर असलेल्या मैदानांत जे.डी. मार्गन, पेट्रो, रेसनर व इतर संशोधक यांच्या भूखननादि प्रयत्नांनीं शोधून काढलेल्या अनेक चमत्कारिक कबरस्थानांपासून निश्चित ऐतिहासिक माहिती उपलब्ध झाली आहे. त्या कबरस्थानांत सापडलेल्या वस्तूंचे निरनिराळे प्रकार पेट्रीनें आपल्या “डायसपोलिसपर्व” नांवाच्या पुस्तकांत क्रमवार दिलेले आहेत, आणि अत्यंत परिश्रमपूर्वक केलेले आपले शोध रेसनेरनें प्रसिद्ध केल्यापासून तर पुष्कळच वादग्रस्त प्रश्नांवर प्रकाश पडला आहे.  त्यांतले त्यांत प्रागैतिहासिक काल व पहिल्या राजघराण्याचा काळ यांचा कोठे संयोग होतो हें निश्चित करितां आलें आहे. पूर्वी उल्लेखिलेलीं कुलालचक्राच्याहिं साधनावांचून केवळ हातांनीं तयार केलेली (कांहीं रंगविलेली) अति उत्कृष्ट मातीची भांडीं प्रागैतिहासिक युगांतलीं आहेत. त्याचप्रमाणें इतर सर्व देशांतील तत्कालीन हत्यारांपेक्षा आकाराच्या ठाकठीकपणांत व नाजुकपणांत अधिक सरस असलेली अतिशय उत्कृष्ट गारगोटीची हत्यारें त्याच काळचीं आहेत. फार जुनाट कबरस्थानांतून धातूंचा अभाव दिसून येतो. परंतु लवकरच तांब्याची धातु दृष्टीस पडूं लागते. बाराव्या राजघराण्याच्या कारीकीर्दीपर्यंत कास्यधातूंचा पत्ता नव्हता. नकशीच्या भांड्यांवर वल्ह्यांनी व शीडांनी चालविलेल्या नौकांची चित्रें व त्या नौकांवर बाहुट्याच्या खुण दृष्टीस पडतात. वरच्या म्हणजे दक्षिणेकडच्या व मधल्या मिसर देशाच्या भागांत हीं कबरस्थानें सर्वत्र सापडतात. परंतु नदीमुखाजवळ किंवा त्याच्या आसपास तीं अद्याप सांपडली नाहींत. कदाचित मिसर देशाच्या खालच्या भागांत राहणाऱ्या लोकांची मृत देहाची व्यवस्था करण्याची पद्धत निराळी असावी.