प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.

उत्तरकालीन रोमन साम्राज्यसत्तेखालीं - डायोक्लीशियननें साम्राज्याची पुनर्घटना केली तेव्हां अँकियाला मॅसेडोनियामध्यें महत्त्वाचें स्थान मिळालें. पहिल्या कान्स्टंटाइनच्या कारकीर्दींत इलिरिकम भागांत त्याचा समावेश झाला. त्याचे जिल्हे पाडण्यांत आले व राज्यकारभार रोमन म्युनिसिपल धर्तींवर होऊं लागला. एकंदरींत चौथें शतक उत्कर्षाचें गेलें व ग्रीक राष्ट्राला एकराष्ट्रीयत्वाचें स्वरूप प्राप्त झालें. पण या काळांत ३७५ मध्यें झालेल्या भयंकर धरणीकंपामुळें व व्हिसिगॉथ लोकांच्या दरोड्यामुळें राष्ट्राची थोडी पिछेहाट झाली.

चौथ्या शतकांतील बादशहांनीं शासनें काढून ग्रीसमधील जुना पाखंडी संप्रदाय नाहींसा करण्याचा प्रयत्न केला, पण अजमासें ६०० पर्यंत हा संप्रदाय त्या ठिकाणीं टिकून राहिला. पुढें ख्रिस्ती संप्रदायानें आपलें कायमचें ठाणें दिलें. साम्राज्याच्या पूर्व व पश्चिम प्रदेशांच्या विभक्ततेमुळें लेव्हट मुलुखांत ग्रीसची भाषा व आचारधर्म पुन्हां प्रामुख्यानें प्रस्थापित झाले. पण पांचव्या व सहाव्या शतकांतील बादशहांनां ग्रीक संस्कृतीबद्दल अगदीं आदर नसल्यानें त्यांनीं ग्रीसमध्यें रोमन कायदे पुन्हां सुरू करून ग्रीसचें स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. पुढें पुढें तेथील लोक आपली जुनी संस्कृति इतकी विसरले कीं, त्यांनीं आपलें हेलेन हें नांव टाकून देऊन रोमन नांव धारण केलें. पुष्कळ काळपर्यंत ग्रीस सुप्तावस्थेंत राहिले. पांचव्या शतकांत व्हांडॉल चांच्यांनीं व आस्ट्रॉगॉथनी ग्रीसवर स्वा-या केल्या. जस्टिनियनच्या कारकीर्दींत ग्रीसमधील शहरांची व सरहद्दीवरील ठिकाणांची शत्रूपासून संरक्षण करण्याकरितां डागडुजी करण्यांत आली. त्यावेळीं स्थानिक सैनिकांच्या जागीं बादशाही सैन्य उभारण्याचें धोरण स्वीकारलें होतें पण सुदैवानें तें अमलांत न येतां ग्रीक लष्करच कायम ठेवण्यांत आलें.

ग्रीस हा देश साम्राज्यस्थान झाल्यामुळें आणि साम्राज्याचा रोमीपणा दिवसानुदिवस कमी होत गेल्यामुळें मूळचें रोमी साम्राज्य नंतर ग्रीक साम्राज्य बनलें आणि अथेन्स सारख्या जुन्या ग्रीक संस्कृतीच्या शहरांचें अर्वाचीन काळापर्यंत महत्त्व जरी कमी झालें तरी त्यामुळें ग्रीसचें महत्त्व कमी झालें असें नाहीं, तर जिंकणा-या रोमी साम्राज्याचा सर्व प्रदेश, ग्रीस रोमला दत्तक जाऊन मिळाला असें म्हटलें पाहिजे. आणि ते सर्व फेरफार समजून घेण्यासाठीं पूर्वरोमन साम्राज्याचा इतिहास लक्षांत घेतला पाहिजे.

ग्रीस राष्ट्राचें स्वातंत्र्य रोमनें हिरावून घेतलें एवढेंच नाहीं तर इतर दुसरी जीं ग्रीक साम्राज्यें रोमनें खालसा केलीं, तेथें देखील ग्रीसचें महत्त्व कायम राहिलें हे मागें वर्णिलेंच आहे. एशियामायनर, सीरीया व इजिप्त हे प्रदेश ग्रीकांपासून रोमन लोकांनीं घेतले आणि त्यामुळें रोमला इराणी सत्तेशीं वारंवार संग्राम करावा लागला.