प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
मराठ्यांच्या सत्तेचें महत्त्व.- मराठ्यांचा इतिहास हा विषय प्रत्येक महाराष्ट्रीयास स्वाभाविकपणे अत्यंत प्रिय आहे. त्या विषयाच्या अनेक अंगांचें ज्ञानकोशाच्या मुख्य भागांत विवेचन होईलच. तथापि जगाच्या एकंदर इतिहासक्रमांत व विशेषेंकरून भारताच्या इतिहासक्रमांत मराठ्यांच्या इतिहासाचें स्थान काय हा विषय प्रस्तावनाखंडांत विवेचनास योग्य आहे. शिवाजीनें राज्यस्थापना करून औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशहाच्या अलमगिरीस वेसण घातली आणि पेशव्यांनीं त्याचें कार्य पुढें चालविले आणि पुढें मराठी राज्य वाढत्या ब्रिटिश सत्तेमध्यें विलीन झाले. या सर्व खटाटोपीचा एकंदर सांस्कृतिक परिणाम काय झाला याचा विचार येथे करूं.
१ मराठ्यांच्या स्वराज्यस्थापनेच्या चळवळीचा भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने पहिला महत्त्वाचा परिणाम म्हटला म्हणजे मराठी भाषा बोलणा-या समाजाचें एकीकरण होऊन त्यांत एकराष्ट्रीयत्वाची भावना उत्पनन झाली. राज्य करणा-या परकी सरकारनें अर्ध्या महाराष्ट्रीय लोकांनां गुजराथी, कानडी व सिंधी भाषा बोलणा-या लोकांत व अर्ध्या महाराष्ट्रीय लोकांस तामीळ व हिंदी भाषा बोलणा-या लोकांत घालून त्यांची फाळणी केली आहे, तरी या भिन्न प्रांतांतील लोकांनीं आपले स्वत्व व एकत्व अणुमात्रहि कमी होऊं दिलेलें नाहीं.
२ मराठ्यांच्या खटाटोपाचा आज उघड उघड दिसून येणारा परिणाम म्हटला म्हणजे होळकर, शिंदे व गायकवाड या बड्या बड्या मराठी संस्थानिकांचे व पवार, पटवर्धन आदिकरून कित्येक लहान लहान संस्थानिकांचें अस्तित्व होय. आज राजपुतान्यांत व गुजराथेत जीं काहीं स्वतंत्र संस्थानें आहेत त्यांचे अस्तित्वहि त्यावेळीं मराठ्यांशीं शत्रुत्व असल्यामुळें इंग्रजास त्यांनां आपल्या बाजूस अतिशय सवलतीच्या अटीवरहि करून घ्यावे लागलें या गोष्टी मुळेंच आहे. शिंदे, होळकर व गायकवाड हे संस्थानिक आज शें-दोनशे वर्षांपासून महाराष्ट्राबाहेर राज्य करीत असल्यामुळें महाराष्ट्रीय संस्कृतीचा आपआपल्या राज्यांत प्रसार करण्याचें काम ते सावकाश परंतु निश्चित करीत आले आहेत.
३ मराठ्यांच्या चळवळीचा आज दृष्टोत्पत्तीस येणारा तिसरा महत्त्वाचा परिणाम म्हटला म्हणजे त्यांनीं दक्षिणेंत महंमदी संस्कृतीच्या प्रसारास आळा घातला हा होय. पंजाब एकंदर लोकसंख्येशीं प्रमाण अर्ध्याहून अधिक पडत असतांना जेथें मराठ्यांनीं बराच काळ सत्ता चालविली त्या मुंबई इलाख्यांतील संस्थानांत तें शेकडा बाराहूनहि कमीच आहे.
४ मराठ्यांची सत्ता अस्तास जाऊन आज शंभराहून अधिक वर्षें झालीं असतांहि अद्याप पुणें हें सर्व माहराष्ट्राचें नाक समजलें जाण्याइतकी तेथे वैचारिक चळवळ आहे. याचें बीज मराठशाहीच्या वैभवकालांत हें शहर अर्धशतकाहून अधिक काल मराठी साम्राज्याची राजधानी होतें या गोष्टींतच आहे.
