प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.

औरंगजेबाशीं तह.- परंतु तेथून शिवाजी पुन्हां महाराष्ट्रांत येऊन पोचण्यापूर्वींच त्याच्या पारिपत्यासाठीं औरंगजेबानें पाठविलेला जयसिंग दक्षिणेत येऊन पोंचला होता. जयसिंग हा मोठा धोरणी पुरूष असून तो चांगल्या तयारीनिशी शिवाजीवर चालून आला होता. विजापूरकरांकडून शिवाजीस मदत मिळूं नये म्हणून त्यानें आदिलशाहीचा मुलूख व शिवाजीचा मुलूख यांच्या मध्यें आपलें ठाणें दिलें. व लोहगड पुरंदर व राजगड या तीन किल्ल्यांच्या दरम्यानचा शिवाजीचा मुख्य मुख्य मुलूख असल्यामुळें तेवढ्यांतच युद्ध चालविलें. अशा स्थितींत मोंगलाशीं तोंड देणें शहाणपणाचें होणार नाहीं असें शिवाजीस वाटलें व त्यानें जयसिंगाची भेट घेऊन त्याच्या मार्फत औरंगजेबाशीं तहाचें बोलणें लाविलें. शिवाजीला जिंकणें अशक्य आहे; आणखी दोन चार महिने तो कसेंहि भागवून घेईल पण पुढें पावसाळ्यांत तो मोगलांस पुरे पुरे करून सोडील हें जयसिंग जाणून असल्यानें त्यानें औरंगजेबास सल्ला देऊन पुढे दिलेल्या अटीवर शिवाजीशीं तह ठरविला. ह्या तहान्वयें शिवाजीनें २३ किल्ले व ४० लाखांचा मुलुख मोंगलास देऊन १२ किल्ले व ४ लाखांचा मुलुख आपल्याकडे ठेविला आणि संभाजीस फौजेसुद्धां जयसिंगाच्या हाताखालीं नौकरी करण्यास पाठविण्यांचें व गरज पडल्यास स्वतःहि फौज घेऊन बादशहाच्या चाकरीस हजर राहण्याचें कबूल केलें. ह्या तहांत घाटमाथ्यावरील विजापूरच्या मुलुखांतून चौथाई व सरदेशमुखी हे हक्क स्वतःच्या खर्चानें वसूल करण्याची बादशाहानें शिवाजीस मुभा दिली होती असें बखरींत म्हटले आहे.