प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.
नारायणराव व सवाई माधवराव यांच्या कारकीर्दी. - वर सांगितल्याप्रमाणें थोरल्या माधवरावानें पानिपत येथील पराभवामुळें मराठशाहीचें जें नुकसान झालें तें भरून काढण्याचे प्रयत्न चालविले असतां तो इ. स. १७७२ त क्षयरोग होऊन थेऊर येथें मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ नारायणराव पेशवा झाला, पण फार दिवस झाले नाहींत तोंच तो आपल्या चुलत्याच्या कारस्थानास बळी पडला. त्याच्या वधानंतर नाना फडनवीस, सखाराम बापू वगैरे मंडळींनीं पेशवाईंतील सर्व सरदारांच्या सल्ल्यानें घरबुडव्या राघोबादादास पेशवा न होऊं देतां नारायणरावाची स्त्री गंगाबाई गरोदर होती तिच्या नांवानेंच राज्यकारभार चालविण्याचा कट केला. तेव्हां राघोबादादानें इंग्रजांची मदत घेऊन अधिकारारुढ होण्याची खटपट चालविली. यामुळें इंग्रजांस अंतःकलहानें व स्वार्थपरायणतेमुळें खिळखिळ्या झालेल्या मराठशाहीच्या राज्यकारभारांस हात घालण्यास आयतीच संधि मिळाली व त्यांनीं मराठ्यांशीं युद्ध सुरू केलें. मराठशाहींतील तुकोजी होळकर, महादजी शिंदे वगैरे जुन्या व प्रबळ सरदारांनीं आपआपल्या जहागिरींचा स्वतंत्रपणें विस्तार करून स्वतःची राज्यें स्थापण्याचा यापूर्वींच उपक्रम केला होता, तरी ते सर्व पेशव्यांच्या निर्मितीचे सरदार असल्याकारणानें त्यांच्या मनांतून पेशव्यांच्या गादीचा व त्याबरोबरच मराठशाहीचा अभिमान अद्याप नष्ट झाला नव्हता; व शिवाय प्रत्येकाचें वैयक्तिक हितहि पेशव्यांच्या नामधारी छत्राखालीं एकत्र होऊन इंग्रज आदिकरून शत्रूंशीं लढण्यांतच आहे हें न समजण्याइतके ते अदूरदशींहि नव्हते. यामुळें त्यांचीं आपसात बरीच चुरस असतांहि ते इंग्रजांशीं सामान्यतः एकजुटीनेंच लढले व म्हणून इ. स. १७८२ त त्यांच्या मधील लांबलेलें युद्ध संपून इंग्रजाशीं सालबाई येथे तह झाला तो मराठ्यांस विशेषसा अहितकारक झाला नाहीं. या नंतर मराठ्यांनीं निजामाच्या मदतीनें १७८५ त टिपूवर पहिली मोहीम व नंतर १७९०-१७९२ मध्यें इंग्रज व निजाम यांच्या मदतीने दुसरी मोहीम करून त्याचा पक्का बंदोबस्त केला, व अखेर १७९५ त खड्र्याच्या लढाईत निजामाचा पूर्णपणे पराभव करून त्याचीहि रग जिरविली.