प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
महाराष्ट्रधर्माच्या ऊर्फ जयिष्णु हिंदुधर्माच्या कल्पनेचा उदय.- शिवाजीला स्वराज्यस्थापनेच्या कामीं एकट्या शहाजीचीच मदत झाली असें नाहीं. तो ज्या वेळीं जन्मास आला त्या वेळची महाराष्ट्रांतील एकंदर परिस्थिति त्याच्या कार्यास आशाजनक अशांच होती. 'देव फोडणा-या, विजापुर अहमदनगर, खानदेश, जुन्नर, कोंकण वगैरे प्रांतांवर अंमल करणा-या, यवनांनीं मराठ्यांनां एका बाजूनें अगदीं सतावून सोडलें होतें व दुस-या बाजूनें त्यांच्यांतील प्रमुख सरदारांनां व मुत्सद्दयांनां मोठमोठ्या मानाच्या जागा दिल्या होत्या. यामुळें त्या वेळच्या मराठ्यांत यवनांविषयीं संताप व तो परिहार करण्याचें सामर्थ्य हीं एकाच वेळीं उत्पन्न झाली. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धांत महाराष्ट्रामध्यें महाराष्ट्रधर्माची एक नवीन कल्पना उद्भूत झालेली दिसते. त्या वेळीं होऊन गेलेल्या रामदासस्वामींच्या लेखांत ह्या कल्पनेचा विशेषेंकरून विकास झालेला पहावयास मिळतो. इतिहाससंशोधक रा. राजवाडे यांच्या मतें समर्थांच्या लेखांत ज्या महाराष्ट्रधर्माचा उल्लेख आला आहे त्याचीं मुख्य अंगें म्हटलीं म्हणजे (१) यवनांचा उच्छेंद करणें, (२) धर्माची स्थापना करून गोब्राह्मणांचा प्रतिपाल करणें, (३) ही दुसरी गोष्ट साध्य करण्यासाठीं स्वराज्याची स्थापना करणें, आणि स्वराज्याची स्थापना करण्यासाठीं पुन्हां (४) मराठ्यांचें एकीकरण करणें व (५) त्यांचें धुरीधरण म्हणजे पुढारपण स्वीकारणें हीं होत. याप्रमाणें महारष्ट्रेतर प्रांतांतील हिंदुधर्म + धर्मस्थापना + गोब्राह्मणप्रतिपाल + स्वराज्यस्थापना + एकीकरण + धुरीधरण मिळून महाराष्ट्रांतील हिंदुधर्म उर्फ महाराष्ट्रधर्म होतो अशी त्या काळीं समजूत होती, अशी राजवाडे यांची कल्पना आहे. महाराष्ट्रेतर प्रांतांतील हिंदुधर्मास सहिष्णु हिंदुधर्म व महाराष्ट्रांतील हिंदुधर्मास जयिष्णु हिंदुधर्म म्हटलें असतां हिंदुधर्म व महाराष्ट्रधर्म या दोहोंतील भेद उत्कटत्वे करून स्पष्ट होईल असें त्यांनां वाटतें. सारांश तत्कालीन महाराष्ट्रीय समाजाची स्थिति, शहाजीचें उत्तेजन व शिवाजीचें कर्तृत्व या तीन गोष्टींची परस्परांस जोड मिळून १७ व्या शतकांतील मराठ्यांचें राज्य उदयास आलें असें म्हटलें पाहिजे.
इ. स. १६४६ त शिवाजीनें तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचें तोरण बांधल्यापासून तों तहत सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर इ. स. १७९६ त मराठे सरदारांत यादवी सुरू होईपर्यंत बरोबर १५० वर्षें उपरिनिर्दिष्ट कल्पनेच्या धोरणाने मराठें चालले होते. ''ही कल्पना ध्यानांत ठेवून मग शिवाजीच्या व त्याच्या अनुयायांच्या कृत्यांचा विचार करावा, म्हणजे त्या कालीं महाराष्ट्रांत व कर्नाटकांत जिकडे तिकडे मराठे निष्कारण धांवतांना परकीय इतिहासकारांनां जे दिसतात ते मनांत कांहीं हेतु धरून शिस्तवार मोहिमा करीत आहेत असें भासूं लागतील'' असें राजवाडे म्हणतात.