प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण २ रें.
मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास

विसावें घराणें. - तिसऱ्या रामेसीसच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या पपायरस हस्तलिखितांत इजिप्तची दशा पुढीलप्रमाणें वर्णिली आहे:- ''इजिप्तची भूमि लहान मोठ्या नगराधिपांच्या किंवा अधिकार्‍यांच्या ताब्यांत असून, एकमेकांत त्यांचें हाडवैर असे; नंतर कोणी एक सिरियन स्वत: सत्ताधीश बनला; सर्व प्रदेश त्याच्या अंकित राहिला, त्यानें आपले सोबती गोळा करून दुसऱ्या राजांना लुबाडलें. त्यांनीं देवांनां माणसांसारिखे बनविलें, तेव्हां साहाजीकच देवस्थानांच्या देणग्या बंद पडल्या पण जेव्हां देवानांच तह करावासा वाटला तेव्हां त्यांनीं आपला मुलगा सेटेनखोट याला सर्व प्रदेशाचा राजा बनविलें.'' सुमारें इ. स. पू. १२०० मध्यें सेटेनखोट गादीवर होता. त्याला लोक खरा वारस समजत नव्हते तरी त्याचें घराणें चिरकाल टिकलें. साम्राज्याचें वैभव पुनरुद्दीपित करणाऱ्या तिसऱ्या रामेसीसचा तो जनक होय. मिनेप्टह गादीवर आल्यावेळीं जसें इजिप्तवर अरिष्ट कोसळलें होतें तसेंच यावेळींहि इजिप्त संकटग्रस्त होतें. लिबियन व त्यांचे सहकारी यांच्याशीं टक्करा देऊन रामेसीसनें त्यांची पिछेहाट केली व इजिप्त स्वतंत्र राखला. त्याच्या कारकीर्दीचीं शेवटचीं वर्षे शांततेची गेलीं. तथापि तिसरा रामेसीस हा कांहीं अद्वितीय राजा नव्हता; तो मोठा कल्पक होता किंवा उच्च विचाराचा होता, असेंहि नाहीं. दुसऱ्या रामेसीसचें अनुकरण तो करित असे. पुरोहित लोकांचा आपणावर बसणारा पगडा उठवण्याचेंहि त्यानें मनांत आणिलें नाहीं. पूर्वीच्या राजांनीं देवस्थानांनां दिलेली मालमत्ता त्यानें जशीच्या तशीच परत केली इतकेंच नव्हे तर त्यांत आणखी बरीच मोठी भर घातली. सबंध इजिप्तमधील शेंकडा १५ इतकी जमीन निरनिराळ्या देवतांच्या नांवावर होती. जरी त्याच्या कारकीर्दीत एकंदरीत पाहतां इजिप्त समृद्ध होतें तथापि जनतेच्या कांहीं वर्गांतून नि:संशय आपत्ति दृग्गोचर होत होती. एक पपायरस लेखांत थीबन स्मशानांतल्या उपासमार झालेल्या मजुरांनीं संप केल्याचें आढळतें. हा वृद्ध राजा मरण पावण्यापूर्वी थोडे दिवस त्याला ठार मारून त्याचा एक पुत्र गादीवर बसविण्याचा अंत:पुरांत झालेला एक कट उघडकीस आला होता. त्यांत मोठमोठ्या अधिकाराचें स्त्रीपुरुष होते. विसाव्या घराण्याची अखेर होईपर्यंच्या ८० वर्षांत रामेसीस नांवाचें ९ अप्रसिद्ध राजे एकामागून एक होऊन गेले. अ‍ॅमॉनच्या धर्माधिकार्‍यांची सत्ता एकसारखी वाढत होती. यावेळीं थीबंनची स्मशानभूमी मोठ्या व्यवस्थेशीरपणें पूर्वीपेक्षां अधिक लुबाडली जाऊं लागली. नवव्या रामेसीसच्या कारकीर्दीत त्याचा तपास लागून असें आढळून आलें कीं राजकबरींपैकीं एक अगदीं पुरी उध्वस्त झाली असून त्यांतील ''ममी'' जाळल्या गेल्या आहेत. तीन वर्षांनी पुढें राजकबरी असलेल्या दरीवर हल्ला होऊन पहिला सेती व दुसरा रामेसीस यांचीं थडगीं लुबाडलीं गेलीं.