प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास
सहावें घराणें - मागील घराण्यापेक्षां सहावें राजघराणें जरी अधिक तरतरीत नव्हतें तरी त्यानें त्या काळची पुष्कळशी माहिती मागें ठेवली आहे. ज्यावर कांही मजकूर खोदलेला आहे अशीं त्यावेळचीं कबरस्थानें सर्व देशभर पसरलेली आहेत. या घराण्यांतील ‘पेपी’ किंवा ‘फिऑप्स’ नांवाचा तिसरा राजा सर्वात मोठा कार्यकर्ता होता. त्याच्या सक्कारा येथील मनोऱ्यांवरूनच ज्या राजधानीस हा काळपर्यंत ‘शुभ्र भिंती’ असें म्हणत होते तिला पुढें प्रसिद्ध असलेले ‘मेम्फिस’ हें नांव मिळालें. ‘पेपी’ राजाच्या कारकीर्दीत किंवा त्याच्या मागून झालेल्या राजाच्या कारकीर्दीत कोणी एका ऊन नांवाच्या मनुष्यानें सिनाइच्या द्वीपकल्पावर व दक्षिण पॅलेस्टाईनवर स्वारी करण्याचे कामीं व एलिफन्टाईन व इतर खाणी यांतून ‘ग्रॅनाईट’ नांवाचा दगड वाहून नेण्याच्या कामीं फार मेहनत घेतली अशा प्रकारचें अबिडॉस येथील कबरस्थानाच्या शिलेवर वर्णन आहे. एलिफन्टाईनचा राजा व न्युबिआ व लिबिआ येथील लमाणांच्या प्रांताचा पुढारी या नात्यानें हरखूप नांवाचा सरदार मेरेन्रे व दुसरा पेपी यांच्या कारकीर्दीत प्रसिद्धीस आला. एका वेळीं त्यानें एक वामनमूर्ति नर्तक सूदनहून धरून आणला होता तो पांचव्या राजघराण्यांतील असा राजाच्या कारकीर्दीत प्यूओनी येथून आणलेल्या नाच्या प्रमाणे होता असें त्याचें वर्णन केलें आहे. त्यानें दुसऱ्या पेपीला इतका आनंद झाला कीं त्यानें तो व्यक्त करण्याकरितां हरखूप यास एक पत्र लिहिलें. तें सर्व पत्र हरखूपच्या कबरस्थानाच्या दर्शनी भागावर खोदले आहे. हा शेवटचा राजा फार लहान वयांत गादीवर बसल्यामुळें त्यानें नव्वद वर्षांवर राज्य केलें. ही गोष्ट लोकांच्या स्मरणांत इतक्या काळपर्यत होती कीं मॅनेथो यानें सुद्धां त्याच्या कारकीर्दीचा काळ चवऱ्याण्णव वर्षाचा दिलेला आहे. या दीर्घकालीन कारकीर्दीमुळेच कदाचित् तें घराणें नष्ट झालें असावें. देशांतील लहान लहान राजेरजवाड्यांची संस्कृति, संपत्ति व सत्ता यामध्यें उत्तरोत्तर चलती होत गेली. दुसऱ्या पेपीच्या कारकीर्दीनंतर स्मारकांच बाबतींत खिंड पडलेली दिसून येते त्यावरून तो काळ अंतःकलहाचा व बेबंदशाहीचा असावा असें दिसतें. अखेर त्या जुन्या राज्याचा अंत झाला.