प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
विजयनगरच्या राज्याचा उदय.- अलाउद्दीन खिलजीच्या कारकीर्दींत मुसुलमानांनीं दक्षिणेंत प्रथम स्वा-या केल्या हें मागें सांगितलेंच आहे. इ. स. १३२३ त मुसुलमानांनीं वरंगूळ घेतलें; व १३२७ त म्हैसूरची राजधानी द्वारसमुद्र लुटून फस्त केली. तेव्हां वरंगूळच्या राजाच्या पदरीं असलेल्या संगम नामक पुरुषाच्या हरिहर, बुक्क आदिकरुन पांच पुत्रांनीं दक्षिणेंत एक मोठें हिंदु राज्य स्थापून मुसुलमानांस तोंड देण्याचा निश्चय केला. त्याप्रमाणें त्यांनीं इ. स. १३३६ त तुंगभद्रेच्या दक्षिण तीरावर विजयनगर नांवाच्या एका मोठ्या तटबंदी शहरांची स्थापना करून सुमारें पंधरा वर्षांच्या अवधींतच पूर्व किना-यापासून पश्चिम किना-यापावेतोंचा तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील बहुतेक मुलूख आपल्या अंमलाखालीं आणिला.
सं ग म घ रा णें.- उपर्युक्त संगमाच्या वंशजांनीं इ. स. १३३६ पासून १४५६ पर्यंत दक्षिणेंत राज्य केलें. या राजांचा बहुतेक काळ इ. स. १३४७ त तुंगभद्रेच्या उत्तरेस स्थापन झालेल्या बहामनी राज्याच्या सुलतानांशीं युद्धें करण्यांत खर्च झाला. यांपैकीं दुस-या देवरायाच्या कारकीर्दींत (१४२४-१४४७) संगम घराणें वैभवाच्या शिखरास पोंचलें होतें. याच राजाच्या कारकीर्दीच्या आरंभीं निकोलो कँटि हा इटालियन प्रवासी व अखेरीस (इ. स. १४४३) अबदुर रझाक हा मुसुलमान प्रवासी विजयांनगरच्या राज्यांत येऊन गेला. दुस-या देवरायानंतरचे संगम घराण्यातील सर्व राजे कमकुवत होते. या देवरायाचा पुत्र मल्लिकार्जुन याचा नरसिंह नामक कोणी एक कारभारी होता. तोच पुढें सत्ताधीश होऊन त्यानें १४५६ त संगमाच्या वंशजास पदच्युत केलें. संगम घराण्याच्या संस्थापकबंधूपैकीं बुक्क यानें इ. स. १३७४ च्या सुमारास चीनच्या मिंग घराण्यांतील तैत्सुबादशहाकडे आपले वकील रवाना केले होते.
सा लु व घ रा णें.- हें घराणें फार दिवस गादीवर राहिलें नाहीं. तथापि या घराण्याचा संस्थापक नरसिंह सालुव हा मोठा शूर पुरूष होता. त्यानें दक्षिणेकडील तामिळ मुलुखांत आपल्या राज्याचा विस्तार करुन जिकडे तिकडे आपल्या नांवाचा दरारा बसविला. याच्या कारकीर्दीत बहामनी राज्याची शकलें होऊन इ. स. १४९० च्या सुमारास विजापुरचा सुलतान स्वतंत्र झाला व त्यानें पुढाकार घेऊन बहामनी राज्याचा विजयनगरशीं चाललेला झगडा पुढें चालू ठेविला. नरसिंहाच्या मागून त्याचा वडील मुलगा गादीवर बसला. पण लवकरच त्याचा खून होऊन त्याचा धाकटा भाऊ इरमदि नृसिंह उर्फ धर्मराय हा राजा झाला. याच्या कारकीर्दींत सर्व सत्ता त्याचा सेनापति नरस नायक याच्या हातांत असून तोच पुढें १५०५ त आपल्या धन्याचा वध करून सिंहासनारूढ झाला असें दिसते.
