प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.
साम्राज्याचें तात्पुरतें वर डोकें. - दैवानें हिरेंक्लिअसचा नातू दुसरा कॉन्स्टंन्स मोठा खंबीर व लायक मनुष्य होता. त्यानेंच आशियामायनरचें रक्षण करून मुसुलमानांच्या आरमारी सत्तेविरुद्ध झगडण्याकरितां एक बलिष्ठ आरमार बांधिले. त्यानें सैन्याची नवी व्यवस्था ठेवून तें पराक्रमी बनविलें. आयुष्याच्या शेवटल्या वर्षांत त्यानें आपली दृष्टि आफ्रिकेकडे वळविली. पुन्हां रोम हें साम्राज्यांचे केंद्रस्थान करण्याची त्यानें इच्छा धरली. पण लाँबर्ड लोकांपासून इटलीचा दक्षिणभाग त्याला परत घेतां आला नाहीं. रोम पाहून येऊन तो सिरॅक्यूज येथें राहिला त्या ठिकाणीं त्याचा खून झाला. आणखी पन्नास वर्षे ही ओढाताण कायम राहिली. कॉन्स्टंटिनोपलला दोनवेळां वेढा पडला व जर कां एखाद्या वेढ्यांत शत्रू विजयी झाला असता तर मात्र साम्राज्याची धडगत नव्हती.
हिरॅक्लियन घराणें बंडाळीच्या अमदानींत नाहींसें होऊन त्यानंतर तिसरा लिओ राज्यारूढ झाला. त्याच्या कारकीर्दीपासून एका नवीन युगास सुरवात झाली. राज्यांतील प्रत्येक क्षेत्रांत त्यानें सुधारणा केली पण आपल्या सुधारकी वागण्यानें आपल्या कार्यांचें महत्त्व त्यानें लोकांच्या नजरेंतून उतरविलें. त्यानें केलेली प्रांतिक व्यवस्था क्रांतिकारक असून त्याची कायदेपद्धति रोमन परंपरेहून निराळी होती. त्याच्या आमदानीपासून ते दहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत खलिफांशीं एकसारख्या जमीनवरील लढाया चालल्या होत्या. प्रत्येक पक्ष दुस-याच्या मुलुखांत लुटालूट करणें, किल्ले जिंकणें, गनिमी काव्यानें लढणें इत्यादि गोष्टींचा अवलंब करीत असे. पण मोठासा विजय किंवा निर्णायक स्वरूपाची लढाई कधींच झाली नाहीं. सैन्याची कार्यक्षमता फार दक्षतेनें राखण्यांत आली होती पण आरमाराकडे झालेल्या दुर्लक्षतेमुळें क्रीट आणि सिसिली हातावेगळीं झाली. पॅनोर्मस ८३२ त पडलें व सिराक्यूज ८७८ काबीज करण्यांत आलें. आफ्रिकन लोकांनींहि दक्षिण इटलीमध्यें कांहीं काळ मुलुखगिरी आरंभिली होती. या काळांत रॅव्हेनावरील सत्ता लाँबर्डकडे गेली. इटलीमध्यें फ्रँक सत्ता वाढली व जुनें रोम साम्राज्याच्या ताब्यांतून गेलें.