प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
वडिलांच्या जहागिरींत स्वतंत्र राज्याची स्थापना.- (१६३८-१६४६). बेंगरुळहून पुण्यास येतांच शिवाजीनें बारा मावळें काबीज केलीं व 'मावळे देशमुख बांधून दस्त करून पुंड होते त्यांस मारलें' असें सभासद बखरींत म्हटलें आहे. पुण्याखालील बारा मावळांत उत्तरेस राजमाची व चाकणपासून दक्षिणेस रायरेश्वराचा डोंगर, अंबेड खिंड व खांबटकीचा घांत ह्या स्थानांपर्यतचा मुलुख येतो. मावळातील वजनदार देशमुखाचें साहाय्य शिवाजीनें आरंभींच मिळविलें. घांटावरील मावळांच्या बंदोबस्तांत शिवाजीस बाजी पासलकराचा व घांटाखालील कोंकणांतील डोंगरी प्रदेशाची व्यवस्था करण्यांत तानाजी मालुस-याचा उपयोग झाला. मावळ प्रांत कबजांत आल्यावर तेथें शेतीची व वसुलाची व्यवस्था करण्यांत आली. या मुलुखांत शेंकडों वर्षें अंदाधुंदी माजून राहिली असल्यामुळें शिवाजीच्या राज्यस्थापनेच्या पहिल्या प्रयोगास विजापुर करांकडून अडथळा आला नाहीं. अशा रीतीनें इ. स. १६४६ पावेतों हल्लींच्या बहुतेक पुणें जिल्ह्यास वेष्टन शहाजीची जी जहागीर होती तेवढ्या भागांत एक व्यवस्थित व नमुनेदार नांवानें परतंत्र पण वस्तुतः सर्वांशीं स्वतंत्र- असें राज्य निर्माण झालें.
पुण्याशेजारच्या प्रांतांत शिवाजी व त्याचे अनुयायी यांचा इतक्या थोड्या प्रयासांत अंमल बसला यांत आश्चर्य वाटण्यासारखें कांहीं नाहीं. त्या भागांत नुकतीच जी राज्यक्रांति झाली होती तिचा हा सर्व परिणाम होय. ''निजामशाही व आदिलशाही यांमध्यें नीरा नदीची सरहद्द होती. निरेपासून चाकणपर्यंतचा मुलूख निजामशाहीपेकीं असून तेथें शहाजीचा अंमल होता व तो लोकप्रिय होता. अलीकडे झालेल्या वांटणींत हा मुलूख विजापुरकरांकडे गेला होता; तथापि त्यांचा तेथला बंदोबस्त ढिलाच होता. शहाजीचा अंमल उठून पांच चार वर्षें होतात न होतात तोंच तेथील लोकांच्या कानांवर शिवाजीचे नांव वारंवार येऊं लागलें. तो काय करतो व करणार इकडे सर्वांची कौतुकपूर्ण दृष्टि वळली. या मुलाचें बरें व्हावें, त्याचा मनोदय सिद्धीस जावा, याला शक्य ती मदत करावी इकडे लोकांच्या मनाची प्रवृत्ति होऊं लागली. निरेच्या अलीकडच्या मुलूख शिवाजीला सहजासहजीं मिळवितां आला याचें खरें कारण हेंच होय. सिंहगड, पुरंदर, तोरणा, लोहगड, राजमाची वगैरे मोठमोठे किल्ले या टापूंत आहेत; परंतु यांतील एकहि किल्ला घेण्यास शिवाजीला लढाई करावी लागली नाहीं. फारसा गाजावाजा न करतां किल्लेदाराकडे संधानें लावून तर कोठें लांच देऊन कोठें धाक दाखवून तर कोठें फितूर करून शिवाजीला हे किल्ले हाताखालीं घालतां आले. या किल्ल्यांवर शहाजीच्या नेमणुकीचे पूर्वींचे गडकरी लोक होते तेच विजापुरकरांनीं कायम केले होते. त्यांनीं शहाजीचे किल्ले वेळ आली तेव्हां शहाजीच्या मुलाला देऊन टाकले ! कोंकणचा मुलूख निजामशाहीपैकीं होता तो सर करतांना शिवाजीला पुष्कळदां वडिलांची पुण्याई अशीच उपयोगी पडली. आबाजी सोनदेवानें कल्याणावर स्वारी केली, तो एक दोन महिन्यांत तो सुभाकाबीज करून परत आला सुद्धां ! सुभा म्हटला म्हणजे त्याची जागा बरीच बंदोबस्ताची व बळकट असते. त्या सुभ्यांत किल्ले आणि ठाणीं असतात. त्यांतून सरकारी मालमत्ता सांठविलेली असते आणि तिच्या रक्षणाकरितां कांहीं हजार दोन हजार तरी शिपाई ठेवलेले असतात. इतकें असून आबाजीनें कल्याणचा सुभा हां हां म्हणतां सर केला याचा अर्थ काय ? अर्थ इतकाच कीं, किल्ल्यांतून व ठाण्यांतून लोक होते त्यांतले पुष्कळ शहाजीच्या नेमणुकीचे पूर्वींचेच होते'' (भा. इ. सं. मं. वर्ष १, अंक १ पान ३६-३७).