प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.

सर्व्हियाची उचल.- तेराव्या शतकाच्या अखेरीस आशियामध्यें ओटोमनची व यूरोपमध्यें सर्व्हियाची सत्ता प्रादुर्भूत झाली. आशियामायनरमध्यें ओटोमन तुर्कांचा हल्ला परतविण्याच्या कामीं साम्राज्याला भाडोत्री स्पॅनिश फौजेनें मदत दिली. १३२६ मध्यें ब्रूसा ही ओटोमन राजधानी बनली व इकडे बल्गेरियनांचा पराभव करून सर्व्हियन लोक बिझँशियम जवळ जवळ येत चालले. स्टीफन डयूसन (१३३१-१३५५) च्या कारकीर्दींत सर्व्हियाची सत्ता शिखरास पोहोंचली.