प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.

पानपतचें अरिष्ट- मराठ्यांनी १७४८ ते १७६० पर्यंत उत्तर हिंदुस्थानांत केलेल्या स्वा-यांनां साम्राज्यप्रसार करणें हे एक स्वरूप असून शिवाय अफगाणांच्या स्वा-यानां बांध घालणें हें दुसरे स्वरूप होतें. मराठ्यांनीं आपल्या साम्राज्याची सीमा अटकेपर्यंत पोहोंचवून दिल्लीच्या पातशाहाला आपल्या सरंक्षणाखालीं घेतल्यामुळें हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीचे रक्षण करण्याचें काम त्यांच्यावर पडलें. या कामांत हिंदुस्थानांतील कायमच्या मुसुलमानांनीं मराठ्यांशीं एकनिष्ठपणे सहकार्य केले असतें तर अबदालीसारख्या बाह्य शत्रूंस पायबंद घालण्याचें काम मराठ्यांनीं सहज केलें असतें. पण हिंदुस्थानांतील मुसुलमानांचा एकपक्षीं समाजधर्मी अफगाणांकडे ओढा असल्यामुळे, व दुस-या पक्षीं मराठ्यांच्या दरा-याची भीति असल्यामुळें त्यांचें दोन दगडावर हात ठेवल्याप्रमाणें वर्तन नेहमीं असे. यामुळें नादीरशहा, अहमहशहा वगैरे सुलतानांच्या स्वा-यांचे आघात उत्तर हिंदुस्थानांतील मुसुलमानी राज्यांनां - दिल्लीच्या पातशाहीला- सोसावे लागले, व उलटपक्षीं पानिपतच्या संग्रामांत हिंदी मुसुलमानांनीं खुल्या दिलानें व एकजुटीनें मराठ्यांस मदत न केल्यामुळें त्यांतहि अबदालीलाच यश मिळाले.

अवरंगजेबानें दक्षिणेंत स्वारी केली, त्या वेळीं मराठ्यांपुढें स्वराज्यसंरक्षणाचा प्रश्न होता, तर अबदालीच्या १७४८ ते १७६१ पर्यंतच्या स्वा-यांच्या वेळीं मराठ्यांनीं स्थापलेल्या हिंदुपदपातशाहीच्या संरक्षणाचा प्रश्न होता. हे व्यापक स्वरूप जाणूनच मराठ्यांच्या सर्व हालचाली चालू होत्या. प्रथम लहान प्रमाणांत सामने होऊन अखेर पानिपतावर उभय पक्ष आटोकाट तयारी करून सज्ज झाले. या पानिपताच्या मोहिमेचें सांगोपांग विवेचन करणारा ग्रंथ सुप्रसिद्ध इतिहाससंशोधक राजवाडे यांच्या साधनांचा पहिला खंड आहे. त्यांत येऊन गेलेल्या मजकुराची सोप्या त-ह्नें मांडणीं सरदेसाई यांनीं आपल्या मराठी रियासतीच्या भागांत केली आहे. सरदेसाई यांच्या पुस्तकावर परीक्षण म्हणून केसरी पत्रांतहि या प्रकरणाची छाननी केली आहे. सरदेसाई राजवाड्यांचें सर्व म्हणणें कबूल करतात. पण गोविंदपंत बुंदेले यांस ते राजवाडे देतात तितका दोष देत नाहींत. केसरीकार, राजवाडे व सरदेसाई यांच्यातील वाद तोडण्यासाठीं निष्कर्ष काढतात तो येणेंप्रमाणें. -
