प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.

औरंगजेबाशीं सामना (१६६२-७२) विजापुरकराशीं तह झाल्याबरोबर शिवाजीनें मोंगलाकडे आपला मोर्चा फिरविला. वस्तुतः शिवाजीनें मोंगलास सहा वर्षापूर्वींच डंवचलें होतें. परंतु पुढें लवकरच औंरगजेब आपल्या बापाचें राज्य बळकाविण्यांत गर्क झाल्यामुळें इकडे शिवाजीचेंहि विजापुरकरांशीं युद्ध सुरू झाल्यामुळें दोघांनांहि इतके दिवस दंड ठोकून आखाड्यांत उतरता आलें नाही. शिवाजी विजापुरकरांचे युद्धांतून मोकळा होतांच त्यानें मोरोपंत पिंगळ्याच्या हाताखालीं पायदळ व नेताजी पालकराच्या हाताखालीं घोडेस्वार अशीं योजना करून त्यांनां मोंगलांच्या मुलुखांत पाठविलें. मोरोपंतानें जुन्नरच्या उत्तरेकडील सरहद्दीवरचे कित्येक किल्ले हस्तगत केले व नेताजी तर मोंगली मुलखांतून खंडणी वसूल करीत थेट औरंगाबादपर्यंत चालून गेला. शिवाजीची ही धामधूम पाहून औरंगजेब फारच चिडला व त्यानें शिवाजीचा पाडाव करण्याविषयीं दक्षिणचा सुभेदार शाएस्तेखान यास निकडीचे हूकूम सोडिले. तेव्हां खानानें पुण्यास येऊन तेथें आपली छावणी दिली व चाकणच्या किल्ल्यास वेढा घालून तो सर केला. परंतु खान पुण्यास रहात असतां शिवाजीनें एके रात्री गुप्तपणें शहरांत शिरुन खानाच्या वाड्यावर छापा घातल्यामुळें खानाला पुण्यांत राहाणें धोक्याचें वाटून त्यानें भीमेकांठीं पेडगांव येथें आपली छावणी नेली. ही बातमी औरंजेबास समजताच त्यानें शाएस्तेखानाची बदली करून त्याच्या जागीं जयसिंगाची नेमणूक केली. इकडे शिवाजीनें एके दिवशीं सुरतेवर अचानक हल्ला करून तेथून यथेच्छ लूट आणलीं. नेताजी पालकर मोंगलांच्या मुलुखास उपद्रव देत होताच. शिवाजीच्या अरमारानेंहि मक्केकडे जाण्या-या मोगलाच्या गलबतांनां पकडून त्यांपासून खंडणीं घेतली. शिवाजीचें मोंगलांशीं युद्ध जुंपलेलें पाहून शिद्दी व विजापुरकर हे दोघेहि पूर्वींच जुने तह मोडून शिवाजीवर उठले. तेव्हां त्यांची खोड मोडण्याकरितां शिवाजी आपलें आरमार तयार करून बासिंलोर शहरावर स्वारी करून गेला व तें शहर लुटून चहूंकडे फौजा पाटवून प्रांताच्या मोठमोठ्या शहरांतून त्यानें पैसे आणले.