प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.

पूर्व आणि पश्चिम साम्राज्य व चर्च यांचा विरोध.- पहिल्या क्रूसेडपासून पूर्व आणि पश्चिम यामधील नवीन संबंधाचा इतिहास, ग्रीक आणि लॅटिन यांचा १०५४ सालीं तुटलेला संयोग पुन्हा घडवून आणण्याविषयीच्या प्रयत्नाशीं अगदी निगडित झाला आहे. हा प्रयत्न अयशस्वी झाला. यांच्यामधील भांडणें मिटून ग्रीक धर्मसंस्था रोमच्या अधिकाराखालीं आणणें हें सातव्या ग्रेगरीपासून पुढें झालेल्या पोपांचें मुख्य धोरण असे. हें घडून आणण्यासाठीं प्रसंग येईल त्याप्रमाणें पोप पुढील दोहोंपैकीं एक मार्ग एकापुढें एक स्वीकारीत. पहिला मार्ग म्हणजे शांततायुक्त समेट व दुसरा म्हणजे एखाद्या पश्चिम राष्ट्राकडून साम्राज्य व्यापून टाकणें. पूर्वेकडील बादशाहा नेहमीं समेटाविषयींच्या कल्पना मनांत बाळगूनएकी करण्याविषयीं प्रयत्न करीत. यांत त्यांचें धोरण राजकीय फायदे मिळविण्याचें असे, व त्यांची प्रजा तर नेहमीं या एकीविरुद्ध असे. प्रथम प्रथम मॅन्यूएल कॉन्मेनस पश्चिम बादशाहा तिसरा कॉनरॅड याचा जिवलग मित्र असे. पण कॉनरॅडच्या मृत्यूनंतर यूरोपमध्यें जस्टिनियन प्रमाणें आपलें साम्राज्य स्थापण्याची महत्वाकांक्षा त्यानें धरली व रोमला हातीं धरून आपला हेतु सफल होईल असें त्याला वाटलें. त्याच्या धिटाईच्या धोरणामुळें इटलीमध्यें युद्ध सुरू झालें. अंकोना त्याच्या हातांत पडलें पण त्याचें बल त्याच्या महत्वाकांक्षी योजनांनां अनुरूप असे नव्हतें. लॅटिन राज्याविषयीं त्याची सहानुभूति, तसेंच त्याचा अधळेपणा यामुळें तो आपल्या लोकांच्या मनांतून अगदीं उतरला. त्याच्या पश्चिमेसंबंधीं धोरणाविषयीं सर्व राष्ट्रानें अप्रियता दर्शविली. देशांत राज्यक्रांति होऊन त्याचा मुलगा अलेक्झियस याला पदच्युत करण्यांत आलें व पहिला अँड्रोनिकस गादीवर आला. अँड्रोनिकसच्या छोट्या कारकीर्दींत सर्व बाजूंनीं आर्थिक व लौकिक प्रतिक्रीया झाली. त्याचें धोरण उमरावशाहीविरुद्ध असून त्यामुळेंच त्याचा नाश झाला. ऐझॅकएंजेलसनें त्याच्या प्रयत्नांनां हरताळ फांसला व राज्याचा पुरा नाश केला. यूरोपियन प्रांतांतून बल्गेरियन आणि कालाचियन लोकांना जुलमी करांविरूद्ध चळवळ केली त्याचा परिणाम असा झाला कीं, झिमिसेस आणि बेसिल यांनीं केलेलें कार्य पार नष्ट होऊन गेलें व जॉन अँसेननें नवीन बल्गेरियन राज्य स्थापिलें.