तु लु व घ रा णें.- नरस नायक हा तुलुव घराण्याचा संस्थापक होता. याचा पुत्र कृष्णदेवराय हा मोठा वैभवशाली व कीर्तिमान राजा होऊन गेला. यानें इ. स. १५०९ पासून १५२९ पर्यंत अवघीं वीस वर्षेंच राज्य केले. पण तेवढ्या अवधींत त्यानें विजापूरच्या इस्माईल आदील शहाचा पराभव करून त्याजपासून ज्याच्या करितां हिंदुमुसुलमानांत आजपर्यंत अनेक लढाया झाल्या होत्या तो रायपूरचा किल्ला घेतला, आदिलशहाची राजधानी विजापूरहि काबीज करून तेथें कांहीं दिवस आपला तळ दिला. हा जसा शूर तसा उदार मनाचाहि होता. पाएजसारख्या परद्वीपस्थ इसमानें देखील त्याच्या स्वभावाची अगदीं मन मोकळेपणानें स्तुति केलेली आढळतें. त्याच्या दरबारचें वैभव पाहून यूरोपीय लोकांचे तर डोळेच दिपून जात. कृष्णदेवरायाच्या मागून त्याचा चुलत भाऊ अच्युतराय राज्यारूढ झाला. अच्युतराय हा दुर्बल व जुलुमी राजा निघाला. हा कृष्णदेवरायाच्या कारकीर्दींत जिंकून घेतलेले रायचूर व मुदगल हे दोन्ही किल्ले गमावून बसला; व इब्राहिम आदिलशहानें विजयानगरवर स्वारी केली तेव्हां यानें त्यास जबर खंडणी देऊन वाटेस लावलें. अच्युतराय १५४२ त मरण पावला. व त्याच्या जागीं त्याचा पुतण्या सदाशिवराय हा गादीवर बसला. याच्या कारकीर्दींत सर्व सत्ता त्याचा कारभारी रामराय सालुब याच्या हातीं होतीं. हा रामराय मोठा शूर पुरुष होता. कृष्णदेवरायाप्रमाणें यानेंहि मुसुलमानासंबंधांत चढाईचें धोरण स्वीकारून तुंगभद्रा ओलांडून पलीकडील मुसुलमानी राज्यांत स्वा-या केल्या व तेथील सुलतानांस 'त्राहि भगवान्' म्हणण्याची पाळी आणली. इ. स. १५४३ त रामरायानें अहमदनगर व गोवळकोंडे येथील राजांशी सख्य करून विजयापुरावर स्वारी केली व पुढें पंधरा वर्षांनीं विजापूरच्या राजांशीं सख्य करून अहमदनगरवर स्वारी केली. या दुस-या स्वारींत हिंदूंनीं अहमदनगरचा मुलूख अतिशय निर्दयतेनें उध्वस्त केला व आपल्या मुसुलमान दोस्तांचाहि उघड उघड पाणउतारा केला. यामुळें मुसुलमान लोक चिडून गेले. विजापूर, अहमदनगर, गोवळकोंडें व बेदर येथील सुलतानांनीं आपसांतील भांडणे घटकाभर एकीकडे ठेविलीं, व एकजुटीनें विजयानगरवर स्वारी करून इ. स. १५६५ त तालिकोटच्या लढाईंत हिंदुंचा पूर्ण पराभव केला. लढाईंत विजय पावल्यावर मुसुलमानांनीं विजयानगर शहरांत शिरून इतकी कत्तल, लुटालूट व जाळपोळ केली कीं विजयानगरच्या राज्यास पुन्हां कधीं डोकें वर काढतां आलें नाहीं.
आ र बी डु घ रा णें.- तालिकोटच्या लढाईनंतर रामरायाचा भाऊ तिरूमल हा सदाशिवराय या नामधारी राजायस घेऊन पेनुगोंड्यास पळून गेला व इ. स. १५७० च्या सुमारास आपणच स्वतः राजा बनला. तिरूमल आरबीडु नामक विजयनगरच्या चौथ्या राजघराण्याचा मूळ पुरूष होता. त्याच्या वंशांत पहिला वेंकट हा कांहीं नांव घेण्यासारखा पुरूष झाला. त्यानें आपली राजधानी चंद्रगिरीस नेलेली दिसते. तो तेलुगू कवीचा व वैष्णव ग्रंथकारांचा आश्रयदाता म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या मागून झालेले राजे केवळ स्थानिक संस्थानिक होते. त्यांपैकीं दुसरा रंग यानें इ. स. १६४५ त सहा वर्षांपूर्वीं आपल्या हाताखालील एका नायकानें इंग्रजांस दिलेली मद्रासच्या जागेची जहागीर कायम केली. दुसरा रंग हाच या घराण्यांतील शेवटचा स्वतंत्र राजा होय. तालिकोटच्या लढाईनंतर विजयानगरच्या साम्राज्याचे लहान लहान तुकडे होऊन त्यांवर पूर्वींचे विजयानगरच्या हाताखालील सरदार उर्फ नाईक स्वतंत्रपणें राज्य करूं लागले होते. पुढें विजापूरच्या व गोवळकोंड्याच्या राजांनीं दक्षिणेत स्वा-या करून बहुतेक दक्षिण काबीज केली, तेव्हां हे नाईक मुसुलमानांचे अंकित होऊन त्यांनां खंडणी देऊं लागले. शहाजीनें आपली तंजावरची जहागीर याच नायकांनां जिंकून मिळविली होती, व शिवाजीनें आपल्या राज्यारोहणानंतर दक्षिणदिग्विजय केला तेव्हां त्यालाहि याच नायकांशीं लढावें लागलें होतें.
