प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.
यूरोपीय संस्कृतीचे घटक.- यूरोपीय संस्कृतीच्या घटनेचा इतिहास द्यावयाचा म्हणजे खालील विषयांवर विवेचन केलें पाहिजे.
(१) एजियन व ग्रीक संस्कृति, (२) रोमन साम्राज्य (३) ख्रिस्ती संप्रदाय (४) ट्यूटन लोकांकडून झालेला रोमन साम्राज्याचा नाश व त्या नाशानंतर उत्पन्न झालेल्या राष्ट्रसमुच्चय. यूरोपची विचारपद्धति व तिचें वाङ्मय व कला यांतील वैशिष्ट्य यूरोपला एजियन संस्कृतीपासून मिळालें. एजिअन संस्कृति ग्रीक संस्कृति या नांवानें प्रगल्भ दशेस पावली. तिचें सविस्तर वर्णन मागें दिलेंच आहे. प्रजासत्ताक रोमपासून यूरोप, कायद्याची कल्पना व राजकारभाराची पद्धती शिकलें; शिवाय रोमनसाम्राज्य नष्ट झालें. तथापि रोमन साम्राज्यानें प्रचारांत आणिलेलें धर्मशास्त्र तसेंच राहिलें व त्या धर्मशास्त्राची मान्यता नवीन उत्पन्न झालेल्या राजास, संस्थानिकांस, व सामान्य लोकांस स्वाभाविकपणेंच राहिली. या सर्वापेक्षां ख्रिस्ती संप्रदायानें यूरोपच्या इतिहासावर जास्त परिणाम केला आहे. ज्यावेळेस रोमनसाम्राज्य नष्ट झालें व सर्व ठिकाणीं अंदाधुंदी माजली त्या वेळेस यूरोपांतील निरनिराळ्या राष्ट्रजातींत आपण एक आहों ही भावना उत्पन्न करण्याचें काम ख्रिस्ती संप्रदायानें केलें म्हणून यूरोपचा इतिहास लिहावयाचा म्हणजे प्रथम ग्रीक व रोम येथील पौर राज्यपद्धतीचा उद्भव, नंतर त्यांची साम्राज्य स्वरूपी वाढ व नंतर त्यांवर ग्रीक संस्कृति व ख्रिस्ती संप्रदाय यांचा परिणाम, यांचा इतिहास लिहिणें होय. ग्रीक संस्कृति व रोमन साम्राज्य यांचा इतिहास अन्यत्र दिलाच आहे. आतां रोमी सत्तेची उत्तरकालीन स्थिति, ट्यूटन लोकांनीं रोमन साम्राज्याचा नाश करून निरनिराळीं राज्यें कशीं स्थापन केलीं व त्यांचें पुढें काय झालें इत्यादि गोष्टी विवेचनीय आहेत.
रोमन साम्राज्याच्या पश्चिम भागाकडे आतां आपण वळूं. इ. स. ४७६ सालीं रोम शहर ओडोएकरच्या ताब्यांत आलें. तेव्हांपासून एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत पश्चिमेकडे रोमन साम्राज्याचें अस्तित्व एकसारखें चालूच होतें अशी यूरोपीयांची कल्पना होती. ओडोएकरच्या कालापासून इ. स. ८०० पर्यंतच्या दीर्घ कालामध्यें लहान लहान संस्थानें स्वतंत्रपणें कारभार चालवीत होतीं. पण साम्राज्यासत्ताधारी एम्परर हा मात्र पूर्वेकडील कान्स्टांटिनोपलचा सम्राट होता. इ. स. ८०० मध्यें मात्र साम्राज्यसत्ताधारी पोपनें अभिषेक करून नवीन तयार केला. ज्यास हा अधिकार दिला तो मनुष्य म्हटला म्हणजे चार्लस धी ग्रेट ऊर्फ शार्लेमान होय. याच्या वेळेस रोमन साम्राज्यांत पुन्हां जें द्वैत स्थापन झालें ते पूर्व साम्राज्याच्या अंतापर्यंत होतें. पूर्व साम्राज्याचा जेव्हां अंत झाला तेव्हां परवाच्या महायुद्धाच्या अंतापर्यंत चालू असलेलें हाप्सबर्ग घराणें रोमन साम्राज्याधिकारावर स्थापन झालें होतें.