प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.
रोमन प्रजासत्ताक अमदानींतील ग्रीस (इ. स. पू. १४६-२७).- अँकियन संघाच्या -हासानंतर ग्रीसची पुनर्घटना करण्यासाठीं एक कमिशन रोमन सेनेटनें नेमिलें. प्रमुख प्रतिस्पर्धी केंद्र जें कॉरिंथ शहर याचा नायनाट करण्यांत आला. शहराशहरांमधील व्यापारी दळणवळण व लग्नव्यवहारहि बंद पाडण्यांत आले. राज्यकारभार प्रजासत्तावाद्यांच्या हातून काढून रोमन सरकारास अनुकूल अशा श्रीमंत वर्गाकडे सोंपविण्यांत आला. अथेन्स स्पार्टासारख्या कांहीं संस्थानांनां व शहरांनां मूळचे राजकीय हक्क देण्यांत आले. जमिनीवरची मालकी फारशी बदलली नाहीं. मॅसिडोनियाच्या सुभेदाराकडे ग्रीसवर देखरेख करण्याचें काम देण्यांत आलें तरी इतर परतंत्र मुलुखापेक्षां एकंदरींत ग्रीसचा दर्जा ब-यापैकीं होता यांत शंका नाहीं.
ग्रीक लोकांस यापुढें विरोध करणें अशक्य होतें व हें त्यांनां लवकरच कळूनहि आलें. देशांत पुढें पुढें इतकी शांतता झाली होती कीं, रोमन लोकांनींच पूर्वींचे दडपशाहीचे कायदे रद्द करून टाकले. पण ही शांतता मिथ्राडेटीझशीं चाललेल्या युद्धामुळें आटोपली (इ. स. पू. ८८-८४). या युद्धाचा शेवट ग्रीसला अपायकारक झाला. रोमन प्रजासत्ताक कारभाराच्या शेवटल्या दशकांत यूरोपियन ग्रीस तत्कालीन युद्धामुळें फारच थोडा स्पृष्ट झाला होता. इतर सर्व प्रांतांप्रमाणें रोमन अधिका-यांनीं त्याला बुचाडलें नव्हतें. तथापि वेळोवेळीं अधिका-यांची ठेवावी लागणारी बडदास्त व रोमन व्यापा-यांची नागवण यामुळें ग्रीस जास्त त्रस्त झालें होतें. इटली आणि लेव्हंट यांच्यामध्यें प्रत्यक्ष दळणवळणाचा मार्ग खुला झाल्यामुळेंहि ग्रीसच्या उत्कर्षास मोठा धक्का बसला. ग्रीसच्या समुद्रांत चांगलें बलिष्ट आरमार नसल्यामुळें चांचे लोकांनीं मोठमोठ्या व्यापारी पेठा लुटल्या त्यामुळें त्याच्या पुष्कळ भागांतून लोकवस्ती कमी झाली.
सीझर आणि पाँपी यांच्या भांडणांत ग्रीक लोकांनीं पाँपीच्या उत्कृष्ट आरमारला हातभार लाविला. सीझरचा जय झाल्यामुळें हा सबंध देश त्याच्या हातांत पडला. त्याची ग्रीक लोकांशीं वागणूक सौमयपणाची होती. सीझरच्या मृत्युनंतर ब्रूटसचा पक्ष त्यांनीं उचलून धरला. पुढें ग्रीस अँटनीच्या ताब्यांत गेला अँटनीनें आपल्या लढायांचा खर्च भागविण्यासाठीं त्याच्यावर बरेचसें कर्जाचें ओझें लादलें, त्या मुळें देशांत दुष्काळ पडला.