प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास
हत्यारें व जड दाये - मिसर देशांतील हत्यारांचे थोडक्यांत सामान्य व विशिष्ट असे दोन विभाग करितां येतील. सामान्य विभागांत ठोकणाऱ्या,कापणाऱ्या व घांसणाऱ्या हत्यारांचा अंतर्भाव होतो.व विशिष्ट विभागांत लढाई, शिकार, शेतकरी, बांधकाम इत्यादि कामास लागणाऱ्या हत्यारांचा समावेश होतो. ही हत्यारें हल्लींच्या हत्यारांपेक्षां प्रथम निराळ्या स्वरूपाचीं हातीं. त्यांपैकी काहींत बदल होऊन त्यांस हल्लीचें स्वरूप प्राप्त झालें, व कांही तशीच राहिली.
ठोकण्यास लागणारी हत्यारें - लांकडी ठोकणी व मोगरी, दगडी गदा, बिनदांडयांचे दगडाचे हातोडे, तांब्याच्या व गारगोटीच्या कुऱ्हाड, गारगोटीच्या कुदळी इत्यादि हत्यारें त्या काळीं प्रचलित होती.
कापण्यास उपयोगी पडणारीं हत्यारें - गारगोटीचे केलेले दुपाती, एकपाती, पातें मिटविण्यास खाचा असलेले व नसलेले, सरळ व वांकड्या पाठीचे व तांब्याचे बनविलेले इतक्या प्रकारचे चाकू, तांब्याचे वस्तरे ब्राँझ धातूंची केलेली लांकडी मुठीची व बिनमुठीची लहानमोठी किंकरी व टाक्या इत्यादि हत्यारें त्याकाळीं उपयोगांत होती.
घांसण्याच्या उपयोगाची हत्यारें - ब्राँझ धातूच्या केलेल्या कलाकृति व हल्ली प्रचारांत असलेल्या स्वरूपाच्या कानशी, सदर धातूच्या केलेल्या करवती, कठिण पदार्थास व मण्यांस छेद करण्याकरितां ज्यांचा उपयोग करीत असत असे गारगोटीचे केलेले व लांकडी कामागार ज्यांचा उपयोग करीत असत असे ब्राँझ धातूचे केलेले सामते इत्यादि हत्यारांचा त्याकाळीं उपयोग करीत असत.
लढाईची हत्यारें - लांकडी दांडयाचे व धातूचे बनविलेले परशू गारगोटीच्या व तांब्याच्या केलेल्या कट्यारी लांकडी व एका अखंड तुकड्यांची केलेलीं धनुष्यें निरनिराळ्या आकाराचीं गारगोटीचीं, शिगांची व तांब्याची बाणांची टोकें इत्यादि हत्यारें त्यावेळी प्रचारांत होती.
शिकारीची आयुधें - गारगोटीच्या वरच्या, हाडाच्या व तांब्याच्या मासे धरण्याच्या वरच्या, फेकून मारावयाचे लांकडी सोटे, तांब्याचे मासे धरण्याचे आंकडे, प्राण्यांचे पाय अडकून धरण्याचे सांपळे, मासे पकडण्याची जाळीं इत्यादि आयुधांचा त्याकाळीं उपयोग करीत असत.
शेतकीचीं आयुधें - लांकडी कुदळी व नांगर, लांकडी दंताळें, गवत उडविण्याचा त्रिशूळ, ज्याच्यांत गारगोट्या बसविल्या आहेत असे लांकडी कोयते, पाखडतांना धान्य साफ करणारी सुपें, अंड्याच्या आकृतीची व सपाट जातीं इत्यादि अनेक वस्तूंचा त्याकाळीं उपयोग करीत असत.
बांधकामास लागणारीं उपकरणें - दगड फोडण्यास उपयोगी पडणाऱ्या टाक्या, विटा पाडण्याचे विटाळे, गवंड्याची लांकडी करणी, गुण्या व ओळंबा इत्यादि बांधकामास लागणारी साधनें हल्लीच्या प्रमाणेंच होतीं.