प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.
पुनः वर डोकें.- थिओडोर लॅस्कॅरिस व त्याच्या मागून आलेले राजे यांनीं यूरोप आणि आशियामधील लॅटिन साम्राज्यावर जोराच्या मोहिमा केल्या. कॉन्स्टंटिनोपल शहर वालाचोबल्गेरियनांच्या हातांत पडतें कीं ग्रीकांच्या हातांत पडतें असा मोठा प्रश्न येऊन उभा राहिला. पण बादशहा मिचेल लिओओलोगस हा मोठा मुत्सद्दी व सेनापतीहि असून १२६१ मध्यें त्यानें तें काबीज केलें. त्याचा उद्देश लॅटिन लोकांपासून सर्व गेलेला मुलुख परत मिळविण्याचा होता, पण अंजूचा चार्लस हें एक त्याच्या मार्गांत विघ्न उपस्थित झालें. चार्लसनें दोन्ही सिसिलीमधून होहेनस्टॉफेन यांचा अंमल झुगारून दिला व रोमॅनियाचें लॅटिन राज्य पुन्हां स्थापनण्याचा निश्चय केला. हें संकट दूर सारण्याकरितां मिचेलनें पोप दहावा ग्रेनरी याच्याशीं संधान बांधिलें; तो प्रत्येक सवलत देण्यास तयार होता. १२७४ मध्यें लीऑन्सच्या बैठकींत या धर्मसंस्थांची एकी घडवून आणण्यांत आली. या धोरणाप्रमाणें चालण्याचें बादशहाला फार जड गेलें. त्याच्या प्रजेमध्यें त्याच्याविषयीं अविश्वास व अप्रीति उत्पन्न झाली. त्याच्या मागून येणा-या बादशहांनीं हें धोरण सोडून दिलें. मध्यंतरी पोपनें कसा तरी अंजूच्या चार्लसला लगाम घातला पण चौथा मार्टीन हा आपल्यास जास्त उपयोगी पडेल असें त्याला आढळून आलें व १२८२ मध्यें ग्रीक सम्राज्यावर मोहीम करण्यासाठीं त्यानें जंगी तयारी केली. सिसिलीच्या व्हेस्पर लोकांनीं त्याचें संरक्षण केलें पण तें केवळ इतर सत्तांच्या भक्ष्यस्थानीं पडण्यासाठीं होय असें पुढें आढळून आलें.