५ आपलें स्वांतत्र्य रक्षिण्याकरितां परशत्रूंशीं लढण्यांत मराठ्यांनीं अखेरपावेतों टिकाव धरल्यामुळें इंग्रजी अंमलाखालीं आल्यानंतरहि त्याच्यामधील स्वातंत्र्यलालसा नष्ट होऊं शकली नाहीं. इ. स. १८८५ मध्यें राजकीय चळवळ करणा-या राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, तें महाराष्ट्रांत स्वातंत्र्यलालसा बीजरुपानें अस्तित्वांत राहिली होती त्याचेंच दृश्य फल होय. त्या वेळीं पुणें हेंच राजकीय चळवळीचें आगर असून राष्ट्रीय सभेच्या प्रथम अधिवेशनाकरितां तीच जागा अगोरदर पसंत करण्यांत आली होती.
६ कर्नाटक, तंजावर, सागर, झांशी वगैरे हिंदुस्थानच्या महाराष्ट्रीयतर कित्येक भागांत आज अनेक महाराष्ट्रीय लोक कायमची वसाहत करून राहिलेले दिसतात तोहि मराठ्यांच्या साम्राज्याविषयक चळवळीचाच एक परिणाम आहे. या वसाहतीमुळें आधुनिक महाराष्ट्रीयांनां परप्रांतीय राजकारण चालविणें विशेष सोयीचें जातें, आणि त्याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे हिंदुस्थानच्या आधुनिक राजकारणांत 'अखिल हिंद राष्ट्रीय पुढारी' (ऑल इंडिया लीडर) निर्माण करण्याचा आद्य मान महाराष्ट्रालाच आहे.
शीखांची कामगिरी.
वायव्येकडून येणा-या मुसुलमानांचा पहिला हल्ला पंजाब प्रांतावर पडला. परकी स्वा-यांनां विरोध करण्याचें वास्तविक ठिकाण वायव्य सरहद्द हें होय. हे धोरण ब्रिटिश सरकारनें संभाळून सरहद्दीच्याहि दोन पावले पुढें असलेल्या क्केटा येथे आपले लष्करी ठाणे ठेविले आहे. गिजनीच्या महंमुदाला या सरहद्दीवरच म्हणजे पेशावरनजीक जयपाळ व अनंगपाळ यांनी विरोध केला. अशा प्रकारें पंजाब प्रांतावर विशेष जबाबदारी असल्यामुळें शिखांच्या कामगिरीचा 'हिंदूंची उचल' या प्रकरणांत परामर्ष घेणें जरूर आहे.
तथापि रजपूत राजे, विजयानगरचे राजे किंवा मराठे यांच्याहून जरा निराळ्या प्रकारचें स्वरूप शीखांच्या इतिहासास आहे. पहिल्या तिघांचा इतिहास केवळ राजकीय स्वरूपाचा आहे तर उलट पक्षी शीखांचा पूर्व इतिहास तरी केवळ धार्मिक स्वरूपाचा आहे. शीख हे हिंदुजातिनाम नसून पृथक अशा एका धार्मिक संप्रदायाचें नांव आहे. इंग्रज लेखकांनीं शिखांची प्राचीन बौद्धांशीं तुलना करून त्यांना हिंदु धर्माची सुधारणा करणारे म्हटलें आहे. ''बुद्धाप्रमाणें नानकानें धार्मिक व सामाजिक बंधनांखालीं वांकलेल्या हिंदु धर्माविरुद्ध बंड केलें. दोघांनीं भिक्षुकांच्या जुलुमाला विरोध केला.'' तात्पर्य, शीख संप्रदाय हिंदु धर्माचाच शत्रु होय असें या लेखकांचें मत आहे. परंतु शीख समाजाचा पुढील इतिहास पाहतां त्यांनीं रजपूत राजांशीं किंवा मराठी सत्तेशीं झगडा केल्याचें दिसत नसून परकी मुसुलमानांची सत्ता ब्रिटिश सत्ता यांच्यांशीं युद्धें केलीं हें स्पष्ट आहे. शिखांच्या इतिहासाचें सूक्ष्म अवलोकन केल्यास असें म्हणावें लागतें कीं, शीख पंथ मुसुलमानी धर्मप्रसार व मुसुलमानी सत्ता यांच्या जुलुमापासून हिंदूंचा बचाव करण्याकरितांच प्रस्थापित झाला; परंतु रजपुतांप्रमाणें किंवा मराठ्यांप्रमाणें मुसुलमानाविरुद्ध एकदम तलवार न उचलतां गुरू नानकानें एक निराळा संप्रदाय काढून इस्लामी धर्मप्रसाराला आळा घालण्याची निराळीच युक्ति काढली.