प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.

शाहूच्या आलस्यामुळें सरदारसंस्थानिकांचा उदय.- अशा रीतीनें मराठी साम्राज्याचीं सूत्रें भोसल्यांच्या घराण्यांतून पेशव्यांच्या घराण्यांत जाऊन प्रधानाधिष्ठित संयुक्त-संस्थानिक- मंडळाचा उदय झाला. एका दृष्टीनें विचार केला तर जें राज्य शिवाजीनें मिळविलें तें शाहूनें गमावलें. असाच निष्कर्ष निघतो ! कारण कीं हें संयुक्त -संस्थानिक मंडळ शाहूनें मरणसमयीं निर्माण केलें; अथवा राज्याच्या स्थायिकपणासाठीं त्यास तें निर्माण करावें लागलें, आणि त्याचा मुख्य अधिकार पंतप्रधानाच्या हवालीं करावा लागला ! हें सारें त्याच्या आलस्याचें व अनास्थेचें फल होतें ! आपल्या पूर्वजांच्या पराक्रमांचा व त्यांनीं स्थापिलेल्या राज्याचा शाहूस पराकाष्ठेचा अभिमान होता, तें राज्य वृद्धिंगत करण्याविषयीं त्याचा उत्साह वर्णनीय होता तो उदार, शूर, धार्मिक व प्रजावत्सल होता याबद्दल वाद नाहीं. पण एवढे गुण अंगीं असले म्हणजे राजाच्या हातीं राज्य राहतें असें मुळींच नाहीं. राज्य हें करणा-याचें आहे. भोगणा-याचें नाहीं. स्वसुखाविषयीं निरपेक्ष होऊन राजानें प्रत्येक महत्त्वाच्या राजकार्यांत शरीर व मन शिणवावें तेव्हांच त्याचें प्रभुत्व कायम राहतें. पहिल्या तीन राजांप्रमाणें स्वारींत हजर राहून अंगमेहनत व दगदग सोसून सरदार व फौज कह्यांत ठेवणें हें त्याचें कर्तव्य होतें पण तें त्यास झेंपत नव्हतें व आवडतहि नव्हतें. राज्य वाढविण्याचा तर हव्यास मोठा, आणि दगदग तर करावयास नको, अशी त्याची स्थिति होती. त्यामुळें मोंगलांवर स्वा-या करून  त्यांचे मुलूख जिंकण्याचें काम त्यानें आपल्या सरदारांवर सोपविलें !

गुजराथ, गोंडवण, नेमाड माळवा, बुंदेलखंड, कर्नाटक, इत्यादि प्रांत काबीज करण्याविषयी शाहूनें पेशवे, भोसले, दाभाडे यांस सनदा दिल्या तेव्हांच ते ते मुलूख त्या त्या सरदारांचे झाले ! त्यांची त्यांवर मालकी उत्पन्न झाली ती शाहूस काढून घेण्याचा मार्ग राहिला नाहीं. या सरदारांस सनदा मिळाल्याबरोबर त्यांनीं व त्यांच्या काभा-यांनीं शेंकडों सावकार गोळा करून त्यांजकडून कोट्यवधि रूपये कर्ज मिळविलें व हजारों शिलेदारांस अनुकूल करून घेऊन लक्षावधि फौज गोळा केली. ती फौज घेऊन हे सरदार, सावकार व शिलेदार सर्व मिळून त्या त्या प्रांतांत जाऊन रात्रंदिवस मेहनत करून तेथच्या शत्रूंचा बीमोड करून ते ते प्रांत काबीज करिते झाले. त्यांनीं वर्षानुवर्ष झगडारगडा चालवून, हातचें पदरचें भरीस घालून व प्रसंगीं प्राणहि खर्च करून हे प्रांत मिळविले, ते जर छत्रपति मागूं लागले तर ते त्यांस कसे मिळावे ! या सरदार वगैरे लोकांचें सर्व नुकसान भरून देऊन व सावकारांचीं कर्जे फेडून प्रांत आपल्या ताब्यांत घेण्याचा शाहूस मार्ग होता, पण त्याला अगणित संपत्ति पाहिजे ती त्याजवळ कोठें होती ? या करितां कोणीं सरदारानें एखादा प्रांत जिंकिला म्हणजे तोच त्याच्या फौजेच्या खर्चास सरंजाम म्हणून नेमून द्यावा, आणि हुजूर खर्चाकरितां कांहीं नियमित रक्कम त्याजपासून घेत जावी, असा शाहून प्रथमपासून प्रघात ठेविला होता. या योगानें सरदार लोकांस व कार्यकर्त्या पुरुषांस अधिक अधिक उत्तेजन येऊन ते राज्य वाढवीत सुटले. शाहू नुसता महाराष्ट्रवादी नसून आपल्या पूर्वजांप्रमाणेंच महत्तरराष्ट्रवादी होता; तो त्याचा हेतु वर सांगितल्याप्रमाणें उत्तम प्रकारें सिद्धीस गेला ! तो गादीवर बसला तेव्हां भीमा व कृष्णा या नद्यांमधील मुलुख देखील धडपणें त्याच्या ताब्यांत नव्हता, पण मरणसमयीं त्याच्या नांवाचा शिक्का काशीपासून रामेश्वरापर्यंत चालत होता ! पण हें लक्ष्यांत ठेविलें पाहिजे कीं, हे सारें राज्य सरदारांनीं मिळविलें असून तें त्यांच्या पूर्ण ताब्यांत होतें. सुघटित व अव्यवस्थित राजसत्तेंतला फरक किती आश्चर्यकारक आहे ! ईस्टंइंडिया कंपनीचें राज्य व पेशव्यांचें वगैरे राज्य हीं एकाच नमुन्यावर बनली होती, पण इंग्रजांच्या राजानें कंपनीचे राज्य लेखणीच्या एका फटक्यासरशीं खालसा करून टाकिलें आणि मराठ्यांच्या राजास सरदारांच्या मुलुखापैकीं एखादा तालुकासुद्धा तक्रारी खेरीज मिळण्याची मारामार !