प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
मराठी सत्तेचा कळस (१७४८-१७६०) - शाहूच्या मरणानंतर मराठी साम्राज्याचा सर्व हिंदुस्थानभर प्रसार करण्याचा कसून प्रयत्न करण्यांत आला. त्याकरितां सदाशिवराव भाऊ, रघुनाथराव, मल्हारराव होळकर, जयाप्पा व दत्ताजी शिंदे, गोपाळराव पटवर्धन वगैरे सरदार दरवर्षीं चातुर्मास्यानंतर मुलुखगिरीसाठीं बाहेर पडत ते पर्यन्यकाळाच्या सुरवातीपर्यंत बहुधा पुन्हा स्वदेशीं परत येत नसत. या निरनिराळ्या मराठे सरदारांनीं मिळून कमींत कमी बेचाळीस तरी मोहिमा केल्या; त्यांपैकीं कांहीं गुजराथेंत, कांहीं कर्नाटकांत, कांहीं निजामावर व ब-याचशा उत्तर हिंदुस्थानावर झाल्या. या सर्व मोहिमांच्या मुळाशीं सर्व हिंदुस्थान देश मराठ्यांच्या सत्तेखालीं आणून त्याचे एकीकरण करावयाचें, हा एकच उद्देश होता. या वेळीं दक्षिणेत हैद्राबादचा निजाम व म्हैसूरचा हैदर या देश्य शत्रूंशिवाय फ्रेंच व इंग्रज हे परदेशी शत्रू हळू हळू वर डोके काढूं लागले होते तथापि फ्रेच व इंग्रज यांच्या कारस्थानांनां १७५८ नंतर विशेष रंग चढूं लागला. तत्पूर्वीं मराठ्यांनीं निजाम व हैदर यांचा बंदोबस्त बहुतेक दुय्यम प्रतीच्या सरदारांवर सोंपवून विशेष भर उत्तर हिंदुस्थानांतील मोहिमांवर दिला. त्या सर्वांची थोडक्यात फलश्रुति म्हणजे इ. स. १७६० पर्यंत लाहोर, मुलतान, टठ्ठा, अंतर्वेद, रोहिलखंड, कटक, नागपूर, माळवा, गुजराथ, काटेवाड, खानदेश, औरंगाबाद, विजापूर, कोंकाण, व किल्लेकोमलपर्यंत सर्व मुलुख मराठ्यांच्या साक्षात् अमलाखालीं आला. तात्पर्य १७६० सालीं मराठ्यांची सत्ता कळसास पोहोंचली. यानंतर मराठी साम्राज्याची वाढ खुंटली, त्याच्या अनेक कारणांपैकीं प्रमुख कारण पानपतचा रणसंग्राम हें आहे.