प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास

२६ वें घराणें. - नेकोचा पुत्र सामेटिकस (इ. स. पू. ६६४-६१०) हा बापामागून असुरियाचा मांडलिक म्हणून गादीवर आला. यानें इतर कांहीं राजांच्या मदतीनें आपली सत्ता वाढवून ती दृढ केली. आपल्या कारकीर्दीची नऊ वर्षे झालीं नाहीं तोंच थीबीज त्याच्या पूर्ण मालकीचें झालें. या प्रसंगी असुरबनि-पालचें सर्व सामर्थ्य बाबिलोन, इलाम आणि अरबस्तान येथील बंडाळी मोडण्याकडे गुंतलें होतें. पुन्हां असुरी सैन्याचा जिकडे तिकडे विजय झाला पण त्याची सर्व शक्ति क्षीण झाली. सामेटिकसच्या अमदानींत इजिप्तला पुन्हां चांगले दिवस प्राप्त झालें; त्याचें उत्पन्न भराभर वाढत गेलें. सामेटिकसनें इजिप्तची सरहद्द सुरक्षित ठेविली. असुरी लोक त्याच्यावर जरी चालून आले नाहींत तरी सिथियनांची टोळधाड दक्षिणेकडे चालून येत होती. तिला त्यानें कांहीं लालूच दाखवून व देणग्या देऊन परत लाविलें. मरणापूर्वी सामेटिकस दक्षिण पॅलेस्टाइनमध्यें जाऊन आला होता.

जेव्हां सामेटिकसच्या कारकीर्दीला सुरवात झाली तेव्हां इजिप्तची स्थिति पूर्वी साम्राज्यसत्तेखालीं असतांना जी होती तीपेक्षां फारच निराळी अशी होती. भूमध्यसमुद्रांतील व्यापाराची वाढ, व नवीन लोकांशीं व नवीम संस्कृतींशीं येणारा संबंध यांमुळें इजिप्शियन लोकांत नवीन विचारांचा प्रादुर्भाव झाला होता, व त्याबरोबरच स्वत:च्या बलाविषयीं त्यांना विश्वास वाटेनासा झाला होता. थीबीजचें वर्चस्व जाऊन, डेल्टा हा इजिप्तमधील संपत्तिमान व प्रागतिक भाग बनला. धाडस व शौर्य नसलेल्या या लोकांत धार्मिकता बरीच बोकाळली. तसेंच वैभवशाली पूर्वजांबद्दल अवास्तव अभिमान जागृत झाला. थीबीस आणि अ‍ॅमॉन तसेंच साम्राज्याच्या स्मारकविशिष्ट गोष्टी यांनां एथिओपिअनांचा बराचसा संपर्क पोंचलेला दिसत होता. तेव्हां मेंफाईट डेल्टाइक घराण्याच्या आचार्यांनां मेंफिसच्या प्राचीन वर्चस्वाच्या काळांतील गोष्टींकडे अनुकरणार्थ वळणें मुद्दाम भाग पडलें; व पाषाणशिल्पकृति, आणि देवस्थान व कबर यांवरील लेख, हे शक्य तितके जुन्या राज्यांतील कृतिलेखांवर हुकूम बनवावे लागले. धार्मिक बाबींखेरीज इतर बाबतींत इजिप्शियन हे कल्पक व किंबहुना अनुकरणशील असे होते.

सामेटिकस हा आपल्या ५४ वर्षांच्या आमदानीनंतर वारला व त्याचा मुलगा नेको (इ. पू. ६१०-५९४) हा त्यामागून गादीवर आला. असुरी लोकांची दीन अवस्था लक्षांत घेऊन नेकोनें सिरियामधील साम्राज्याचा प्राचीन मुलूख परत मिळविण्याकरितां मोहीम काढिली. असुरियाच्या राजांतर्फे जोसियानें आपल्या दुर्बल सैन्यानिशीं नेकोला तोंड दिलें; पण त्याचा पराभव होऊन लढाईंत तो गारद झाला. नेको युफ्रेटीजकडे जाण्याला पुढें सरसावला व त्यानें तो प्रदेश आपला मांडलिक बनविला. निनेव्हेच्या ऱ्हासानंतर पश्चिमेकडील असुरी लोकांचा वारसा बाबिलोनचा राजा नबालोपोसर याच्याकडे आला; तेव्हां त्यानें ताबडतोब आपला मुलगा नेबु काडरेसर यास नेकोशीं टक्कर देण्यास धाडून दिलें. बाबिलोनियन आणि इजिप्शियन सैन्यांची कारचेमिश येथें गांठ पडून (ख्रि. पू. ६०५), इजिप्शियनांचा इतका मोड झाला कीं, नेकोला सिरिया सोडून पळावें लागलें व नबो पोलासरच्या मृत्यूमुळें विजयी वीराला परत जावें लागलें नसतें तर सबंध इजिप्त त्यानें पादाक्रांत केले असतें. यांत शंका नाहीं. यानंतरचा राजा दुसरा सामेटिकस (इ. स. पूर्व ५९४-५८९) यानें सिरियावर किंवा फिनिशियावर मोहीम केली व अबु सिंबेलपर्यंत एथिओपिआमध्यें भाडोत्री सैन्य पाठविलें असें एके ठिकाणीं लिहिलेलें आढळतें. फारोहोफ्रा (इ. स. पूर्व ५८९-५७०) यानें ज्यूडामधील बाबिलोनियन सत्तेविरुद्ध बंडाळी माजाविण्याचा प्रयत्न केला. पण फारसा उपयोग झाला नाहीं. हिरोडोटस लिहितो कीं, त्याची कारकीर्द फार भरभराटीची होती. सायरेनेच्या ग्रीक वसाहतीविरुद्ध लिबियन लोकांनां त्यानें मदत केली. व त्या मोहिमेंत भाडोत्री शिपायांवर त्याची कृपादृष्टि जास्त वळल्याच्या संशयावरून त्याचे देश्य शिपाई त्याच्यावर रागावले व त्यांनीं अमेसिसला राजा निवडला. या दुसऱ्या अमेसिसनें (इ. स. पूर्व ५७०-५२५) आपल्या अनुयायांच्या मदतीनें ग्रीक सैन्याचा पराभव केला; तथापि त्याच्या पदरींहि ग्रीक असत व तो त्यांच्यांतील जुलमी माणसांशी सख्य करी. त्याची सत्ता इजिप्तपुरतीच कायती होती. पण खुद्द इजिप्तच त्या वेळीं अत्यंत भरभराटीत होतें. त्याच्या मृत्युनंतर थोडयाच महिन्यांनीं कँबिसेसच्या अधिपत्याखालीं असणाऱ्या इराणी सैन्यानें इजिप्तमध्यें येऊन त्याचा मुलगा तिसरा सामेटिकस याला पदच्युत केलें.