प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
विजापुरकरांशीं युद्ध :- (१६५५-१६६२) - इ. स. १६५२ त विजापुरकरांनीं शिवाजीवर पाठविलेल्या बाजी शामराजास जावळीच्या मो-यांची आंतून मदत होती. शिवाजी मावळांतील व कोंकणांतील जो प्रदेश शिवाजीनें आतांपर्यंत हस्तगत केला होता त्याच प्रदेशांत जावळीच्या मो-यांचेंहि वतन असल्यामुळें ह्या मराठे सरदारास आपणाकडे अनकूळ करून घेतल्यानें शिवाजीस पुष्कळ फायदा होणार होता. परंतु सामोपचारानें तो विजापुरकरास सोडीना. तेव्हां शिवाजीनें त्याचा पाडाव करून जावळी आपल्या ताब्यांत घेतली. मो-यांचाहि कांहीं अंशीं शिवाजी प्रमाणें स्वतंत्र होण्याचा प्रयत्न चालू असल्यानें विजापुरकरांनीं मो-यास ह्या प्रसंगी मदत केली नाहीं. शिवाय ह्याच सुमारास औरंगजेबानेंहि विजापूर व गोवळकोडे राज्ये घशाखालीं घालण्याची तयारी चालविली असल्यामुळे विजापूरकरांस मो-याकडे लक्ष देता आलें नाहीं. औरंगजेबाचा उद्देश जाणून शिवाजीनें त्यास असे लिहिलें कीं आदिलशाहीचा कोकणांतील भाग तुम्ही मला देत असाल तर अदिलशहाशीं लढण्यांत मी तुम्हाला मदत करतो. ह्या पत्रास अनुकूल उत्तर न मिळाल्याकारणानें शिवाजीनें मोगलांची जुन्नर व दुसरी लहान मोठीं गांवें लुटलीं. ह्या कृत्यांमुळें औरंगजेबास शिवाजीचा फार राग आला. परंतु त्याच वेळीं त्यास शहाजहानाच्या आजारीपणामुळें उत्तरेस जाण्याची घाई झाल्यामुळें त्यानें शिवाजीस एक गोडीगुलाबीचें पत्र पाठवून हें भांडण विकोपास जाऊं दिलें नाहीं.
औरंगजेब उत्तरेस जातांच विजापुरकर पुन्हां शिवाजीच्या पारिपत्यास मोकळे झाले. इकडे शिवाजी केवळ जावळी घेऊनच स्वस्थ बसला नव्हता. त्यानें विजापुरकरांच्या वांई प्रांतांतहि आपला अंमल बसविण्याचे प्रयत्न चालविले होते. या वेळीं अफझलखान हा वांई प्रांताचा सुभेदार होता. तो विजापुरास गेला व शिवाजीस पकडून आणण्याची प्रतिज्ञा करून मोठ्या फौजेसह तीन वर्षांपूर्वीं नवीन बांधलेल्या प्रतापगड, नांवाच्या पारघांटांतील एका किल्ल्यावर शिवाजी येऊन राहिला होता त्या रोखें निघाला. परंतु त्यास या कामगिरींत यश न येतां तो स्वतःच प्राणास मुकून त्याच्या फौजेची दाणादाण झाली. शिवाजीनें यानंतर पन्हाळा, पवनगड वसंतगड, रांगणा व खेळणा हे विजापुरकरांचे किल्ले एकामागून एक हस्तगत केले व खंडण्या वसूल करीत तो थेट विजापूरापर्यंत गेला. विजापुरकरांनां आतां शिवाजीचा बंदोबस्त केल्यावांचून गत्यंतरच उरलें नाहीं. त्यांनीं शिद्दी जोहार नामक सरदाराची शिवाजीवर योजना केली. परंतु तो शिवाजीस सामील असल्याची शंका आल्यावरुन कांहीं दिवसांनीं स्वतः आदिलशहाच शिवाजीच्या पारिपत्यास आला. त्यानें पन्हाळा व पवनगड हे दोन किल्ले परत घेतले, परंतु इतक्यांत शिद्दी जोहारानें बंड केल्याचें समजल्यावरून त्याचा बंदोबस्त करण्याकरितां त्याला कर्नाटकांत जावें लागलें. विजापुरकरांच्या सदरहू मोहिमींत वाडीकर सावंत, मुधोळचा बाजी घोरपडे व जंजि-याचा शिद्दी हे तिघेहि शिवाजी विरुद्ध विजापुरकरांस सामील झाले होते. यांपैकीं घोरपड्यास तर शिवाजीनें यापूर्वींच देहांत प्रायश्चित दिलें होतें. बाकी दोघे जे राहिले ते आदिलशहा सर्व सैन्यासह कर्नाटकांत निघून गेल्यावर असहाय होऊन शिवाजीस शरण आले.
एकंदरींत विजापुरच्या युद्धांत शिवाजीनें आदिलशाहीवर आपला शह पूर्णपणें बसविला. जेव्हां आदिलशहानें पाहिलें कीं अफझलखान व शिद्दी जोहार यांच्याने शिवाजीचें कांहीं न होतां उलट आपल्याच फौजेची खराबी होऊन सावंत, दळवी, घोरपडे वगैरे प्रमुख लोकहि शिवाजीच्या ताब्यांत गेले, तेव्हां त्यानें शहाजीस बोलावून आणून त्याच्या मार्फत शिवाजीशीं समेट केला. या तहान्वयें शिवाजीनें जिंकलेला सर्व मुलुख त्याजकडेसच राहिला व इतःपर त्यानें विजापुरच्या मुलुखास त्रास देऊं नये असें ठरलें. आतां शिवाजीच्या ताब्यांत कल्याणपासून गोव्यापर्यंत सर्व कोंकणपट्टी व भीमेपासून वारणेपर्यंतचा देश मिळून दक्षिणोत्तर १६० मैल लांबीचा व पूर्वपश्चिम शंभर मैल रुंदीचा प्रांत आला होता. पन्नास हजार पायदळ, सात हजार स्वार व शिवाय आरमार इतकी त्याची तयारी जमली. शहाजीच्या शिफारशीवरून त्यानें आतां रायगड येथील मजबूत किल्ल्यांत राजधानीसारखी सर्व सोय करून आपल्या सर्व मुख्य कचे-या तेथेंच आणविल्या. वांई, क-हाड, कोल्हापूर इत्यादि ठाणीं शिवाजीच्या हातीं आलीं. घोरपडे, दळवी, घाटगे वगैरे सरदारांस त्याचा वचक बसला. प्रांताच्या बंदोबसताकरितां जागजागीं त्यानें नवीन किल्ले बांधले. शिद्दयावर आपला ताबा कायमचा बसविण्यासाठी त्यानें मोठें आरमार तयार केलें लहान मोठीं चारपांचशें जहाजे बांधून त्यांनें ठिकाण कुलाबा हे केलें. तसेंच सुवर्णदुर्ग व विजयदुर्ग येथेंहि कांहीं जहाजें ठेवून दिलीं.