प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
शाहूचा मृत्यु व पेशव्यांस वडीलकीच्या अधिकाराची प्राप्ति.- सन १७४९ च्या दिसेंबर महिन्याच्या पंधराव्या तारखेस शाहू मृत्यू पावला. मरणापूर्वीं तो बरेच महिने आजारी होता. त्या अवधींत आपल्या राज्याचें पुढें काय करावें या चितेंत तो निमग्न होता. तत्कालीन परिस्थिति व शाहूची गृहस्थिति पाहतां त्याला अशी चिंता वाटणें अगदीं साहजिक होतें. रामराजास आपल्या गादीवर स्थापण्याविषयीं त्यानें पूर्वींच निश्चय केला होता. आपण मेल्यानंतर आपल्या इच्छेप्रमाणें सर्व व्यवस्था पुढें सुरळीतपणें चालवील व राज्य संभाळीत असा कोणी सरदार सर्व राज्याचा शास्ता व नेता म्हणून नेमिला पाहिजे, तसें न करावें तर राज्यांतले बलाढ्य सरदार रामराजास गुंडाळून ठेवून यादवी माजवितील व राज्याचा नाश करतील, हें त्यास स्पष्ट दिसत होतें. हा नेतृत्वाचा अधिकार कोणास द्यावा या विवंचनेत तो पडला होता. संभाजीमहाराज व फत्तेसिंग भोसले यांस हें काम झेंपण्यासारखें नव्हतें. दाभाडे, गायकवाड, नागपूरकर भोसले यांपैकीं कोणाच्या हवालीं हें काम करावें तर त्या तिघांस शाहूनें मरणापूर्वीं वारंवार निकडीचीं पत्रें पाठविलीं असतांहि कोणी साता-यास आले नाहींत. शेवटीं निरूपाय होऊन त्यानें नानासाहेब पेशव्याच्या हातीं राज्याचा मुख्य अधिकार सोपविला. राज्याची नांवाची मालकी मात्र आपल्या वंशजांकडे, अखत्यारी आपआपल्या मुलुखापुरती ज्या त्या सरदाराकडे, आणि सर्व राज्याची 'वडीलकी' मात्र पेशव्यांकडे, अशी ही महाराजांची योजना होती. पेशव्यांनीं सर्व राज्य संभाळावें, ते संभाळण्याच्या कामीं व वृद्धिंगत करण्याच्या कामीं योग्य दिसेल ती व्यवस्था करावी, व सर्व सरदारांस आपल्या कह्यांत वागवावें असें या वडीलकीच्या अधिकाराचें स्वरूप होतें.