प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
शहाजीच्या अडचणी व शिवाजी करवीं स्वराज्यास्थापना करण्याचा उपक्रम.- इ. स. १६३८ हें साल मराठ्याच्या राज्यस्थापनेच्या इतिहासांत सुवर्णाक्षरांनीं लिहून ठेवण्यासारखें आहे. ह्या वर्षीं शहाजीनें शामराव नीलकंठ पेशवे, बाळकृष्णपंत मुजुमदार, सोनोपंत डबीर व रघुनाथ बळवंत कोरडे सबनीस ह्या आपल्या विश्वासू नोकरांस बरोबर देऊन शिवाजीस बेंगरुळाहून पुण्यास पाठविलें. असें दिसतें कीं आपण नामा निराळें राहून शिवाजीच्या नांवावर स्वतंत्र राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेंच शहाजीनें ही व्यवस्था केली होती. आपल्या आयुष्याच्या सुमारें चाळीस वर्षांच्या अवधींत मराठ्यांचें स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचें जे शिवाजीनें महत्कार्य केलें त्याचा आरंभ वस्तुतः शहाजीनें शिवाजीस आपल्यापासून वेगळें केलें त्या वर्षींच होतो असें म्हटलें पाहिजे. शहाजी हा स्वतःएक प्रख्यात राजकार्यधुरंधर पुरूष होता यांत संशय नाहीं; किंबहुना त्यानें कांहीं वर्षेंपर्यंत निजामशाहीच्या तख्तावर एक नामधारी बाहुलें बसवून आपल्या स्वतःच्या हिंमतीवर स्वतंत्रतेनें राज्यकारभरहि केला होता. तथापि किती केलें तरी तो मुसुलमानी राजांच्या नौकरींत वाढलेला माणूस होता. त्याला निजामशाही, आदिलशाही इत्यादि शाहींचा तिटकारा आला असेल, कदाचित् ह्या मुसुलमानी राजांचें जूं झुगांरुन देऊन स्वतंत्र राज्यस्थापना करावी असेहि विचार त्याच्या मनांत घोळत असतील; परंतु ज्या माणसाचें जवळ जवळ अर्धें अधिक आयुष्य मुसुलमानी राजाची नोकरी करण्यांत गेलें, त्याला स्वतःस स्वतंत्र म्हणवून स्वतःच्या नांवावर स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा धीर कसा होणार ? तो स्वतः मोठा पराक्रमी पुरूष असेल, परंतु त्यानें जे पराक्रम केले, ते सर्व मुसुलमानी राजाच्या नांवावर केले होते. तो शहाजहान बादशहाशीं टक्कर देण्यासहि कचरला नाहीं, पण ती देतांना त्याला केवळ नामधारी कां होईना पण एका राजघराण्यांतील पुरूषास स्वतःच्या पाठीशीं घालावें लागलें. त्याच्या तरवारीस जो एवढा जोर आला होता. तो ह्या नामधारी बाहुल्यामुळेंच होय. आपल्या हातून हें बाहुलें गेलें कीं आपली तरवार लुली पडणार ही जाणीव त्यास सोडून गेली नव्हती. जे पराक्रम आपण शहाच नांवावर करीत आहोंत तेच स्वतःला स्वतंत्र म्हटल्यावर आपल्या हातून होतील किंवा नाहीं याची त्यास खात्री नव्हती. त्यानें मनांत आणलेंच असतें तर कदाचित् त्याला स्वतःलाहि मराठ्यांचें एक स्वतंत्र संस्थान निर्माण करतां आलें असतें. परंतु त्याच्यामध्यें सामर्थ्य असलें तरी आत्मविश्वास नव्हता. त्याची भीति अगदींच निराधार होती असें नाहीं. त्यानें जर आदिलशाहीविरुद्ध बंड पुकारून स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला असता, तर त्यास आदिलशहा, कुतुबशहा व मोंगल बादशहा या सर्वांकडूनच एकसमयावच्छेदेंकरून विरोध झाला असता; इतकेंच नव्हे तर ज्या देशमुखांनां पुढें शिवाजीस गोडीगुलाबीनें आपल्या पक्षास वळवून घेतां आलें ते देखील शहाजीस विरोध करावयास चुकले नसते. उलट पक्षीं शिवाजीची स्थिति अगदीं निराळी होती. वडिलांचें धाडास व पराक्रम हे बालपणापासून त्याच्या समोर कित्त्याप्रमाणें होते. परंतु ज्या गुलामगिरीच्या वातावरणांत शहाजी अगदीं बालपणापासून वाढला होता त्या गुलामगिरीचा शिवाजीस अद्याप संपर्कहि झाला नव्हता. अशा स्थितींतच शहाजीनें त्यास आपल्यापासून दूर केल्यामुळें स्वतंत्र वातावरणांत त्याची मनोभूमि तयार होण्यास अवसर मिळाला; इतकेंच नव्हे तर ज्या गोष्टी शिवाजीस शहाजीपाशीं राहून करतां आल्या नसत्या त्या तो आपल्या वडिलावर ठपका येऊं न देतां बराच काळपावेतों पुण्याच्या जहागिरींत करूं शकला. विजापुरकरांनीं शहाजीस कैद केलें तेव्हां मुलगा माझ्या आज्ञेंत नाहीं, तुम्ही वाटल्यास त्याजवर फौज पाठवून त्याचें पारिपत्य करा असें जें शहाजीनें आदिलशहास सांगितलें तें अगदीं अंतःकरणपूर्वक सांगितलें होतें असें जरी मानलें तरी शिवाजीवर एखादा कठिण प्रसंग ओढवला असता तर शहाजीनें अदिलशहापाशीं आपल्या मुलाबद्दल रदबदली करून त्याची सुटका केली नसती असें म्हणतां येत नाहीं. शिवाजी व त्याचे साथीदार विजापुरकरांच्या मुलखांत बेजबाबदारपणें धुमाकूळ घालीत असतांना त्यांच्या मनांतहि हा विचार येत असला पाहिजे.