प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास

हिक्सॉस घराण्यांतील राजांची कारकीर्दः - मिसर देशाच्या अन्तःकलहामुळें तो परक्याच्या हाती जावा यांत कांही नवल नाहीं. मिसर देश काबीज करण्यास हिक्सॉस राजांनां युद्ध करावें लागलें नाहीं असें मॅनेथो म्हणतो. अ‍ॅपोफिस राजाच्या कारकीर्दीच्या तेहतिसाव्या वर्षी ऱ्हिंड येथील गणितविषयक कागदपत्राची नक्कल करण्यांत आली यावरून हिस्कॉस घराण्याचें राज्य बराच वेळ टिकलें असावें असें दिसतें. हिक्सॉस राजांचीं स्मारकें व त्यांचें “स्कॅरब” नांवाच्या किडयाच्या आकृतीच्या जवाहिरावर खोदलेले लेख वरच्या व खालच्या मिसर प्रदेशांत चहूंकडे सांपडतात. खिआन रजाची तसलीं स्मारकें व कोरिव लेख तर क्रीट व बगदादपर्यंत पसरले होते. हिक्सॉस राजे आपल्या सिरियांतील देवाचे उपासक होते. त्यांनीं आपला देव व मिसर देशचा देव सेथ हे दोन्ही देव एकच होत असें मत प्रस्थापित करून त्या पंथाचा प्रसार सर्व मिसर देशभर करण्याचा जोराचा प्रयत्न केला व त्यामुळें त्या देशांतील मूळच्या देवाचें महत्त्व फार कमी झालें. ज्यामुळें मिसर देशांतील लोकांच्या चारित्र्यावर व इतिहासावर इतका विलक्षण परिणाम झाला त्या संक्रमणकालाची कांही तरी निश्चित माहिती एखादे वेळीं उपलब्ध होईल अशी आशा आहे.  हिक्सॉस राजांची सत्ता समूळ नष्ट झाल्यावर  “नूतनसाम्राज्यांतील” कलाकुसरीच्या व प्रतापशाली युगास सुरुवात झाली. सतराव्या राजघराण्यांतील अर्धवट स्वतंत्र अशा लहान सहान राजे राजवाड्यांनी हिक्सॉस राजांच्या सत्तेस विरोध केला. या लढायांमध्यें सिकेनेन्रे याचें नांव प्रामुख्यानें पुढें येतें. तिसऱ्या सिकनेन्रेच्या “ममी” (मसाला भरून ठेवलेलें प्रेत) वरून हिक्सॉस यांच्या बरोबर  झालेल्या लढाईत त्याच्या मस्तकावर भयंकर वार लागून तें छिन्न भिन्न झालें असल्याचें दिसून येतें.