१ भाऊसाहेबांनां या मोहिमेवर पाठविण्यांत पेशव्यांची चूक झाली असें म्हणतां येत नाहीं. २ या मोहिमेवर जातांना भाऊंनीं इब्राहिमखानास बरोबर घेतलें नसतें तर कुंजपुरा सर करीपर्यंत त्यांनां जे अभंग यश येत गेले तितकेंहि यश त्यांस आलें नसते. ३ इब्राहिमखानाची कवायती फौज बरोबर घेतांना गनिमी काव्यानें लढण्याचा प्रसंग आल्यास तोफखाना सोडून जाणार नाहीं असें त्यास वचन देणें व तें पाळणें अवश्य होतें; मात्र त्या वचनाची व्याप्ति व मर्यादा काय याची उभयतांसहि यथार्थ कल्पना नसल्यामुळें आयत्या वेळीं गोंधळ उडाला. ४ पानिपतच्या अपयशाचें सर्व खापर गोविंदपंत बुंदेल्यांवर फोडणे गैरवाजवी आहे. अंतर्वेदीतील कार्याचें महत्त्व जाणून एखादा अनुभवी सरदार गोविंदपंताच्या साहाय्याला पाठविण्यांत आला नाहीं ही भाऊसाहेबांनी घोडचूक केली ५ कुंजपु-यावर चाल करून जातांना यमुनेला एक महिना पायउतार होत नाहीं अशी भाऊसाहेबांनीं जी माहिती मिळविली होती ती खोटी ठरली. पण त्याचा दोष भाऊसाहेबांस देतां येत नाहीं. मात्र पुढील सर्व अनर्थांचे बीज या आकस्मिक चुकींत साठवलें आहे. ६ भाऊसाहेब पानिपतावर कोंडले गेल्यावर दक्षिणेतून कुमक मागविण्यास त्यांनीं दिरंगाई केली, किंवा पेशव्यानीं मदत पाठविण्यास विलंब लावला हें ठरविण्यास खात्रीलायक पुरावा नाहीं. यामुळें यांत भाऊसाहेब किंवा नानासाहेब या दोहोंतून कोण दोषी ठरतो तें सांगतां येत नाहीं. ७ अखेरच्या रणधुमाळी पर्यंत भाऊसाहेबांनीं आपल्या सैन्याची व्यवस्था परिस्थितीच्या मानानें, शक्य तितकी चांगली ठेवली होती; आणि सैन्यांतले सगळे सरदारहि आपापलीं कामे बिनतक्रार करीत असत. ८ पानिपतास राहणें अशक्य झाल्यानें सगळ्या सैन्याचा गोल बांधून आत्मसंरक्षणार्थ जरूर तेवढें झुंज करीत करीत दिल्लीस निघून जाण्याखेरीज मराठ्यांस अन्य मार्ग राहिला नव्हता; व भाऊसाहेबांनींहि तीच योजना सर्वांनुमतें ठरविली. ९ पीछहाट करतांना तोफखान्याचा उपयोग कितपत करावयाचा, आणि तोफखाना, पायदळ व घोडदळ या तीनहि अंगांचा मेळ कसा राखावयाचा याची, गैर राबत्यामुळें आगाऊ नक्की शहानिशा करण्यांत आली नाहीं. त्यामुळें दुसरे दिवशीं घोटाळा उडून पानिपतचा महा अनर्थ गुजरला. १० पूर्वींचा बेत आयत्या वेळीं बदलला तरी विश्वासराव गतप्राण होईपर्यंत बहुतेक सर्व सरदार कुचराई न करतां शौर्यानें लढले. ११ विश्वासरावास गोळी लागण्याचे पूर्वींच मराठे थकून जाऊन जयाचें पारडें मुसलमानाकडे झुकुं लागलें होतें. विश्वासरावास गोळी लागली नसती तरी मराठे जर युद्धांतून पाय काढून दिल्लीचा रस्ता लवकर न सुधारते तर त्यांचाच पराजय झाला असता. १२ सदाशिवराव एकांड्या शिलेदाराप्रमाणें ज्या वेळीं युद्धांत घुसले, त्या वेळीं सैन्याची स्थिति त्यांच्या आंवाक्याबाहेर गेली होती. भाऊसाहेब गर्दींत घुसल्यामुळें लढाई बिघडलेली नसून लढाई बिघडलेली पाहून निराशेनें ते गर्दींत घुसले.