प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
बहामनी राज्याची स्थापना.- यानंतर ग्यासउद्दीन तघलकाच्या कारकीर्दींत त्याचा पुत्र जोना हा दक्षिणेंतील दंगा मोडण्यासाठीं सैन्य घेऊन इकडे आला होता. परंतु या स्वारींत त्याचा पराभव होऊन त्यास परत जावें लागलें. इ. स. १३२३ त जोना ऊर्फ उलुघखान पुनरपि दक्षिणेंत आला. या वेळेस त्यानें सर्व तैलंगण देव पादाक्रांत करुन त्याची राजधानी वरंगूळ ही हस्तगत केली. तैलंगण देश मुसुलमानांच्या हातीं लागला तेव्हां तेथील बरेचसे प्रमुख रहिवाशी देशत्याग करून खालीं दक्षिणेंत गेले. (ग्रँट डफकृत मराठ्यांचा इतिहास, पु.१, पृ. ३६). तथापि अशीं कित्येक चांगलीं घराणी होती कीं, तीं देशत्याग व स्वातंत्र्यनाश यांमध्यें स्वातंत्र्यनाश पतकरून आपल्या जन्मभूमीस चिकटून राहिली. इ. स. १३४४ त गुजराथेंतून पळून आलेल्या कांहीं अफगाण सरदारांनीं महंमद तघलकाविरुद्ध बंड केलें, तेव्हां ह्या हिंदू सरदारांनीं त्यांनां मनोभावें मदत केली. ह्या बंडातूनच पुढें १३४७ त बहामनी राज्य उदयास आलें. हें राज्य म्हणजे बोलून चालून दिल्लीच्या सुलतानाविरुद्ध एक उघड उघड बंडच असल्यामुळें त्याच्या संस्थापकास साहजिकच एतद्देशीय सरदारांचीं अंतःकरणें गोडीगुलाबीनेंच आकर्षून त्यांचा पाठिंबा मिळविणें अवश्य होतें. हाच क्रम त्याच्या वंशजांस व पंधराव्या शतकाच्या अखेरीस बहामनी राज्याचीं शकलें होऊन त्यांतून (१) विजापुरची आदिलशाही, (२) गोवळकोंड्याची कुतबशाही, (३) व-हाडची इमादशाही, (४) अहमदनगरची निजामशाही व (५) बेदरची बरीदशाही हीं पांच लहान लहान राज्यें निर्माण झालीं तेव्हां तेथील सुलतानांसहि पुढें चालवावा लागला. उत्तर हिंदुस्थानांतील मुसुलमानांनां हिंदुस्थानाबाहेर मुसुलमानी मुलखांतून कर्तृत्ववान् माणसांचा व लढाऊ शिपायांचा अव्याहत पुरवठा होत असल्यामुळें ते हिंदुस्थानातील लोकांशीं फटकून राहूं शकत होते. परंतु दक्षिणेंतील मुसलमानानां तसें करतां येत नव्हतें. बहामनी राज्याचा संस्थापक झफिरखान उर्फ अलाउद्दीन हुसेन कांगो बहामनी यानें राज्यापुढ होतांच प्रथम वरंगूळच्या राजाचा स्नेह संपादन केला. त्यानें हिंदू सरदारांपैकीं कोणास वंश परंपरा जमिनी किंवा दुसरें कांहीं हक्क देऊन संतुष्ट केले, तर इतरांस त्यांचीं देशमुखीचीं किंवा देशपांडेपणाचीं जुनीं वतनें त्यांच्याकडेच ठेऊन आपल्या पक्षास वळवून घेतलें. पोळ, घाटगे वगैरे मराठे सरदारांस दोन तीनशें स्वारांच्या लहान लहान मनसबी आपल्या सैन्यांत देऊन त्यांच्या पथकांच्या खर्चासाठीं नवीन जहागिरी लावून देण्यासहि त्यानें मागें पुढें पाहिलें नाहीं.