प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.
ट्यूटन लोकांच्या स्वा-या - हूण लोकांच्या स्वा-यामुळें ट्यूटन लोकांनां प्रथम रोमनसाम्राज्यांत आश्रय घेणें भाग पडलें. इ .स. ३७८ यावर्षीं अँड्रियानोपल जवळ झालेल्या लढाईंत ट्यूटनापैकीं गॉथ लोकांनीं व्हालेन्स वादशहाचा पराभव करून त्यास ठार केले. इ .स. ४१० मध्यें पश्चिमेकडील गॉथ लोकांचा राजा अलेरिक यानें रोम शहर लुटलें. त्याच्या मरणानंतर गॉथ लोक स्पेन व गॉल या दोन प्रांतात शिरले. इ. स. ४२९ यावर्षीं व्हॅन्डाल लोकांचा राजा गॅसेरिक यानें रोमन आफ्रिकेमध्यें जाऊन नवीन राज्य स्थापिलें. हें पुढें एक मोठें आरमारी व चांचेगिरी करणारें राष्ट्र म्हणून प्रसिद्धीला आलें. इकडे फ्रँक, बरगिन्डयन वगैरे लोक फ्रान्स व जर्मनीमध्यें प्रवेश करीत होते व ४४९ नंतर ज्यूट, आंग्ल व साक्सत लोकांनीं ब्रिटन बळकावलें.