वि ज या न ग र च्या सा म्रा ज्या ची का म गि री.- विजयानगर व मुसुलमानी राज्यें यांच्या झगड्यांत अनेक वेळां हिंदू लोकांस पराभूत व्हावें लागलें, हें जरी खरें आहे, तरी मुसुलमानांची लाट तुंगभद्रेपलीकडे थोपवून धरून विजयानगरच्या साम्राज्यानें हिंदु संस्कृतीच्या संरक्षणाची फार मोठी कामगिरी बजाविली आहे. विजयानगरचें राज्य उदयास आले नसतें तर मुसुलमानांस तुंगभद्रेपलीकडे पसरण्यास फारसा काळ लागला नसता. विजयानगरच्या या कामगिरीची थोडीशी कल्पना येण्यास तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील मुसुलमानी लोकसंख्येची तिच्या उत्तरेकडील मुसुलमानी प्रदेशांतल्या लोकसंख्येशी तुलना केली तरी पुरें होईल. ज्या ठिकाणीं पूर्वीं विजयानगरचें साम्राज्य होतें. त्यापैकीं बराचसा भाग हल्लीं म्हैसूर संस्थानांत मोडतो. येथे एकंदर लोकसंख्येशीं मुसुलमानांचे प्रमाण अवघें शेंकडा पांचच आहे. तर उलटपक्षीं तुंगभद्रेच्या उत्तरेकडे असलेल्या मुंबई इलाख्यांत तें प्रमाण शेकडा विसाहून कमी नाहीं. अठराव्या शतकांत म्हैसूर संस्थानाचा मुलूख हैदरच्या ताब्यांत गेला नसता तर त्या भागांत मुसलमानांचें प्रमाण शेकडा एक तरी सापडलें असतें कीं नाहीं याची वानवाच आहे. म्हैसूरच्या दक्षिणेस असलेल्या त्रावणकोर, कोचीन वगैरे इतर संस्थानांत किंवा ज्याचा बराचसा भाग तुंगभद्रेच्या दक्षिणेस आहे त्या मद्रास इलाख्यांतहि मुसुलमानांची स्थिति विशेष चांगलीं नाहीं. संबंध हिंदुस्थानांत मुसुलमानांची लोकसंख्या एकंदर लोकसंख्येच्या पंचमांशाहून अधिक असतां या भागांत ती चौदांशाहूनहि कमीच भरेल.
मराठ्यांचा इतिहास
तुंगभद्रेच्या दक्षिणेस मुसुलमानी सत्तेस विरोध करण्याचें काम विजापूरच्या राजांनीं खालीं ठेविलें, तें त्यांच्या नंतर तुंगभद्रेच्या उत्तरेस मराठ्यांनीं आपल्या हातीं घेतलें. मराठ्यांच्या या सत्तावर्धनाचा इतिहास आपणांस अधिक महत्त्वाचा असल्यामुळें तो येथें थोडा विस्तरशःच देत आहों.
मराठ्यांच्या राज्याच्या स्थापनेचा आणि त्यापुढील चळवळींचा साकल्यानें इतिहास द्यावयाचा झाल्यास एक प्रश्न उत्पन्न होतो तो हा कीं, मराठे हे सामुच्चयिक नांव केव्हा उत्पन्न झालें. रामदेवराव जाधवाच्या कारकीर्दींत ''मराठी'' हें नांव भाषेस प्राप्त झालें होतें हें ज्ञानेश्वरींतील ''माझा मराठाच बोल कौतुके । परि तो संस्कृता पैजिंके । ऐशीं अक्षरें रसिकें । मेळवीन ।।'' या ओवीवरून स्पष्ट होईल. तथापि विशिष्ट लोकसमुच्चयास त्या वेळेस मराठा हें नांव उपलब्ध झाले होतें असें दिसत नाहीं. ''मराठे'' हे सामुच्चयिक नांव मुसुलमानांनीं त्यांस दिलें असावें, किंवा मुसुलमानी कारकीर्दींत प्राप्त झालें असावें.
मराठ्यांच्या इतिहासास सुरूवात त्यांच्याकडून राज्यस्थापना झाल्यानंतरच झाली असें म्हटलें पाहिजे. तथापि राज्यस्थापनेची क्रिया समजण्यासाठीं कांहीं पूर्वकालीन चळवळीचें ज्ञान अवश्य आहे.